योगेश्वर कृष्णाचा जन्मोत्सव
भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला तो जन्माष्टमीचा पवित्र दिवस जगभरातील कृष्णभक्त वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. जरी श्रीकृष्ण हा दैवी प्रेमाचा अवतार म्हणून लोकप्रिय असला, तरीही अनेक भक्तांच्या अंतःकरणात तो योगेश्वर म्हणून विशेष स्थान धारण करतो, कारण त्याने अर्जुनाला योग, भक्ती आणि वेदांताची सर्वोच्च सत्ये शिकवली. अर्जुनाला ध्यानयोगाच्या वैज्ञानिक तंत्रांचा (टेकनिक) अभ्यास करणारा उत्तम योगी होण्याचा उपदेश करताना, श्रीकृष्ण म्हणतात: “शारीरिक शिस्त पाळणाऱ्या तपस्व्यांहून योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानमार्गाच्या किंवा सकाम कर्ममार्गाच्या अनुयायांपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे; म्हणून हे अर्जुना, तू योगी हो!” (भगवद्गीता 6:46)
जन्माष्टमी आपल्याला या महान अवताराबरोबर आपले मन आणि हृदय जोडण्याची एक सुंदर संधी देते. दरवर्षी यावेळी, योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाचे साधक योगेश्वर कृष्णाच्या सन्मानार्थ सुमारे आठ तासांच्या विशेष दीर्घ ध्यानासाठी एकत्र येतात.
‘योगी कथामृत’ या आत्मचरित्राचे जगप्रसिद्ध लेखक योगानंदजी यांनी त्यांच्या ‘ईश्वर – अर्जुन संवाद (गॉड टॉक्स विथ अर्जुन)’ या पुस्तकामध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय धर्मग्रंथ भगवद्गीतेवर अतिशय सखोल आणि सुस्पष्ट असे अद्वितीय भाष्य प्रस्तुत केले आहे. यातील भगवान श्रीकृष्ण (परमात्म्याचे प्रतीक) आणि त्याचा शिष्य अर्जुन (आदर्श भक्ताच्या आत्म्याचे प्रतीक) यांच्यातील संवाद म्हणजे सर्व सत्य-शोधकांसाठी चिरकालीन आध्यात्मिक मार्गदर्शनच आहे.
योगानंदजींच्या शिकवणीच्या केंद्रस्थानी क्रियायोग ही ध्यान तंत्रांची एक व्यापक वैज्ञानिक प्रणाली आहे. आत्म्याचे हे प्राचीन विज्ञान उच्च आध्यात्मिक जाणीव आणि दैवी अनुभूतीचा आंतरिक आनंद जागृत करण्यासाठी शक्तिशाली पद्धती प्रदान करते. योगानंदजी म्हणतात, “श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवलेल्या क्रियायोग तंत्राचा उल्लेख भगवद्गीतेच्या अध्याय 4 श्लोक 29 आणि अध्याय 5 श्लोक 27-28 मध्ये केलेला आहे. हे ध्यानयोगाचे सर्वोच्च आध्यात्मिक विज्ञान आहे. भौतिक युगात लुप्त पावलेला हा अविनाशी योग महावतार बाबाजींनी आधुनिक युगासाठी पुनरुज्जीवित केला आणि योगदा सत्संग सोसायटी/सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिपच्या गुरूंनी अनेक साधकांना शिकवला.
जगण्याचा आदर्श मार्ग कोणता आहे? भगवान श्रीकृष्ण केवळ आजच्या युगासाठीच नव्हे, तर प्रत्येक युगांसाठी या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर देतात. ते आहे, कर्तव्यदक्ष कृती, अनासक्ती आणि ईश्वरप्राप्तीसाठी ध्यान… या तीन गोष्टींचा योग. हा संतुलित, मध्यम, सुवर्ण मार्ग जगामध्ये संसारात गुंतलेल्या आणि सर्वोच्च आध्यात्मिक ध्येयाची आकांक्षा धरणाऱ्या अशा दोघांच्याहीसाठी आदर्श आहे, असे योगानंदजी त्यांच्या गीता भाष्याच्या प्रस्तावनेत स्पष्ट करतात.
वायएसएस साधकांना जन्माष्टमीच्या दिवशी दिलेल्या संदेशात वायएसएस/एसआरएफ चे अध्यक्ष स्वामी चिदानंद गिरी म्हणतात की, “भगवद्गीता आपल्याला खात्री देते की जसे अनंत परमेश्वराने श्रीकृष्णाच्या रूपाने आपला शिष्य अर्जुन याला आध्यात्मिक आणि भौतिक विजयासाठी मार्गदर्शन केले, तसेच तो आपल्यालाही आपल्या दैनंदिन कुरुक्षेत्राच्या युद्धात आपल्या अंतरंगात खोलवर दडलेले दैवी गुण आणि क्षमता यांची प्रचीती येईपर्यंत मार्गदर्शन करेल.”
जसे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला साहाय्य केले, तसेच तो आपल्या प्रत्येकाला आपल्या अंतरीच्या कुरुक्षेत्रात चाललेल्या आत्मा आणि अहंकार यांच्यातील युद्धात मदत करू शकतो. भगवद्गीतेतून त्याने दिलेला कालातीत उपदेश हाच आहे की सखोल ध्यानाद्वारे ईश्वराशी संपर्क साधणे आणि ईश्वरार्पण भावनेने आपली कर्मे करणे याहून आत्ममुक्तीचा श्रेष्ठ मार्ग नाही.
या जन्माष्टमीच्या दिवशी, योगानंदजींच्या गीतेच्या भाष्यातून घेतलेल्या या उपदेशाचे पालन करण्याचा आपण संकल्प करूया: “जो साधक आदर्श शिष्याचे प्रतीक अशा अर्जुनाचे अनुकरण करेल, स्वतःची निहित कर्तव्ये अनासक्त भावाने पार पाडेल, क्रियायोगासारख्या तंत्राद्वारे योग ध्यानाचा अभ्यास पूर्णत्वाला नेईल, त्यालाही अर्जुनाप्रमाणे ईश्वराचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन प्राप्त होईल आणि तो आत्म-साक्षात्काराच्या प्राप्तीत विजयी होईल.
अधिक माहिती : yssofindia.org