‘योगावतार’ म्हणून पूजनीय मानले गेलेले, प्रख्यात संत श्री श्री लाहिरी महाशय यांनी संपूर्ण विश्वाला क्रियायोगाचा चिरस्थायी वारसा दिला आहे. क्रियायोग ही मोक्षप्राप्तीची ईश्वरनियुक्त साधना आहे. भौतिकतेच्या आहारी न जाणे आणि जीवन ईश्वरावर केंद्रित ठेवणे, या भारतीय आध्यात्मिक परंपरेचे ज्यांनी आदर्शपणे पालन केले, त्या गृहस्थाश्रमी योग्याच्या अनुकरणीय जीवनाचा आपण पुन: अभ्यास करूया.
महान गुरू श्यामाचरण लाहिरी (1828 ते 1895) यांचा जन्म 30 सप्टेंबर रोजी बंगालमधील घुरणी येथे एका धर्मपरायण कुटुंबात झाला. बनारस ह्या पवित्र शहरात लेखपाल म्हणून ते नम्र, निगर्वी जीवन जगले. त्यांना दोन मुले होती. 1861 मध्ये, वयाच्या 33 व्या वर्षी, हिमालयातील राणीखेत येथील पर्वतराजीमध्ये त्यांची आणि अमर महावतार बाबाजींची प्रथम भेट झाली. ही भेट खरे तर गुरू आणि शिष्य यांच्यातील चिरंतन बंध पुन्हा जागृत करणारी होती. हजारो वर्षांपूर्वी, मुक्ती प्राप्त करण्याची क्रिया योग नावाची एक प्राचीन योगिक साधना श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली होती आणि तीच साधना नंतर पतंजली आणि ख्रिस्त यांनाही माहिती होती. बाबाजींनी श्यामाचरणला त्याच पवित्र साधनेची दीक्षा दिली. त्यानंतर, सर्व निष्ठावान साधकांना क्रिया योग साधना प्रदान करण्याचे विशेष कार्य बाबाजींनी त्यांच्यावर सोपवले.
त्यानंतर लवकरच, क्रिया योगाची स्वर्गीय गंगा बनारसच्या एका दुर्गम कोपऱ्यातून भारताच्या दूरवरील प्रदेशांपर्यंत वाहू लागली. लाहिरी महाशयांचा क्रिया योगाचा संदेश सर्वसमावेशक असल्यामुळे तो सांप्रदायिक तत्त्वप्रणाली, जात आणि पंथ यांच्या सीमा ओलांडून समाजातील सर्व स्तरावरील माणसांपर्यंत जाऊन पोहोचला. क्रिया योग हा असा एक प्राणायाम आहे, ज्यात श्वास, मन आणि प्राणशक्तीचा वापर केला जातो. यात पाठीच्या कण्यामध्ये वरून खाली आणि खालून वर अशी प्रसारित केली जाणारी प्राणशक्ती, मेंदू आणि मज्जारज्जूतील केंद्रांना जागृत करते आणि साधकाला ईश्वराच्या अंतस्थ उपस्थितीबद्दल जाणीव करून देते. अशा प्रकारे, आध्यात्मिक उत्क्रांतीला गती मिळते.
या महान गुरूंनी योगशास्त्रातील पुरातन क्लिष्टता कमी करून, त्याला गृहस्थाश्रमी आणि संन्यासी दोघांच्याही आवाक्यात येईल असे व्यावहारिक आध्यात्मिक रूप दिले. त्यांच्या पवित्र शिकवणीमुळे असंख्य साधकांचे जीवन बदलले; त्यांचे काही पट्टशिष्य उन्नत भगवत्स्वरूप अवस्थेपर्यंत पोहोचले. त्यांनी घोषित केले की, “ स्व-प्रयत्नाने ईश्वराशी तादात्म्य प्राप्त करणे शक्य आहे, ते धर्मशास्त्रावरील श्रद्धेवर किंवा कोणा जगन्नियंत्याच्या स्वच्छंद लहरीवर अवलंबून नाही.”
1886 साली निवृत्त झाल्यानंतर लाहिरी महाशय क्वचितच घराबाहेर पडत. बऱ्याचदा त्यांच्या शिष्यगणांना पद्मासनात बसलेल्या त्यांच्या महान गुरूंमध्ये श्वासरहित आणि निद्राविरहीत अवस्था, नाडी आणि हृदयाचे ठोके बंद होणे, अशी अलौकिक वैशिष्ट्ये दिसत. त्यावेळी त्यांच्या शरीरातून परमानंद आणि गहन शांती प्रसारित होत असे.
त्यांच्या शिष्यांमध्ये राजघराण्यातील लोक, विद्वान आणि श्री श्री परमहंस योगानंदांचे गुरू, स्वामी श्री युक्तेश्वर, यांच्यासहित कित्येक श्रेष्ठ संतांचा समावेश होता. 1946 साली प्रकाशित झालेल्या “ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी” या योगानंदांच्या आत्मचरित्रात लाहिरी महाशयांच्या जीवनाचा वृत्तांत आहे. 1917 मध्ये योगानंदजींनी क्रियायोगाच्या शिकवणीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाची रांची येथे स्थापना केली, ज्याचे भाकीत स्वत: योगावतारांनी केले होते. सध्या, या संस्थेची 200 हून अधिक ध्यानकेंद्रे आणि मंडळे, चार आश्रम आणि भारतभर अनेक शिबिर केंद्रे आहेत.
लाहिरी महाशयांनी 26 सप्टेंबर 1895 रोजी बनारस येथे महासमाधी घेतली. आपल्या इच्छेनुसार शरीराचा त्याग करणे आणि चैतन्याच्या उच्च पातळीवर जाणे, हे आत्मज्ञानी व्यक्तींच्या हातात असते. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, “शरीराच्या पिंजऱ्यात अडकून राहू नका; क्रियेच्या गुप्त किल्लीचा उपयोग करून, परमात्म्यात निसटून जाण्यास शिका.” लाहिरी महाशयांनी क्रिया योगाला पुनरुज्जीवन दिल्यामुळेच संपूर्ण जगभरात क्रियेचा प्रसार होऊ शकला आणि साधकांना स्वत:मधील दिव्यत्वाचा शोध घेण्याची आणि गमावलेल्या आत्मिक जाणिवेचा स्वर्ग पुन: प्राप्त करण्याची प्रेरणा मिळाली.
अधिक माहिती : yssofindia.org
लेखिका: रेणुका राणे