नाशिक : प्रतिनिधी
महात्मा गांधींचा विचार बाजूला सारून जगातील माणसांचा विकास होऊ शकत नाही, म्हणूनच गांधी समजून घेण्यासाठी प्रत्येकाने ‘जाणून घेऊ या गांधीजींना’ हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ सर्वोदयी नलिनी नावरेकर यांनी केले.
म. गांधी जयंतीनिमित्त गांधी विचारवंत दिवंगत
प्रा. वासंती सोर यांनी लिहिलेल्या ‘जाणून घेऊ या गांधीजींना’ या पुस्तकाचे प्रकाशन समारंभपूर्वक वैराज हॉल येथे झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वर्धा येथील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानाचार्य डॉ. हेमचंद्र वैदय, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित उपस्थित होते. प्रा. वासंती सोर यांचे सर्व आयुष्यच गांधी विचार आणि जीवनशैलीला समर्पित असल्याचे सांगून नलिनी नावरेकर यांनी प्रकाशित पुस्तकातील गांधी विचारांच्या लेखांचा परामर्श घेतला. जगभरातील नेते आणि विचारवंत आजही असे मानतात की जगाला वाचविण्यासाठी गांधी विचारच उपयुक्त आहेत. हे विचार आचरणात आणणे हे मोठे संचित असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रा. हेमचंद्र वैदय म्हणाले, की आज जगातील प्रत्येक सामान्य व्यक्ती असामान्य होण्याच्या स्पर्धेत आहे. मात्र, गांधीजी हे असामान्य असूनही सामान्य होण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. म्हणूनच जग त्यांच्या विचाराचे अनुयायी झाले. गांधीजींच्या प्रत्येक पुस्तकात सत्य म्हणजेच ईश्वर हे आवर्जून सांगितले आहे. प्रा. सोर यांच्या या पुस्तकातूनही वाचकांना त्याची अनुभूती मिळेल असेही ते म्हणाले. दरम्यान, कार्यक्रमाची सुरूवात बासरीवादक अनिल कुटे यांच्या बालशिष्यांच्या बासरीवादनाने झाली. यावेळी चिमुकल्यांनी ‘रघुपती राघव राजाराम आणि आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.. ’ही भजने बासरीवर वाजवून उपस्थितांची मने जिंकली. तेजस्वीनी सोर-बोनाटे, प्रमिला खर्चे, मुक्ता संध्या श्रीकांत यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रकाशक तुषार सोर यांनी सूत्रसंचालन केले.
—