योग हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे. असे प्राचीन भारतीय ॠषी-मुनींनी ठामपणे सांगितलेले आहे. योगाची दिव्य परंपरा भगवान शंकरापासून सुरू झाली आणि पार्वती माता ते हिरण्यगर्भ ऋषी आणि त्यांच्यापासून पृथ्वीवरील सात दिव्य ऋषींपर्यंत पोहोचली आणि तेथून त्या योग परंपरेचा मानवजातीत प्रसार झाला. अशा रीतीने योगाची दिव्य परंपरा पृथ्वीवर सर्वत्र प्रवाहित झाली.
योगोपनिषदात वर्णन आहे की मानवी शरीर म्हणजे एक रथ आहे. त्या रथाला पाच ज्ञानेंद्रियांचे घोडे जोडलेले आहेत. ते घोडे सतत बाह्य विषयांच्या कुरणात चरत असतात. मन हा त्यांचा लगाम असून तो बुद्धि नावाच्या सारथ्याच्या नियंत्रणासाठी हातात आहे आणि त्या सारथ्याला सूचना देणारा त्या शरीररूपी रथाचा मालक आत्मा मागे बसलेला आहे. बहुसंख्य सामान्य मनुष्यांबाबत असे होते आहे की, हा रथाचा मालकच “आत्मा” झोपलेला आहे, त्यामुळे बुद्धि नावाच्या सारथ्याला रथ चालविण्याच्या योग्य सूचनाच मिळत नाहीत. त्यामुळे तो रथ वेडा-वाकडा धावत आहे. म्हणजेच मनुष्याच्या हातून जीवनात सर्व प्रकारची पापकर्म घडताहेत त्यांचीच फळे त्याला भोगावी लागत आहेत.
मनुष्य दु:खी, असहाय, असमर्थ, क्षुद्र हिन, दुबळा असा झाला आहे. त्यांच्या पाठीचा तेजस्वीतेचा कणाच तुटून गेला आहे. त्याच्या तोंडातून लाचारीची लाळ गळते आहे. मनुष्य मनाने संपूर्णपणे विकलांग झाला आहे. त्याला या परिस्थितीतून कोण सावरणार?
आता येथे प्राचीन भारतीय ऋषी-मुनींनी संशोधित केलेल्या योग विद्येची खरी भूमिका सुरू होते. भारतीय ऋणींनी भगीरथ प्रयत्न करून यम-नियमांपासून ते समाधिपर्यंत प्रयोगाधिष्ठीत योगशास्त्र शोधून काढले. हा सुखी जीवन जगण्याचा परीस माणसाच्या हातात दिला. हे त्यांचे मानव जातीवरील अगणित उपकार आहेत.
आजच्या युगात योगविद्येचे ओमकार पूर्ण विश्वाच्या गाभार्यात घुमू लागले आहेत. हे प्राचीन ऋषीमुनींच्या निस्वार्थ तपश्चर्यचे फळच आहे. त्यांनी लावलेल्या योग विद्येच्या बीजाला आज संपूर्ण विश्वातील प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात अंकुर फुटावयास लागले आहेत. सुमारे पंचवीशे वर्षापूर्वी महर्षि पंतजलि माऊलींनी योगाला अत्यंत व्यवस्थित व शास्त्रीय असे स्वरूप दिले आणि त्याला दर्शनाचा दर्जा प्राप्त करून दिला. हे त्यांचे योगशास्त्रातील महनीय योगदान आहे. महर्षि पंतजलि मनुष्याच्या अंतःर्मनाचे खरे मनोवैज्ञानिक होते.
योग म्हणजे केवळ आसन किंवा प्राणायाम आहे का ? कित्येकांना वाटते की आसन व प्राणायाम केला की झाला योग परंतु असे नाही तर आसन व प्राणायाम हा योगाचा फक्त थोडा-थोडासा अंश आहे. योग ही सुखी, समृद्ध व प्रसन्नतेने आणि आनंदान जीवन जगण्याची एक आलौकिक शैली आहे. योगाच्या पद्धतीने जर मनुष्य जीवन जगू लागला तर त्यांच्या शरीर, मन व आत्मा या त्री स्तरावर अतिशय सकारात्मक परिणाम होतात. तसेच त्याच्या वैयक्तिक, कौटुंबीक व सामाजिक जीवनात आनंदाचे झरे वाहून निरोगी, स्वस्थ व निरामय जीवन जगू लागतो. हे आधुनिक संशोधकांनी प्रयोग करून सिद्ध केले आहे. योग हा शब्द यूज या धातूपासून तयार झाला आहे. यूज यांचा आत्मा आणि परमात्मा, तसेच मन आणि आत्मा यांना जोडणे आणि तेच खरे योगाचे उद्दिष्ट आहे.
आत्मा ही शरीराची व्यवस्था सांभाळणारी अर्मूत शक्ति आहे आणि परमात्मा ही अखिल ब्रह्मांडाला सांभाळणारी अमुर्त वैश्विक शक्ती आहे. या दोन्ही शक्ती पंचज्ञानेंद्रिये यांच्या कक्षेपलिकडे आहेत. म्हणून त्या सामान्य माणसाला खोट्या वाटतात. परंतू या शक्ती प्रचंड सामर्थ्यवान आहेत.
योगाव्दारे प्रत्येक मनुष्याला आत्मबोध झाला की, मी आत्मस्वरूप आहे. मी वैश्विक शक्तीचा अंश आहे. मी सिंहाचा छावा असून जीवनातल्या संकटांना व प्रतिकूलतेला तोंड न देता बकरीसारखा बँ बँ करतो आहे. या आत्मबोधामुळे त्याची मानसिक दुर्बलता येथेच कमी होते व मनःशक्ती वाढून तो तेजस्वी व सुखी जीवन जगू शकतो.
– लेखिका : योगशास्त्र व निसर्गोपचाराच्या अभ्यासक सुनीता पाटील
(डिप्लोमा इन नॅचरोपॅथी, यौगिक सायन्स)
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्गोपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतन, नाशिक