हल्लीच्या युगात, आधुनिक जगाला योगशास्त्राचे फायदे अधिकाधिक पटायला लागले आहेत. जगभरातील सर्व देशांमध्ये योगाविषयी आस्था आहे आणि त्याच्या उपयुक्ततेला वैश्विक मान्यता लाभली आहे, याची साक्ष म्हणूनच दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.
जागतिक स्तरावर प्रशंसा प्राप्त झालेले, अभिजात आध्यात्मिक पुस्तक, “योगी कथामृत” [ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी] चे लेखक, श्री श्री परमहंस योगानंद, यांनी योगातील बारकावे पाश्चिमात्य लोकांना समजावून सांगण्यात आणि योगाचा अभ्यास पूर्वेकडील लोकांपुरता मर्यादित ठेवण्याची गरज नाही हे सत्य अधोरेखित करण्यात, प्रमुख भूमिका बजावली. अमेरिकेमध्ये त्यांना त्यांच्या योग-ध्यान शिकवणीसाठी व्यापक ग्रहणक्षमता दिसून आली आणि पुष्कळ अनुयायी वर्ग मिळाला, आणि अखेरीस त्यांची शिकवण जगाच्या बाकी सर्व भागांत पोहोचली. आज योगानंदजींना पश्चिमेत योगाचे जनक म्हणून ओळखले जाते.
‘योग’ या शब्दाचा अर्थ (ईश्वराशी) ‘जोडले जाणे’ असा होतो. परमात्म्याशी असे जोडले जाणे, हे प्रत्येक मनुष्याचे अंगभूत आणि सर्वोच्च ध्येय आहे, असे सर्व संत महात्म्यांनी सांगितलेले आहे. त्या सर्वशक्तिमान परमेश्वराशी तादात्म्य साधण्याची एकमेव पद्धत म्हणजे योग आणि स्वाभाविकपणे त्याच्यापर्यंत घेऊन जाणारा मार्ग म्हणजेच ध्यान साधना.
योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायामाचा एक संच नाही, तर त्यातून आपल्याला प्रत्यक्षपणे स्वतःवर विजय मिळवून अखेरीस ईश्वर-साक्षात्काराच्या ध्येयाकडे घेऊन जाणारा मार्ग मिळतो, याचा आज जगभरातील कोट्यावधी सामान्य लोकांना प्रत्यय आला आहे.
सर्व महान संत एकमुखाने सांगतात की महर्षी पतंजलीनी त्यांच्या ग्रंथात सांगितलेल्या अष्टांग योगाच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्याला अंतिम ध्येय निश्चितच प्राप्त होते. भगवद्गीतेमध्ये क्रियायोगाच्या शास्त्राचा विशेष उल्लेख केला आहे आणि पुढे असेही निक्षून सांगतले आहे की योगी हा एक आध्यात्मिक परम योद्धा आहे आणि जर त्याने योगसाधनेत सातत्य ठेवले, तर त्याला अंततः ईश्वरप्राप्ती होईल.
क्रियायोग ही योगाची विशिष्ट शाखा आहे जी योगानंदजींनी अधोरेखित केली आणि त्यांच्या शिकवणीद्वारे जगाच्या लक्षात आणून दिली. क्रियायोग ही एक साधी, मानसिक-शारीरिक पद्धत आहे, ज्याद्वारे मानवी रक्तातील कार्बन डाय ऑक्साइड काढून टाकला जातो आणि त्याचे ऑक्सिजनद्वारे पुनःप्रभारण (रीचार्जिंग) केले जाते. परंतु क्रियायोगाचा खरा फायदा त्याच्या आध्यात्मिक मूल्यामध्ये आहे, कारण त्याची नियमित साधना करणारा साधक आत्म-साक्षात्काराच्या दिशेने वेगाने प्रगती करण्यास सक्षम होतो.
योगानंदजींचे महान गुरू, स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांनी त्यांच्या तरुण विद्यार्थ्याला ‘जगद्गुरू’ किंवा जागतिक शिक्षकाच्या भूमिकेसाठी तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. युक्तेश्वरजींना क्रियायोग साधनेची दीक्षा त्यांचे स्वतःचे गुरू, लाहिरी महाशय यांनी दिली होती. लाहिरी महाशयांची अजरामर महावतार बाबाजींबरोबर जी अद्भुत, प्रेरणादायी आणि नाट्यमय भेट झाली, त्याचे रसभरीत वर्णन ‘योगी कथामृत’ मध्ये केले आहे. त्या महत्त्वपूर्ण भेटीतच, बाबाजींनी आपल्या प्रमुख शिष्याला मध्ययुगीन काळात लुप्त झालेल्या क्रियायोगाच्या प्राचीन विज्ञानाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तयार केले. तदुपरांत, बाबाजींनी लाहिरी महाशयांना सर्व निष्ठावान भक्तांना क्रियायोगाची दीक्षा देण्याची परवानगी दिली, आणि योगानंदजींनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप/योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली ही प्रथा तेव्हापासून चालू आहे.
योगानंदजींच्या आत्मचरित्रातील शेवटच्या ओळी आपल्याला क्रियायोगाची प्रामाणिकपणे साधना करण्याची संस्मरणीय प्रेरणा देतात. ‘चमकणाऱ्या रत्नांप्रमाणे जगभर पसरलेल्या हजारो क्रियायोगी साधकांना माझे प्रेमपूर्ण तरंग पाठवत असताना मी पुष्कळदा कृतज्ञबुद्धीने विचार करू लागतो: “परमेश्वरा, तू या बैराग्याला केवढे मोठे कुटुंब दिले आहेस!”’ अधिक माहितीसाठी: yssi.org
—