2“मी तुला माझे बिनशर्त प्रेम देतो” असे त्यांच्या निष्कलंक प्रेमाचे शाश्वत वचन देताना ‘मूर्तिमंत ज्ञानस्वरूप’ ज्ञानावतार स्वामी श्रीयुक्तेश्वर गिरींनी तरुण मुकुंदाचे (नंतर परमहंस योगानंद म्हणून ओळखले जाणारे, योगदा सत्संग सोसायटीचे संस्थापक, पश्चिमेकडील योगाचे जनक आणि सर्वाधिक खपाच्या ‘योगी कथामृत’ या अभिजात आध्यात्मिक पुस्तकाचे लेखक) त्यांच्या आश्रमात स्वागत केले. नियतीच्या पडद्याआड लपलेल्या नाट्याविषयी अनभिज्ञ असलेल्या योगानंदांच्या भेटीची त्यांचे स्थितप्रज्ञ गुरू दीड दशकापासून अपेक्षा करत होते आणि आतुरतेने वाट पाहत होते.
जानेवारी 1894 मध्ये अलाहाबाद येथील पवित्र कुंभमेळ्यात श्री युक्तेश्वरजी आणि हिमालयातील अजरामर गुरू महावतर बाबाजी यांची भेट झाली. योगानंदजी पुन्हा अवतार घेऊन आले आहेत (मुकुंदाचा जन्म 5 जानेवारी, 1893 रोजी गोरखपूर येथे झालेला होता) याची जाणीव असल्याने, बाबाजींनी श्री युक्तेश्वरजींना वचन दिले की, ते त्यांच्याकडे एक तरुण शिष्य पाठवतील, ज्याला त्यांनी “पश्चिमेकडे योगाचा प्रसार” करण्यासाठी प्रशिक्षित करावे. बाबाजींनी त्यांना सनातन धर्म आणि ख्रिश्चन धर्म यांच्या धर्मग्रंथातील अंतर्निहित सुसंगततेविषयी एक लहानसा तुलनात्मक लेख लिहिण्यास सांगितले. “मी पाहतो आहे की तुला पूर्वेबरोबरच पश्चिमेतही रस आहे. सर्व मानवांना सामावून घेऊ शकणाऱ्या, तुझ्या विशाल हृदयातील वेदना मला जाणवल्या.” अशा शब्दात बाबाजींनी त्यांचे कौतुक केले. त्यांना समांतर संदर्भांद्वारे हे दाखवण्यास सांगितले की, “ईश्वराच्या प्रेरित पुत्रांनी सांगितलेली सत्ये एकच आहेत.”
श्री युक्तेश्वरजी गिरींनी ही दैवी आज्ञा त्यांच्या स्वाभाविक नम्रतेने स्वीकारली आणि अंत:प्रेरित बुद्धीने आणि सखोल अभ्यासाने, त्यांनी अल्पावधीतच ‘द होली सायन्स’ हे पुस्तक लिहिले. पुण्यशील प्रभू येशूचे शब्द उद्धृत करून, “त्यांनी दाखवून दिले की येशूची शिकवण ही वेदांतील आविष्करणाशी सुसंगत आहे.” यानंतर, या पुस्तकातील निरनिराळ्या सूत्रात श्री युक्तेश्वरजींनी मानवी हृदयाच्या पाच अवस्था स्पष्ट केल्या आहेत. प्रामुख्याने; तामस, राजस, स्थिर, समर्पित आणि शुद्ध. त्यांनी प्रबोधन केल्यानुसार; “हृदयाच्या या वेगवेगळ्या अवस्थांनुसार माणसाचे वर्गीकरण केले जाते आणि त्याच्या उत्क्रांतीची स्थिती निश्चित केली जाते.”
10 मे, 1855 रोजी सेरामपूर, बंगाल येथे प्रियनाथ करार म्हणून जन्म घेतलेले, ते बनारस येथील श्रेष्ठ योगी श्री लाहिरी महाशयांचे शिष्य बनले. नंतर त्यांनी संन्यासाश्रमात प्रवेश घेतला आणि त्यांना स्वामी श्री युक्तेश्वरगिरी हे नवीन नाव मिळाले.
बाबाजींना दिलेल्या वचनाचा आदर राखत, श्री युक्तेश्वरजींनी तरुण योगानंदजींना त्यांच्या आश्रमात एक दशक प्रशिक्षण दिले. योगानंदजींनी त्यांच्या ‘योगी कथामृत’ या आत्मचरित्रात ‘गुरुजींच्या आश्रमातील माझी काही वर्षे’ या प्रकरणात बंगालचा सिंह – श्री युक्तेश्वरजी, यांच्यासोबतच्या जीवनाचे अगदी बोलके आणि प्रेमळ विवरण दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, त्यांनी गुरूला कधीही मोहात पडलेले किंवा भावनिकदृष्ट्या लोभ, क्रोध किंवा मानवी आसक्ती यांनी उत्तेजित झालेले पाहिले नाही. त्यांच्या सभोवताली “स्वास्थदायक शांती” ची आभा होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या कित्येक शिष्यांना त्यांनी पुढील सावध शब्दांत क्रियायोगाच्या (ईश्वर प्राप्तीसाठी ध्यान करण्याची प्राचीन वैज्ञानिक साधना) आवश्यकतेची आठवण करून दिली; “मायेचा अंधार गपचूप जवळ-जवळ येतो आहे. चला जलदपणे आपल्या अंतरीच्या गृहात जाऊया.”
श्री युक्तेश्वरजींना त्यांचा सल्ला घेणाऱ्या प्रत्येक शिष्याप्रती एक गंभीर जबाबदारी वाटत असे. त्यांचे प्रशिक्षण म्हणजे प्रखर अग्नीमध्ये शुद्ध करणे होते; त्यामध्ये जळणे हे सामान्य सहनशक्ती पलीकडचे होते. जेव्हा योगानंदजींना त्याच्या गुरूच्या कार्याचे निरपेक्ष स्वरूप समजले, तेव्हा त्यांना ते विश्वासू, विचारशील आणि नि:शब्दपणे प्रेमळ असल्याचे आढळले.
योगानंद्जी आपल्या प्रिय गुरुंबद्दल लिहितात; “त्यांचा स्वभाव जरा विचित्र होता, जो निखालसपणे समजून येणारा नव्हता; एक खोल आणि सुस्थिर स्वभाव, बाह्य जगासाठी अनाकलनीय असा, ज्याची मूल्ये त्यांनी फार पूर्वीच ओलांडलेली होती.” अधिक माहिती : yssofindia.org
लेखिका : संध्या एस. नायर.