नाशिक : (प्रा. राजेंद्र आढाव यांजकडून)
श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्यावतीने ‘क्यू स्पायडर्स ‘ या प्रशिक्षण संस्थेसाठी नुकतेच दोन दिवसीय पूल कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस ड्राईव्हसाठी १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
‘क्यू स्पायडर्स ‘ ही नामांकित सॉफ्टवेअर प्रशिक्षण संस्था आहे. तरुणांना यशस्वी करिअर घडवण्याची संधी देण्याचे कार्य संस्थेकडून केले जाते. दोन दिवसीय पूल कॅम्पस ड्राइव्हव्दारे एकूण 31 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 11 विद्यार्थ्यांची निवड झाली. इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांनी देखील निवड यादीत स्थान मिळवले आहे. त्यात जे. आय. टी. महाविद्यालयातील सात, मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार, गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार, सपट महाविद्यालयातील दोन, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातून दोन, तर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे. या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत ऑनलाइन अभियोग्यता चाचणी आणि निवडलेल्या उमेदवारांसाठी गट चर्चा आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत समाविष्ट होती.
निवडलेले विद्यार्थी आता प्रशिक्षणासह प्लेसमेंट प्रक्रियेतून जातील. श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीश संघवी, व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल संघवी आणि श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ. प्रियंका झंवर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे ट्रेनींग प्लेसमेंट अधिकारी, प्रा. पुस्पेंदू बिस्वास तसेच महाविद्यालयाच्या इतर सर्व शिक्षकवर्गाने कॅम्पस ड्राईव्हच्या यशस्वीतेसाठी मोलाची भूमिका बजावली.
—