नाशिक : प्रतिनिधी
झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सायबर क्राईमचे प्रमाण फार वाढले आहे. मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अथवा वेबसाईटमध्ये राहून गेलेल्या एका त्रुटी अथवा बगमुळे हजारो लाखोंचे नुकसान कंपनीला सहन करावे लागते. हॅकर्स अशा वेबसाईट आणि ॲप्सचा सुगावा लावतात आणि वेबसाईटवर अटॅक करून डल्ला मारतात. अशा परिस्थितीत चांगल्या इथिकल हॅकर्सची खूप मागणी वाढली आहे. बग बाउंटी आणि सायबर सिक्युरिटीमध्ये निष्णात असलेल्या व्यक्तीला आर्थिक मदत अथवा हॉल ऑफ फेम म्हणून प्रतिष्ठा कंपन्यांकडून देण्यात येते.
पार्थ भंडारीचे यश
महावीर पॉलिटेक्निक, नाशिक येथील तृतीय वर्ष आयटी इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रात चांगलीच भरारी घेत आहेत. पार्थ दिपक भंडारी या विद्यार्थ्याने मोनाश विद्यापीठ, ऑस्ट्रोलिया, बोट लाईफ स्टाईल आणि कोकाकोला या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या आणि संस्थांच्या बेबसाईटमधील बग शोधले आहेत. या बगची माहिती रिपोर्ट करून त्या बगची तपासणी केली गेली आणि त्यानंतर त्याला कंपनीच्या डेटा सिक्युरिटीत चांगले योगदान दिल्याने सप्रेम भेट म्हणून आणि हॉल ऑफ फेम या संस्थांकडून देण्यात आले आहे. लाखात एक विद्यार्थी असे बग्ज शोधणारे असतात. सलग तीन संस्थांचे बग दिपकने शोधल्याने, तसेच तिन्ही संस्थांकडून हा सन्मान मिळाल्याने सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
ज्ञानेश्वर थोरात प्रथम
याच काळात घनश्याम ज्ञानेश्वर थोरात या विद्यार्थ्याने सायबर संस्कार ऑलंम्पियाड या सायबर सिक्युरीवर आधारित ऑनलाईन परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. सायबर संस्कार संस्थेकडून त्याला एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक, सर्टिफिकेट आणि काही गिफ्ट व्हाउचर देण्यात आले आहे. इथिकल हॅकर म्हणून त्याच्या करिअरची सुरवात झाली आहे.
यांचे मार्गदर्शन लाभले
या दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या कॉप्युटर इंजिनीअरीग विभागाचे विभागप्रमुख प्रा. अनुप सोनवणे, सायबर संस्कारचे प्रा. तन्मय दिक्षित यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. हरीश संघवी, कार्यकारी विश्वस्थ श्री. राहुल संघवी, सोसायटी समन्वयिका तसेच डीन डॉ. प्रियंका झंवर, प्राचार्य डॉ. संभाजी सगरे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
—