श्रीकृष्णाचे जीवन लीलांनी भरलेले आहे. रासलीला म्हणजे आत्म्याचे परमात्म्याच्या हृदय, वाणी, प्राण आणि बुद्धी बरोबरचे मिलन. जो पर्यंत विषयांचा मनाने त्याग होत नाही, तोपर्यंत भक्तीमध्ये स्वारस्य लाभत नाही. कृष्णार्पण हा मानवी जीवनातील समर्पणाचा सर्वात मोठा भाव आहे.
—
राम आणि कृष्ण यांच्या आलौकिक कार्यामुळे भारतीय संस्कृतीला एक लौकिक प्राप्त झाला आहे. जनमानसात चांगले विचार रुजवावेत, आदर्श जीवनाची पायवाट मिळावी म्हणून थोर पुरुषांचे जन्मोत्सव साजरे केले जातात.
सर्वांच्या मनाला मोहित करणारा तो श्रीकृष्ण. आमच्या इंद्रियांचे रक्षण करुन, त्यांना ताब्यात ठेवणारा तो गोविंद. दुःखाचे हरण करणारा तो हरे.
आमच्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, वासना या मूर राक्षसाला ठार मारणारा तो मुरारी. तुम्ही आमचे नाथ, आम्ही तुमचे सेवक हा भाव जागृत करणारा तो नाथ. वासुदेव या शब्दातील असु म्हणजे प्राण. श्रीकृष्णाशी अनुसंधान साधने म्हणजेच, “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी” हे नाथ नारायण वासुदेव”.
कृष्णार्पण हा मानवी जीवनाचा समर्पणाचा सर्वात मोठा भाव आहे. पाप जाणतेपणाने अथवा अजाणतेपणे कसेही केले, तरी पापाची शिक्षा ही भोगावीच लागते. पुण्य भोगाची इच्छा करता येत नाही. पुण्य कृष्णार्पण होते, पण पापाचे प्रायश्चित्त हे भोगावेच लागते.
प्रत्येक पाप कर्माची शिक्षा मी मागेन आणि केलेले पुण्य तुम्हाला अर्पण करीन. देवाला उत्तम वस्तू अर्पण करणं हाच भक्तीतला पुरुषार्थ आहे. जीवनात प्रवृत्ती आणि निवृत्ती एकाच वेळी राहु शकत नाहीत. निवृत्तीचा आनंद हवा असेल तर प्रवृत्तीला मनातून काढून टाकले पाहिजे.
मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना ताब्यात ठेवता येत नसल्यामुळे आम्हाला जीवनाची उंची वाढवता येत नाही. आज मानवी मनावर सुवासनेपेक्षा कुवासनेचा प्रभाव जास्त आहे. आयुष्य वासना, सौंदर्य वासना, आरोग्य वासना हे सारे कुवासनेचे प्रकार आहेत.
पुतना ही मनामनात राज्य करीत आहे. पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही ती पुतना. अपवित्रतेतून अज्ञान आणि त्यातून वासना जन्म घेते. पुतना हे वासनेच रुप आहे. भागवतात पुतना कृष्णाला
चतुर्दशीला दूध पाजण्यासाठी आल्याचा उल्लेख आहे. मानवी मनात पुतना अर्थात वासना चौदा ठिकाणी असते. पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेद्रिंय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यात पुतनेचा वास असतो.
रामायणात सुद्धा कैकयीने रामाला चौदा वर्ष वनवासात राहावयास सांगितले. रावण सुद्धा कायमस्वरुपी चौदा ठिकाणी वास करतो. त्याचा नि:ष्पात करण्यासाठी, रामाने चौदा वर्ष वनवासात राहून तप:श्चर्या केली. रज, सत्व, तम या गुणात जो फसला, त्याला पुतना अर्थात वासना मारते.
रासलीला म्हणजे आत्म्याचे परमात्म्याच्या हृदय, वाणी, प्राण आणि बुद्धी बरोबरचे मिलन.
हाडे, मांस, रक्त, मलमुत्र, दुर्गंधी यांनी शरीर भरलेले आहे. शरीरात काही सुंदर नाही, याची जाण गोपींना होती. संसाराची सुंदर कल्पना मन अशांत करते, तर परमात्म्याच्या सौंदर्याच्या विचाराने मनाला शांती लाभते.
जोपर्यंत विषयांचा त्याग मनाने होत नाही, तोपर्यंत भक्तीमध्ये स्वारस्य लाभत नाही. शरीराने कोठेही असले तरी, मनाने परमेश्वराचा विचार होत असेल तर भक्ती सहज साध्य होते.
रासलीला ही स्त्री पुरुष यांचा मिलन नसून, जीव आणि परमात्मा ह्यांचे मिलन आहे. मायेचं आवरण नसलेला जीव म्हणजे शुद्ध भाव. अशा शुद्ध जीवाचा ईश्वराबरोबरचा विलास म्हणजे रासलीला.
ईश्वराला भेटण्यासाठी मनात आतुरता आणि आर्तता असावीच, पण त्याबरोबर लौकिक नसावा.
सत्य, तप, पावित्र्य आणि दया या चार प्रमुख गुणांवर मानवतेचा धर्म आधारलेला आहे. सत्याच्या ठायी परमात्म्याचा वास असतो. सत्याने नराचा नारायण होतो. इंद्रियांचा स्वामी आत्म्याला आपलसं करणं म्हणजे तप. मन स्वच्छ ठेऊन व्यवहार केला तर, ईश्वराशी अनुसंधान साधता येते. आपल्या प्रत्येक कृतीतून दुसऱ्याचा विचार करणे म्हणजे दया. मानवी धर्माच्या चार अंगांपैकी सत्य हे सर्वांत उच्च आहे. लक्ष्मी, दान, सदाचार आणि यश हे सत्याच्या आश्रयाने राहतात. या चारांचे पालन करणे म्हणजेच धर्माचे पालन करणे होय.
श्रीकृष्णाचं जीवन लीलांनी भरलेलं आहे. कृष्णलीला मनोरंजनाचा भाग नसून मनोमंथनाचा भाग आहे. ईश्वर जेंव्हा एखादी क्रिया करतो, तेंव्हा ती क्रिया नसून लीला असते. क्रिया आणि लिला यामध्ये फरक आहे.
ज्याच्या मागे स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, ती क्रिया व ज्याच्या मागे कर्तृत्वाचा अभिमान नाही व दुसऱ्याला सुखी करण्याची भावना आहे, ती लीला. अहंकार म्हणजे फुटकी घागर. द्रौपदीला तिळा एव्हढा झालेला अहंकार कृष्णाला सहन झाला नाही. कुळ, वित्त, रुप, शिक्षण, शौर्य, दान, तप यांच्या अहंकाराने कृष्ण भक्तीचा आनंद आम्हांला प्राप्त होत नाही.
आमची बुद्धी ही ऐेहिक सुखाचीच सेवा करीत असल्यामुळे, काम, क्रोध, लोभ या तिन्हींनी बरबटलेली आहे.
आमची बुद्धी ही कुब्जा आहे.
कुब्जा ही जो पर्यंत ऐहिक सुखाची अर्थात कंसाची सेवा करीत होती, तो पर्यंत ती तीन ठिकाणी वाकडी होती. पण कृष्ण भक्तीत तीचे तिन्ही दोष नष्ट झाले.
धनदौलत, पैश्याने प्रत्येकाची घरे भरलेली आहेत पण रुक्मिणी आहे का?
लक्ष्मी म्हणजे निती आणि अनितीने मिळविलेले धन. यातील धन भोगविलासासाठी आणि सत्कार्यात दोन्हीकडे खर्च होते. धर्माने आणि नितीने मिळालेले धन हे मनाला शांतता देते. वाईट मार्गाने व अनितीने मिळवलेले धन म्हणजे अलक्ष्मी. हे धन माणसाला दुःखाच्या खाईत लोटते.
रुक्मिणी ही महालक्ष्मी आहे, ती नारायणालाच प्राप्त होते. रुक्मिणी स्वयंवर हा लौकिकाचा भाग नाही तर जीव आणि परमात्मा यांचा ॠणानुबंध आहे.
जरासंध, दुर्योधन, दुःशासन, शकुनी, जयद्रथ या वाईट प्रवृत्तीने अनाचार, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचाराचे थैमान घातले आहे. कृष्णनितीने या पाप्यांना संपविण्यासाठी आनितीचा वापर अथवा कठोर व्हावे लागेल. नाहीतर नैतिकता अर्थहीन होईल.
नंद आणि यशोदा हे दोघे गोकुळवासियांचे दैवत होते. वसुदेवाचे शुद्ध सत्वगुण आणि देवकीची निष्काम बुद्धी यांच्या मिलनातून ईश्वराने जन्म घेतला. दुसऱ्याला यश देणारी ती यशोदेची ममता त्या कृष्णाला मोठं करु शकली.
मानवाचे सत्कर्म हा त्याचा जीवनातला सुगंध असतो. कर्तव्याची जाण ठेऊन निष्पापतेने केलेले कर्म म्हणजेच “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी”.
– अनंत भ. कुलकर्णी