श्री श्री महावतार बाबाजी : एक दैवी अवतार
असे म्हणतात की अवतारी पुरुषाचे वास्तव्य सर्वव्यापी परमात्म्यात असते. तो स्थल-कालाच्या अखंड चाकोरीच्या पलीकडे असतो; त्याच्यासाठी भूत, वर्तमान आणि भविष्य अशी कोणतीही सापेक्षता नसते. त्याचे जिवंत अस्तित्व, अमर्त्य ईश्वराचे मूर्त स्वरूप, हे मानवी आकलनाच्या पलीकडचे आहे. शतकानुशतके अज्ञातपणे कार्यरत असणारे अमर योगी, श्री श्री महावतार बाबाजी हे मानवतेचे असेच एक तारणहार आहेत.
श्री श्री परमहंस योगानंदांनी लिहिलेल्या “योगी कथामृत” [ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी] या सर्वदूर प्रशंसा प्राप्त झालेल्या, अभिजात अध्यात्मिक पुस्तकामध्ये त्यांच्याविषयी जे लिहिले आहे, त्याद्वारेच जगाला महावतार बाबाजींची प्रामुख्याने ओळख झाली. ते आज जगातील सर्व क्रियायोग्यांचे परमगुरू आहेत आणि त्यांच्या शिष्यांच्या आध्यात्मिक प्रयत्नांमध्ये दयाळूपणे मार्गदर्शन करतात. मध्ययुगीन काळात लुप्त झालेले क्रियायोगाचे प्राचीन तंत्र बाबाजींनीच पुन्हा शोधले आणि स्पष्ट केले.
आधुनिक युगात क्रियायोग विज्ञानाचे पुनरुज्जीवन
दीडशेहून अधिक वर्षांपूर्वी, 1861 मध्ये, राणीखेत (उत्तराखंड) जवळ, हिमालयातील एका गुहेत, बाबाजींनी जेव्हा श्री श्री लाहिरी महाशयांना हे पवित्र विज्ञान दिले, तेव्हापासून क्रियायोगाचा प्रवास सुरू झाला. या प्रसंगी बाबाजी म्हणाले, “या एकोणीसाव्या शतकात मी तुझ्याद्वारे द्वारे जगाला जो क्रियायोग देत आहे, तो हजारो वर्षांपूर्वी कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या विज्ञानाचे पुनरुज्जीवन आहे; आणि ते विज्ञान नंतर पतंजली आणि ख्रिस्त, आणि सेंट जॉन, सेंट पॉल आणि इतर शिष्यांना ज्ञात झाले.”
बाबाजींनी लाहिरी महाशयांना ‘जे नम्रपणे मागतील त्या सर्व सत्यशोधकांना’ क्रियायोग देण्याची परवानगी दिली. प्राणायामाचा सर्वोच्च प्रकार मानला जाणारा क्रियायोग म्हणजे एक मानसिक-शारीरिक पद्धत, तसेच एक संपूर्ण विज्ञानसुद्धा आहे. ते साधकाला कालांतराने त्याचा श्वास, आंतरिक प्राणशक्ती तसेच मन या सूक्ष्म शक्तींवर प्रभुत्व मिळवून देते. परिणामतः, उच्च आणि आध्यात्मिक मुक्तीदायक कार्यासाठी या सूक्ष्म क्षमता बंधमुक्त होतात. क्रियेची पद्धतशीर परिणामकारकता जीवात्म्याचा त्याच्या अहंकार-बद्ध अस्तित्वापासून वैश्विक जाणीवेपर्यंतचा प्रवास जलद करते.
योगानंदजींनी त्यांचे गुरू श्री युक्तेश्वर (लाहिरी महाशयांचे शिष्य) यांच्या आज्ञेवरून, क्रियायोगाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी आणि सत्यशोधकांना ईश्वराशी वैयक्तिक संपर्क साधण्यास मदत करण्यासाठी, 1917 मध्ये भारतात योगदा सत्संग सोसायटीची (वायएसएस) आणि 1920 मध्ये अमेरिकेत सेल्फ-रिलाइझेशन फेलोशिपची (एसआरएफ) स्थापना केली.
त्यांच्या अमेरिकेतील कार्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी, तरुण संन्यासी योगानंदजींना त्यांच्या वडिलांच्या कोलकाता येथील घरी, बाबाजींनी 1920 साली ज्या दिवशी भेट दिली, त्या शुभ प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी 25 जुलै हा दिवस वायएसएस द्वारे महावतार बाबाजी स्मृती दिवस या नावाने साजरा केला जातो. बाबाजींनी त्यांना आश्वस्त केले आणि पश्चिमेत क्रियायोगाचा संदेश प्रसारित करण्यासाठी निवडलेली व्यक्ती म्हणून त्यांची नियुक्ती केली.
विश्वकल्याणासाठी एक दैवी योजना अस्तित्वात आहे
योगानंदजी बाबाजींना आधुनिक भारताचे योगी-ख्रिस्त असे संबोधतात. ते ठामपणे सांगतात की, बाबाजी आणि ख्रिस्त यांच्यात भावैक्य आहे, ते दोघे मुक्तीची स्पंदने पाठवत असतात, या युगासाठी ते आध्यात्मिक मोक्षाची योजना करत आहेत आणि राष्ट्रांना युद्धे, वंश द्वेष, धार्मिक सांप्रदायिकता आणि भौतिकवादाच्या दुष्परिणामांचा त्याग करण्यास प्रेरणा देत असतात. योगाच्या आत्म-मुक्तीचा पूर्व आणि पश्चिमेकडे समान प्रसार करण्याची आवश्यकता बाबाजींना जाणवते.
“योगी कथामृत” मध्ये उल्लेख आहे की बाबाजी आपल्या उन्नत शिष्यांच्या समूहासह हिमालयातील दुर्गम प्रदेशात जागोजागी फिरतात आणि केवळ काही निवडक लोकांसमोर स्वतःला प्रकट करतात. या दैवी अवताराच्या सर्व उत्कट भक्तांनी, “जेव्हा जेव्हा कोणी बाबाजींचे नाव अत्यंत पूज्य बुद्धीने घेत असतो, तेव्हा तेव्हा त्या भक्तावर ताबडतोब अनुग्रह होत असतो.” हे लाहिरी महाशयांचे विधान सत्य असल्याची ग्वाही दिलेली आहे. खरंच, सर्व निष्ठावान क्रियायोग्यांना त्यांच्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गावर त्यांचे रक्षण आणि मार्गदर्शन करण्याचे वचन महावतार बाबाजींनी दिले आहे. अधिक माहिती: yssofindia.org
—