श्रीकृष्णजन्माष्टमी हे गीतेला जवळून जाणून घेण्याचे पर्व

0

“हे अर्जुना, तू योगी हो”, अशा अजरामर शब्दांत भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर त्याच्या अत्यंत प्रगत भक्ताला अंतिम मुक्तीसाठी योगमार्गाचा अवलंब करण्यास सांगितले. निःसंशयपणे, भगवदगीता हा जीवनाच्या उद्देशाचे सार सांगणारा आणि सर्व मानवांनी ज्याचा अंत:करणापासून शोध घेतला पाहिजे ते अंतिम सत्य समजावून देणारा दिव्य ग्रंथ आहे. त्या धर्मग्रंथात भगवंताने त्याच्या काहीशा संभ्रमात पडलेल्या आणि भयचकित झालेल्या शिष्याला दिलेले कालातीत प्रवचन समाविष्ट आहे. त्यात त्याने सांगितले आहे की, इतर कशाहीपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दे आणि कर्मफळांच्या आसक्तीने बंधनात राहू नकोस.
श्री श्री परमहंस योगानंद, “योगी कथामृत” या जगप्रसिद्ध अभिजात आध्यात्मिक पुस्तकाचे लेखक, त्यांच्या “ईश्वर अर्जुन संवाद” ह्या गीतेवरील विवेचनात्मक ग्रंथात श्रीकृष्णाने सांगितलेल्या चिरंतन संदेशाचा खरा अर्थ अतिशय विस्तृतपणे विशद करतात. महाभारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरुक्षेत्रावरील युद्धाचे खरे महत्व, प्रत्येक माणसाच्या मनात सतत लढल्या जाणाऱ्या अंतर्गत संघर्षात आहे, असा खुलासा योगानंदजी करतात. मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या स्वत:च्या चांगल्या प्रवृत्ती आणि वाईट प्रवृत्ती यांच्यात लढा चालू राहणार आणि अखेरीस चांगल्याला वाईटावर विजय मिळणार हे नियतच आहे. परंतु, त्याआधी आपण ईश्वराच्या समीप जाण्याचा निश्चित प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या परिणामस्वरूपे भौतिक जगाच्या सर्व आसक्ती सोडल्या पाहिजेत.

दरवर्षी आपण माता देवकीच्या उदरी जन्म घेतलेल्या बाळकृष्णाचा जन्मसोहळा साजरा करतो आणि हा रंगीबेरंगी, संगीतमय उत्सव जगभरात, बऱ्याचदा रात्र उशीरापर्यंत साजरा केला जातो. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भक्तगण सुंदर सुशोभित केलेल्या मंदिरांमध्ये जमतात आणि स्वत:च्या घरातील देव्हारेही सजवतात. परंतु संतमहात्म्यांनी सांगितले आहे की, आपण भगवान श्रीकृष्णाशी एकरूप होण्याचा जितका अधिक प्रयत्न करू, तितका जन्माष्टमीचा खरा उत्सव हा आपल्या अंतर्यामी आणि आत्ममय असेल किंवा असायला हवा.

योगानंदजीनी 1917 साली योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाची (वायएसएस) स्थापना केली, जी कालातीत असलेल्या क्रियायोग ध्यानतंत्राच्या प्रचार व प्रसारासाठी अनेक दृष्टीने जबाबदार आहे. अजरामर गुरू महावतार बाबाजी यांनी महान योगावतार, लाहिरी महाशयांना क्रियायोगाचे आंतरिक ज्ञान प्रदान केले. तत्पश्चात त्यांनी ते विज्ञान योगानंदजींचे आध्यात्मिक गुरू ज्ञानावतार स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांना शिकवले.

भगवान श्रीकृष्णाने भगवदगीतेतील श्लोकांमध्ये दोनवेळा क्रियायोगाचा उल्लेख केला आहे.
हे मानवजातीला ज्ञात असलेले सर्वोच्च विज्ञान आहे, जे आध्यात्मिक साधकाला ईश्वराशी एकरूप होण्याच्या त्याच्या गंतव्यस्थानाकडे जाण्यासाठी प्रेरित करते.
जन्माष्टमीच्या या महान दिवशी, आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाच्या कल्याणासाठी, आपण सर्वांनी आपल्यातील कृष्णभावना जागृत करण्याचा आणि त्याच्या शिकवणुकीशी सुसंगत राहण्याचा प्रयत्न करूया.

अधिक माहिती : yssi.org

लेखक: विवेक अत्रेय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.