शरण शरण हनुमंता

हनुमान जयंती विशेष

0

महाराष्ट्रातील गावोगावी, खेडोपाडी, वाड्यावस्तीवर हनुमंत हे लोकप्रिय दैवत मानलं जात. श्रीरामभक्त हनुमान केवळ ‘अतुलित बलधामंʼ किंवा ‘महाबली’ असले तरी, “बुध्दिमतांवरिष्ठम्” देखील आहे. म्हणुनच हनुमंताकडे शक्ति किंवा संपदेप्रमाणे, ज्ञान आणि बुध्दिची मागणी केली जाते. विवेक, वैराग्य, भक्ति, चातुर्य, सौख्य व आनंद अशा अनेक गोष्टी उपासकाला मुक्त हाताने देण्यास तो कटिबध्द आहे. हनुमंत हे शक्ति आणि भक्तिचं प्रतीक मानलं जात.

महाराष्ट्रातील गावोगावी, खेडोपाडी, व वाड्यावस्तीवर हनुमंत हे लोकप्रिय दैवत मानले जाते.

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तै ते चिरंजीविनः।।
सप्त चिरंजीवात हनुमंताची गणना करण्यात आलेली आहे.
श्रीरामाच्या ईच्छेखातर हनुमंताने वर मागीतला, तो असा, हे प्रभो, मी आपल्या नावाचा कितीही जप केला तरी, माझ्या मनाला तृप्ती लाभत नाही. म्हणून आपले नामस्मरण करीत, माझं या पृथ्वीतलावर वास्तव्य रहावं, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.


जेथे जेथे आपलं नामस्मरण चालेल तेथे तेथे माझं या शरिरानं वास्तव्य असावं.
राम आशीर्वाद देतात – हनुमंता, जीवनमुक्त होऊन सुखाने तू या भूलोकी रहा. कलियुगाचा अंत झाल्यावर तुला सायुज्य मुक्ती मिळेल व तू माझ्याशी एकरुप होऊन जाशील.
असामान्यत्वाला प्राप्त झालेले, भक्तशिरोमणी तुकाराम महाराज सुध्दा भक्तिच्या वाटेने कसं जायचं, ते हनुमंताला विचारतात.
सतं समिपे रमणं, रतिप्रद्रं नित्यमियं विहार । अकामद दूखःभयादि शोकमोह प्रदं तुच्छ महं भजेऽज्ञा।। भा ।।
ज्याला शरण गेले असता, कामनिवृत्ती होते, त्यालाच शरण जावे. ज्याचा काम अपूर्ण आहे, अशा जीवाला शरण जाऊन काय उपयोग ? म्हणून महाराज हनुमंताची शरणागती करतात.
शरण शरण हनुमंता। मज दावाव्या सुभटा।।
हनुमंता, तुम्ही शूर, वीर, स्वामीकार्यात तत्पर व सादर आहात. शूर आणि वीर। स्वामी काजी तु सादर।। तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा।।
श्रीरामभक्त हनुमान केवळ अतुलित बलधामं किंवा महाबली असला तरी, “बुध्दिमतांवरिष्ठम्” देखील आहे. म्हणुनच हनुमंताकडे शक्ति किंवा संपदेप्रमाणे, ज्ञान आणि बुध्दिची मागणी केली जाते.
विवेक, वैराग्य, भक्ति, चातुर्य, सौख्य व आनंद अशा अनेक गोष्टी उपासकाला मुक्त हाताने देण्यास तो कटिबध्द आहे. हनुमंत हे शक्ति आणि भक्तिचं प्रतिक मानलं जात.
जो बुध्दीचा सागरु। भावार्थाचा महामेरु।। आज्ञेचा तरी किंकरु । महावीर हनुमंत।। बलवंत विवेकवंत। भक्ति वैराग्य ज्ञानवंत।। सेवार्थी साधक हनुमंत। श्री रघुनाथ तुष्टला।।
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुध्दिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयुथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।।
हे हनुमंताचं संक्षिप्त रुप आहे.
अद्रुश्य रुपात प्रवेश करणारी “आणिमा”, विशालरुप धारण करणारी “महिमा”, महाविशालता धारण करणारी “गरिमा”,  हलका बनवणारी “लघिमा”, इच्छित पदार्थ प्राप्त करणारी “प्राप्ति”, आकाशात उडणारे “प्राकाम्य”, सर्वांवर वर्चस्व प्राप्त करणारी “ईशित्व” व दुसऱ्याला वश करणारी”वशित्व” या अष्टसिध्दीच्या प्राप्तिमुळे, आकाशात उड्डाण, द्रोणागिरी उचलणं, लहानात लहान व विशाल रुप धारण करणं व इच्छित फल प्राप्ति  हे हनुमंताला सहज साध्य होतं.
कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावें उत्तरेकडे। मंदाद्रीसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळे।।
अणुपासोनि ब्रह्मांडा येवढा होत जातसे। तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे।।
हनुमंताच्या पूजनाने, जपाने, तपाने आणि विशेष म्हणजे स्तोत्र पठणाने विशेष कृपा जाणवते. साहस व आत्मबल वाढते. दृश्य, अदृश्य भयावह शक्ती नष्ट होत असल्याची जाणीव होते. एक सुरक्षा कवच निर्माण झाल्याची प्रचिती येते. हनुमान ही सात्विक देवता आहे. भक्तिने जीवन सकारात्मक बनते. लोक कल्याणकार्याची भावना निर्माण होते. म्हणून तरुण वर्ग भक्तिने हनुमंताचं नित्यनेमाने दर्शन घेतो.
जय हनुमंत संत हितकारी। सुनिलीजै प्रभु अरज हमारी।
सारेच हनुमंताच्या समोर हात जोडून भक्तिभावाने मागणं मागतात. तुम्ही विशाल समुद्र पार करणारे, लंकनीचा नाश करणारे, बिभीषणाला सुख देणारे, सीतेच्या कृपेने परमपद प्राप्त करणारे, लंकेत राक्षसांना नष्ट करणारे, अक्षय कुमारचा संहार करणारे, शेपटाने लंकेचं दहन करणाऱ्या हे हनुमंता , आपण अंतर्यामी आहात. अशीच कृपा आमच्यावर करा, आमचे संकट निवारण करा.
अशी विनवणी करतात. या हनुमंताच्या रुपाचे, गुणाचे, कार्याचे “हनुमान चालीसा” मधून भक्त गुणगान गातात.
“महाबीर बिक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। कंचन बरन बिराज सुबेरा, कानन कुंडल कुंचित केसां।।
हनुमान ज्ञानाचे विशाल सागर आहेत. ज्यांच्या पराक्रमाचे पूर्ण विश्वात गुणगान होते. रामाचे दूत, अपरंपार शक्तिशाली, अंजनीपुत्र, पवनपुत्र नावांनी ओळखले जातात. हनुमान महावीर व बलवान आहेत. त्यांचे अंग वज्रासमान आहे. कुबुध्दी दूर सारुन सुबुध्दी देणारे आहेत. सोन्याच्या समान कांतीचे असुन, कानातील कुंडलामुळे शोभायमान दिसतात. रामाची आराधना व आज्ञेचे पालन करणारे, सुक्ष्म रुपात सीतेला दर्शन देणारे, तर भयंकर रुप धारण करुन, लंका दहन करणारे आहात. खरोखरच विद्वान, गुणी, बुद्धीमान असुन, विशाल रुप धारण करुन राक्षसाचा नाश करणारे आहात. श्रीरामाचं कार्य करणाऱ्यास सदैव उत्सुक असणाऱ्या अशा या महान तेजस्वी व प्रतापी हनुमंताला सारेच भक्तीभावाने नमन करतात.
भगवान से बडे भक्त । कह गये संत कबीर । पुल बांध रघुवीर चले। कूद गये हनुमान।।
रावणाच्या लंकेला जाळण्यासाठी रामाला पूल बांधावा लागला व हनुमान उड्डाण करुन गेले. मुलांकडून पराभव होण्यात बाप आनंदी होतो. शिष्यांकडून हरण्यात गुरु धन्यता मानतात. तशी भक्तांच्या महिमामध्ये प्रभु प्रसन्नता अनुभवतात. ज्यांचे चिंतन श्रीराम करतात, अशा भक्तांपैकी हनुमान एक आहेत. आज हजारो वर्षांपासुन रामा इतकेच जनसमुदायाच्या ह्रदयात हनुमंताचे स्थान आहे.
रामायणात हनुमान व रावण यांच्या भक्ति आणि शक्तित साम्यता दिसून येते, हनुमाना इतकाच रावण बलवान होता.
रावणाचे बल भोगाला अर्पण होते, तर हनुमंताचे त्यागाला. एकाने सीता पळवून नेली, तर दूसऱ्याने ती आणून दिली.
भक्तिमुक्त शक्ति माणसाला पशु बनवते, तर भक्तियुक्त शक्ति माणसाला देवत्व प्राप्त करून देते. रामदास होण्यासाठी, भक्त हा कर्मयोगीच असावा लागतो. याचे उदाहरण रामायणात रावण आणि हनुमान यांच्या रुपाने पहावयास मिळते.
कुलं पवित्र जननी, कृतार्थ वसुंधरा पुण्यवती च ये न।
धन्य ती अंजनीमाता, धन्य तो हनुमान. हनुमान रामाचा दास होता, म्हणुन तो वीर झाला.
जय जय जय बजरंग बली

लेखक – अनंत भ. कुलकर्णी, बीड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.