नाशिक : प्रतिनिधी
योगशास्त्र मनुष्याला स्वतःला बदलायला शिकवते, ते आपल्यातील आत्मदोष काढते. अशा पद्धतीने योगशास्त्राच्या सहाय्याने आपल्याला स्वतःचा अभ्यास करायचा आहे. आपल्या या बदललेल्या जीवनाकडे बघून इतरांचेही आयुष्य बदलण्याची प्रेरणा मिळते, असा प्रत्येक जण ईश्वराला समर्पित होईल. त्यामुळे सर्वांना आनंदी जीवन लाभेल, असे प्रतिपादन योगशास्त्राचे ज्येष्ठ्य अभ्यासक व प्रेरणादायी वक्ते प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.
महर्षि पतंजलि योग संस्कार निकेतन व धम्मगिरी योग महाविद्यालय यांच्यातर्फे कृतार्थ ज्येष्ठ्य नागरिक संघ यांच्या सहकार्याने योगगंगा घरोघरी हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी प्रा. सिन्नरकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कृतार्थ ज्येष्ठ्य नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विनायक पुरोहित, उपाध्यक्ष सौ. शोभाताई मिस्त्री व कार्यवाह श्री. दिलीप इनामदार उपस्थित होते.
आज माणसातील कृतज्ञता नष्ट झाल्याने सामाजिक परिस्थिती बिघडली आहे. केलेले उपकार व केलेले प्रेम यांचे स्मरण म्हणजे कृतज्ञता होय. नवीन पिढीला कृतज्ञता शिकवली पाहिजे. कुटूंबात व समाजात कसे वागले पाहिजे, हे पुढच्या पिढीला शिकवले जात नाही. त्याचेच दुष्परिणाम संपूर्ण समाजाला अनुभवायला मिळत आहेत आणि हिच आजच्या युगाची शोकांतिका आहे. शिक्षणव्यवस्थाही याबाबत अपयशी ठरली आहे. आजच्या शिक्षणपद्धतीत जीवनाचे धडे देणारे अभ्यासक्रमच नाहीत, अशी खंत प्रा. सिन्नरकर यांनी व्यक्त केली.
प्रा. सिन्नरकर पुढे म्हणाले की, कृतज्ञता हा मनुष्याचा सर्वात मोठा दागिणा आहे. एकवेळ दुसरे गुण कमी असले तरी चालेल, पण कृतज्ञता हवीच. मुलांना शिक्षण व्यवस्थेने कृतज्ञता शिकवलीच पाहिजे. फळं व सावली देणाऱ्या वृक्षांनाही धन्यवाद द्यायला शिकवायला हवे, हिंस्र पशूही कृतज्ञ असतात. पण, माणसाचे अपत्य ज्या आईवडीलांनी काबाडकष्ट करून त्याला मोठे केले, त्यांनाच विसरते. समाजात वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे सामाजिक आरोग्य बिघडल्याचे लक्षण आहे. सगळीच मुले अशी आहेत असे मी म्हणत नाही. एवढेच म्हणायचे आहे की, शिक्षणात संस्कार शिक्षणाचा समावेश व्हायलाच हवा आहे.
आई-वडील ही आपली श्रीमंती आहे, असे सद्गुण मुलांना शिकवणे आवश्यक आहे. तसेच माणसाचे माणसाशी संबंध कसे असावेत, हे सर्वच योगशास्त्राच्या अभ्यासातून शिकता येईल. मुले, नातू संस्कारीत होण्यासाठी योगशास्त्र शिकले पाहिजे. एकूणच आपल्या सर्वांना भारतीय संस्कृतीतील जुन्या समृध्द पद्धती जागृत करायच्या आहेत, असेही प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.
यांची उपस्थिती
याप्रसंगी योग महाविद्यालय संचालक डाॅ. विशाल जाधव, डाॅ. पल्लवी जाधव, योग महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश मोहुर्ले, मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. तुषार विसपुते, प्रा. चैतन्य कुलकर्णी, योगशिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे, डाॅ. अजय पुरीवार, आरती आठवले, शुभांगी चित्ते आदींसह ज्येष्ठ्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—