नाशिक : प्रतिनिधी
मोक्ष ही केवळ जीवन आणि मृत्यूच्या चक्रव्यूहातील मुक्ती नाही, तर मानवी कल्याणासाठी आधार बनून राहिलेल्या भारतीय संस्कृती, अध्यात्म, योग व सद्विचारांच्या अद्भुत शक्तींचा आणि त्यातील अंतरंगाचा शोध आहे, असे प्रतिपादन योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.
भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र समाजल्या जाणाऱ्या सप्तमोक्षपुरी यात्रेच्या विविध पैलूंना उघडणाऱ्या सप्तमोक्षपुरी या गणेश लोहार यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रा. सिन्नरकर बोलत होते. पेठ रोडवरील व्रज लाईफ स्पेस सेंटरमध्ये झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, तर प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, अनिल चांदवडकर, प्रल्हाद भांड, के. के. अहिरे, दिलीप मेहता व नानासाहेब फड उपस्थित होते. अथर्वेदा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
प्रा. सिन्नरकर यांनी मानवी जीवनातील ईश्वराचे साम्राज्य या विषयावर प्रकाशझोत टाकताना योग व अध्यात्माची शक्ती आणि त्याचे मानवी जीवनातील स्थान आपल्या व्याख्यानातून उलगडले. संपूर्ण मानवजातीला मोक्ष प्राप्त होत असेल तर मी हजार वेळा नरकात जायला तयार आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणत असत. मोक्ष म्हणजे सतत मनाची प्रसन्नता राखणे होय. तुकाराम महाराज म्हणत, मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दिंचे कारण…हेही प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.
नाशिककरांची मान उंचावली
—
नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षक असलेल्या गणेश लोहार आणि त्यांचे दोन पुत्र अथर्व आणि वेदांत लोहार यांनी 7000 किलोमीटरची सप्त मोक्षपुरी सायकलिंग मोहीम अवघ्या 41 दिवसात पूर्ण करून नाशिककरांची मान उंचावली आहे. त्यांच्याकडून आज मी माझ्या महानगरपालिकेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी योगरूपी बर्थडे रिटर्न गिफ्ट घेणार आहे. त्यांचे सर्व पाचही रेकॉर्डस् चे श्रेय मला दिलेले असले तरी मी फक्त माझे काम केले, ते माझे कर्तव्य होते. लोहार पितापुत्रांनी एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर उभा केला आहे, असे गौरवोद्गार यावेळी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी काढले.
मोहिमेच्या अनुभवांचे कथन
हेमंत अग्रवाल व योगेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. सप्त मोक्षपूरीची माहिती अनिल चांदवडकर यांनी दिली. अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या या 7000 किलोमीटरच्या सायकलींग मोहिमेच्या अनुभवांचे कथन वेदांत लोहार व गणेश लोहार यांनी प्रास्ताविकातून केले.
गिरीश पालवे म्हणाले की, संस्कृतीप्रेम व देशनिष्ठा ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे गणेश लोहार. त्यांनी आतापर्यंत अनेक सायकलींग मोहिमा आपल्या दोन्ही सुपुत्रांना सोबत घेऊन पूर्ण केलेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक सायकलींग मोहिमेचा मी साक्षीदार आहे. भारतीय संस्कृती व योग यासाठी करीत असलेले लोहार पितापुत्र यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
शाळांसाठी पुस्तके भेट
भारतीय संस्कृतीत सप्तमोक्षपुरी यात्रा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या संपूर्ण यात्रेचा तपशीलवार आणि अध्यात्मिक संदर्भ या पुस्तकातून उलगडल्याने सगळ्यांसाठीच हे पुस्तक मौल्यवान ठरणार असल्याचे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी काढले. यावेळी त्यांनी महापालिकेच्या सर्व शाळांसाठी 100 पुस्तक स्वतः विकत घेऊन भेट दिली व सर्वांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचावे असे आवाहनही केले. संध्या सोनजे व रेखा लभडे यांनी सूत्रसंचालन केले.
—