नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येथील साहित्य संमेलनातील एका मंडपास किंवा दालनास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मातंग एकता आंदोलन या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी या संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनाचा आशय असा : प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श व कवी कुसुमाग्रजांच्या सहवासाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरी ०३ डिसेंबरपासून साहित्य संमेलन सुरु होत आहे. या संमेलनात विविध साहित्य दालन, कवी संमेलन दालन, चर्चासत्र दालन, साहित्य विक्री दालन असणार आहे. त्यापैकी कुठल्याही एका दालनास अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे. साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून मराठी भाषेत विविध कथा, कादंबरी, नाटक लिहून एक थोर साहित्यिक होण्याचा मान या महाराष्ट्रात मिळविलेला आहे. शिवाय त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या शाहिरीने उभ्या महाराष्ट्रात आंदोलनाची धग तेवत ठेवली. असे थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी आदर ठेवून या महापुरुषाचे नाव साहित्यनगरीतील एखाद्या दालनास द्यावे. त्यांचा हा उचित सन्मान करावा आणि साहित्य संमेलनाची शोभा वाढवावी, ही सर्व समाज बांधवांची मागणी आहे.
—