रतन टाटा हे नाव भारतीय उद्योगजगतात अत्यंत आदराने घेतले जाते. 28 डिसेंबर 1937 रोजी जन्मलेले रतन टाटा हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यावसायिकांपैकी एक होते. ते टाटा समूहाचे माजी अध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
रतन टाटा यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील नवल टाटा यांनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. रतन टाटा यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमधून पूर्ण केले आणि त्यानंतर अमेरिकेत जाऊन कॉर्नेल विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी मिळवली. पुढे त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले.
टाटा समूहात प्रवेश
रतन टाटा यांनी 1962 साली टाटा समूहात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम केले आणि प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव घेतला. 1991 साली जे.आर.डी. टाटा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रतन टाटा यांची टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी समूहाचे विविध व्यवसाय क्षेत्रांत यशस्वी नेतृत्व केले.
जागतिक विस्तार
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तार केला. त्यांनी टाटा मोटर्सद्वारे जगातील प्रसिद्ध ब्रिटिश ब्रँड ‘जॅग्वार’ आणि ‘लँड रोव्हर’ खरेदी केले. तसेच, टाटा स्टीलने युरोपातील कोरस ग्रुपचा अधिग्रहण केला, ज्यामुळे टाटा स्टील जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची पोलाद उत्पादक कंपनी बनली.
नॅनो कार – स्वप्नातील प्रकल्प
रतन टाटा यांनी सर्वसामान्य भारतीयांना लक्षात घेऊन एक स्वस्त आणि किफायतशीर कार बनवण्याचे स्वप्न पाहिले. याच स्वप्नातून ‘टाटा नॅनो’ या कारची निर्मिती झाली. 2008 साली ही कार बाजारात आली आणि ती त्या काळातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली जाऊ लागली.
परोपकारी दृष्टिकोन
व्यवसायातील यशाबरोबरच, रतन टाटा हे परोपकारी कार्यांसाठीही ओळखले जातात. त्यांनी आरोग्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, ज्याचा लाभ लाखो भारतीयांना झाला आहे.
निवृत्ती आणि पुढील वाटचाल
2012 साली रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, परंतु आजही ते समूहाशी सल्लागार म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतरही त्यांनी विविध क्षेत्रांत योगदान देणे सुरूच ठेवले. त्यांच्या साधेपणामुळे आणि नैतिक मूल्यांमुळे त्यांना संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर मिळाला आहे.
रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योजकच नव्हे, तर एक सामाजिक दृष्टिकोन असलेले आदर्श नेतृत्व आहे. त्यांच्या कामामुळे टाटा समूहाने जागतिक बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आदर्शांनी आणि कामगिरीने भारतीय उद्योगजगतावर अमीट ठसा उमटवला.
रतन टाटा आणि २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी
२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबईकरांसाठी एक भयावह दिवस होता. त्या दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईवर भयानक हल्ला केला होता, ज्यात 166 निरपराध लोकांचा बळी गेला आणि अनेक लोक जखमी झाले. या हल्ल्यात ताज महाल पॅलेस हॉटेल, जे टाटा समूहाचे होते, त्यावरही मोठ्या प्रमाणात हल्ला झाला. या संकटाच्या काळात रतन टाटा यांनी दाखवलेली संवेदनशीलता, सहकार्य आणि नेतृत्व अनेकांसाठी प्रेरणादायक ठरली.
हल्ल्यानंतरचे नेतृत्व
ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये अनेक लोक अडकले होते आणि त्यात काही कर्मचार्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रतन टाटा यांनी या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले आणि तातडीने हॉटेलच्या कर्मचारी व ग्राहकांसाठी मदतीचे हात पुढे केले. त्यांनी जखमींना त्वरित मदत दिली आणि कुटुंबियांना आधार दिला.
कर्मचाऱ्यांसाठी आधार
हल्ल्यात हॉटेलचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, आणि अग्निशमन दलाचे सदस्य धैर्याने समोर आले आणि त्यांनी हॉटेलमधील लोकांचे जीव वाचवले. रतन टाटा यांनी या धैर्यशील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली आणि त्यांच्या पुर्नवसनासाठी प्रयत्न केले. टाटा समूहाने हल्ल्यात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीसह पुनर्वसनाचे कार्यक्रम राबवले.
समाजासाठी संवेदनशीलता
रतन टाटा यांनी हल्ल्यानंतर केवळ हॉटेलचे नुकसान न पाहता संपूर्ण समाजाला मदत करण्याचे ठरवले. त्यांनी हल्ल्यात बाधित झालेल्या लोकांना, मग ते हॉटेलचे कर्मचारी असो किंवा मुंबईतील अन्य नागरिक, सर्वांना मदत पोहोचवली. त्यांनी विशेषत: हॉटेलच्या आसपास राहणाऱ्या झोपडपट्टीतील रहिवाशांना, ज्यांना हल्ल्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम झाला होता, त्यांच्या मदतीसाठी हातभार लावला.
पुनर्बांधणी आणि धैर्य
रतन टाटा यांनी हल्ल्यानंतर ताज हॉटेलची तात्काळ पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे हॉटेलची प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा उभी राहिली. हॉटेलचे दुरुस्ती कार्य अवघ्या काही महिन्यांत पूर्ण करण्यात आले आणि ताज हॉटेल पुन्हा एकदा त्याच दिमाखाने उभे राहिले.
२६/११ च्या हल्ल्यानंतर रतन टाटा यांनी दाखवलेले धैर्य, संवेदनशीलता आणि नेतृत्व हे आदर्शवत आहे. त्यांनी केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मानवी दृष्टिकोनातून या संकटाला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कृतींनी टाटा समूहाची प्रतिष्ठा केवळ एक व्यवसायिक समूह म्हणूनच नाही, तर समाजासाठी संवेदनशील असलेल्या संस्थेची प्रतिमा तयार केली.
– सुहास टिपरे – नाशिक