नाशिक : प्रतिनिधी
संतांनी समाजात महान काम करून ठेवले आहे. गुरू म्हणतात, संत हे देवाने पाठवलेले आहेत. त्याप्रमाणेच समाजातील, परीसरातील व मनातील कचरा कसा साफ करायचा, हे सांगण्यासाठीच राष्ट्रसंत गाडगे महाराज अवतीर्ण झाले होते, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व योगशास्त्राचे ज्येष्ठ्य अभ्यासक प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.
संत गाडगे महाराज शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा मंडळ संचलित शहरी बेघर निवारा केंद्र येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. तेव्हा ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोकडदरा आश्रमाचे चणेश्वर महाराज उपस्थित होते.
याप्रसंगी प्रकल्प अधिकारी रंजना शिंदे, संस्था संचालक प्रशांत गायकवाड, काळजीवाहक रवी शिंदे, संजय दिवटे, संजय ठाकरे, योगशिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे व उपाध्यक्ष अशोक पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास लाड, नाथपंथी बहुद्देशीय संस्थेचे सचिव रोहित कानडे, नगरसेविका वत्सलाताई खैरे, लोखंडे उपस्थित होते.
प्रा. सिन्नरकर म्हणाले की, गाडगेबाबा हे महायोगी होते. समाज अंधश्रद्धेत अडकला होता. त्याच्यापासून सुटका करण्यासाठी गाडगेबाबांनी प्रयत्न केले. महत्त्वाचे म्हणजे दुःखांना तोंड कसे द्यायचे हे त्यांनी शिकवले. त्यांचा शब्द न् शब्द जणू काही विवेकाच्या अमृतात भिजून आलेला होता. त्यामुळे तो प्रत्येकाच्या डोक्यात प्रकाश पाडायचा. अंधश्रद्धेवर ते कडाडून टीका करायचे. जशी रस्ते, परिसराची स्वच्छता करतो, तसेच मनाचीही स्वच्छता करा, यासाठी त्यांनी संदेश दिला. त्यासाठी त्यांनी कीर्तन केले. त्यामुळे सर्वांनीच आपल्यातील दोषांचा कचरा बाहेर काढावा व मन स्वच्छ करावे, हे अत्यंत आवश्यक आहे.
सत्कर्म करणे म्हणजे उदबत्ती लावणे आहे, त्याचा दरवळ सुटतोच. हेच काम गाडगेबाबांचे सध्याचे अनुयायी करीत आहेत, या शब्दांत प्रा.सिन्नरकर यांनी या संस्थेच्या प्रतिनिधींचे याप्रसंगी कौतुक केले.
यू. के. अहिरे यांनी गाडगेबाबांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची माहीती दिली. व्यवस्थापक ईश्वर भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.
—