नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शिक्षणप्रसारक मंडळाच्या जेल रोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या १९९१ मधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मित्रमेळा त्र्यंबकेश्वर- घोटी रोडवरील पहिनेजवळील अमिगो लेक रिसाॅर्टमध्ये नुकताच उत्साहात झाला. गप्पाटप्पा, नाशिक ढोलवर व कावडीवर नॄत्याचा ठेका, गाण्यांची मैफल, आठवणींना उजाळा, फोटोसेशन व ओळख- परिचय असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
मिलिंद परदेशी, सचिन अंतापूरकर, राजू ठक्कर- दावडा, योगेश नाशिककर व शरद पोटे यांनी व्हाॅट्सॲप ग्रुपद्वारे सर्व मित्रांना एकत्र केले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. नाशिकबरोबरच मालेगाव, पुणे व ठाणे येथून सुमारे ७० माजी विद्यार्थी यानिमित्त ३३ वर्षांनंतर एकत्र आले होते. सुरुवातीला दिवंगत मित्रांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले.
जगदीश खोडके, अविनाश सोनवणे, मिलिंद शेंडे, प्रवीण पाटील व प्रदीप पवार आदींनी गीतगायन केले. सोमनाथ थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सर्व माजी विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बांधकाम व्यावसायिक मयूर कपाटे आणि डीलोटी या फर्ममध्ये कार्यकारी संचालकपदावर निवड झालेल्या सुधीर कंटाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अमर वाणी, देवीदास आडके यांच्यासह काही मित्रांनी घरून आणलेले पदार्थ एकमेकांना आग्रहाने भरविले.
—