इंदूर, 17 नोव्हेंबर :
17 नोव्हेंबर रोजी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियातर्फे (वायएसएस) इंदूर येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय आध्यात्मिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वामी शुद्धानंद गिरी यांनी “क्रियायोगाद्वारे चिंतामुक्त आणि आनंदी जीवन जगणे” या विषयावर एक जाहीर भाषण दिले. ‘योगी कथामृत’या अतिशय लोकप्रिय अभिजात आध्यात्मिक आत्मचरित्राचे लेखक, वायएसएसचे संस्थापक आणि गुरुदेव श्री श्री परमहंस योगानंद, यांच्या क्रियायोगाच्या शिकवणींवर हा कार्यक्रम योजण्यात आला होता. माजी लोकसभा अध्यक्ष आणि पद्मभूषण श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते योगानंदजींच्या ‘मॅन्स इटर्नल क्वेस्ट’ या संकलित भाषणसंग्रहाच्या मराठी आवृत्ती “मानवाचा चिरंतन शोध” चे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी वायएसएस संन्यासी स्वामी शुद्धानंद गिरी तसेच ब्रह्मचारी स्वरूपानंद आणि शांभवानंद यांच्या सहित सुमारे 400 लोक उपस्थित होते.
‘मॅन्स इटर्नल क्वेस्ट’ या पुस्तकाचा विषय आहे माणसाच्या जीवनातील – त्याच्या आशा, ईच्छा, आकांक्षा आणि कार्यसिद्धी या सर्वातील – ईश्वराचे स्थान. जीवन, मनुष्य आणि कर्तृत्व या सर्व केवळ एक सर्वव्यापी निर्मात्याच्या अभिव्यक्ति आहेत, आणि सर्वतोपरी त्याच्यावरच अवलंबून आहेत जशी एक लाट समुद्रावर अवलंबून असते. या पुस्तकात परमहंस योगानंद हे स्पष्ट करतात की ईश्वराने मनुष्य का आणि कसा निर्माण केला, तो ईश्वराचा अविभाज्य भाग कसा आहे आणि प्रत्येकासाठी वैयक्तिकरित्या याचा अर्थ काय आहे. मनुष्य आणि त्याचा निर्माता यांच्यातील एकत्वाची जाणीव हे योगाचे संपूर्ण सार आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये, मनुष्याला ईश्वराची अटळ गरज आहे, हे समजून घेतल्याने धर्म म्हणजे काहीतरी जगावेगळे असते ही समजूत दूर होते आणि ‘ईश्वराला जाणणे’ हाच वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहण्याचा आधार बनतो.
हे पुस्तक आपल्यापुढे सर्व-समावेशक सूज्ञपणा, प्रोत्साहन आणि मानवतेबद्दलचे प्रेम यांचे अनोखे मिश्रण प्रस्तुत करते. यामुळे परमहंसजी आध्यात्मिक जीवनासाठी सध्याच्या काळातले सर्वात विश्वासू मार्गदर्शक बनले आहेत. ज्यांनी जीवनाचे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी आपल्या अंतःकरणात ईश्वराच्या वास्तविकतेबद्दल एक संदिग्ध आशा धारण केली आहे आणि जे साधक त्यांच्या शोधात आधीच परमात्म्याकडे वळले आहेत, त्या सर्वांसाठी हे पुस्तक व्यावहारिक मार्गदर्शन आणि उद्बोधक अंतर्दृष्टी प्रदान करते. जसे की, योगानंदजींचे हे शब्द : “चैतन्याच्या अविच्छिन्न आनंदाचा झरा तुमच्या अंतरंगात दडलेला आहे. जोपर्यंत तुम्हाला तो सापडत नाही, तोपर्यंत ध्यानाच्या कुदळीने खणत राहा आणि शाश्वत आनंदाच्या त्या झऱ्यात स्नान करा.
“तुम्ही जे सत्य ऐकता आणि वाचता ते आचरणात आणा, म्हणजे ती केवळ एक कल्पना राहणार नाही तर अनुभवजन्य दृढ विश्वास होईल. जर धर्मशास्त्रावरील पुस्तके वाचून तुमची ईश्वराविषयीची उत्कंठा पूर्ण होत असेल, तर तुम्ही धर्माचा उद्देश समजून घेतलेला नाही. सत्य बुद्धीला समजले, याने संतुष्ट होऊ नका. सत्याचे अनुभवात रूपांतर करा, मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या आत्म-साक्षात्काराद्वारे ईश्वराला जाणाल.
या पुस्तकाच्या मराठी अनुवादामुळे आता क्रियायोग आणि परमहंस योगानंदांच्या ”जगावे-कसे” याविषयीच्या शिकवणी, देशातील व्यापक वाचकांसाठी उपलब्ध होतील. योगानंदजींनी क्रियायोग या भारतामध्ये हजारो वर्षांपूर्वीपासून प्रचलित असणाऱ्या पवित्र आध्यात्मिक विज्ञानाची सर्वंकष शिकवण, भारत आणि शेजारच्या देशांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी, 1917 मध्ये वायएसएस ची स्थापना केली. अधिक माहितीसाठी. yssi.org
—