नाशिक : प्रतिनिधी
आपल्या कामांची पूर्तता करून घेण्यासाठी सरकारी कार्यालयांबाहेर लोकांची गर्दी होत आहे. खरे तर बहुतेक सेवा ऑनलाईन आहेत. त्यांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी लोकसेवा हक्क कायदा – 2015 हा सध्या कार्यरत आहे. मात्र, याची माहिती सामान्य लोकांना नाही. आपल्या फायद्यासाठी लोकांनी हा कायदा समजावून घ्यावा. त्यामुळे त्यांची सरकारी कामे वेळेत पूर्ण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले.
येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन ॲण्ड रिसर्च येथे लोकसेवा हक्क कायदा 2015 – माहिती आणि प्रशिक्षण सत्र झाले. त्याच्या शुभारंभप्रसंगी आयुक्त कुलकर्णी बोलत होत्या. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलास चंद्रात्रे, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. पी. आर. गीते, संचालक मंगेश नागरे व उपजिल्हाधिकारी हेमराज दराडे उपस्थित होते.
आयुक्त कुलकर्णी म्हणाल्या की, सरकारी प्रशासन सुरळीत चालावे यासाठी विविध सेवा पुरविण्यासाठी ऑनलाईन सुविधा, तसेच सेवा केंद्रे सुरू केली आहेत. जेणेकरून सरकारी अधिकाऱ्यांना इतर कामांसाठी वेळ मिळावा. मात्र, प्रत्यक्षात लोकांची गर्दी हटत नाही. त्यासाठी लोकांनी ऑनलाईन सेवांचा लाभ घ्यावा. त्यातील काही सेवांना शुल्क नाही, तर काही सेवांना अल्प शुल्क ठेवण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सुमारे 506 सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. या सेवा आपल्याला विशिष्ट कालावधीच्या आतच मिळतील. संबंधित सेवा विशिष्ट वेळेत दिल्या जातात की नाही, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आहे. आपल्या सेवा कामांना विलंब झाल्यास वरिष्ठांकडे व शेवटी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाकडे दाद मागता येऊ शकते. त्यात चूक लक्षात आल्यास संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
ॲड. पी. आर. गीते म्हणाले की, कायदे केले जातात, पण या सुविधा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही. विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, त्यांना वृत्तपत्र वाचन नको असते, ही शोकांतिका आहे. या वाचनातून सर्वसाधारण माहिती मिळते. ही माहिती आयुष्यात आपल्याला उपयोगी येईल. म्हणून किमान दोन वृत्तपत्र रोज वाचावीच. मिळालेल्या विविध शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत विद्यार्थ्यांनीही पोहोचवावी.
उपजिल्हाधिकारी दराडे म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने आपण घरबसल्या या सेवा घेऊ शकतो. विविध दाखले मिळाले नाही, तर आपल्याला अपीलही करता येते.
याप्रसंगी शासनाच्या, आपले सरकार या पोर्टलवर जाऊन विविध सेवांचा लाभ कसा घ्या, हे समजावून सांगण्यात आले. प्राचार्य डाॅ. चंद्रात्रे यांनी प्रास्ताविक केले. इंजिनिअरिंग काॅलेजच्या अकॅडेमी डीन प्रा. सुषमा पुंडे यांनी सूत्रसंचालन केले. फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. ए. बी. दरेकर यांनी आभार मानले.
याप्रसंगी आर्ट्स, सायन्स व काॅमर्स काॅलेजचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र सांगळे, जळगाव आयटी विभागाचे प्रमुख स्वप्निल पाटील, नाशिक आयटी विभागाचे प्रमुख विशाल पाटील, नाशिक जिल्हा प्रकल्प विभागाचे व्यवस्थापक चेतन सोनजे आदींसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
—