अनिद्रा (Insomnia)
अनिद्रा म्हणजे झोप न येणे. मानवास झोप हे एक नैसर्गिक वरदान आहे. झोप म्हणजे जागृत अवस्थेचा अभाव होय. पातंजल योग सूत्रात झोपेला निद्रावृत्ती असे संबोधले आहे.
अभावप्रत्ययालम्बना वृत्तिनिद्रा ||१०|| पा.यो.सूत्र
काहीही नसण्याची स्थिती. भू म्हणजे असणे. त्यापासून “भाव ”म्हणजे असण्याची स्थिती असा शब्द तयार झाला व नकारात्मक ‘अ ’उपसर्ग लागून ‘अभाव’ हा शब्द होतो. अभाव म्हणजे नसण्याची स्थिती पतंजलीच्या मते निद्रा ही सुद्धा एक चित्ताची वृत्ती आहे. चित्तवृत्तीनिरोधात निद्रेचाही निरोध अपेक्षित आहे. या सूत्रात निद्रा म्हणजे स्वप्नविहीन निद्रा व सुषुप्ती असा अर्थ घेता येतो. जेव्हा चित्ताला विषयाचा अभावाच्या अनुभवाचा आधार मिळतो. तेव्हा चित्ताची जी वृत्ती असते. ती म्हणजे निद्रा होय. निद्रेमध्ये व सुषुप्तीमध्ये मेंदू बंद पडलेला नसतो. फक्त त्याचा चित्ताशी संपर्क तुटलेला असतो. गाढ झोप ही आरोग्यवर्धक मानली जाते. प्रत्येक मनुष्याला नियंत्रित झोप आवश्यक आहे. व्यवस्थित झोप झाली तरच ताजेतवाने वाटते. उत्साह वाढतो. परंतु झोप न येणे हे नैसर्गिक आहे. यामध्ये अनेक माणसे वेडीपण होतात.
लक्षणे
अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे, गरगरणे, आम्लपित्ताचा त्रास होणे, पोट साफ न होणे, डोळे चुरचुरणे, मान व इतर स्नायू कडक होणे, सारख्या जांभळ्या येणे इ.
कारण
अधिक किंवा मोठ्या स्वरुपात शारीरिक परिश्रम केल्याने व स्नायू थकवा आल्यास स्नायू दुखणे, सांधे दुखणे, झोपेची जागा बदलणे, ऋतू बदलणे, मानसिक ताण-तणाव, उच्च रक्तदाब, चिंता, राग, भीती, दडपण यामुळे झोप येत नाही. बद्धकोष्ठता, लघवी साफ न होणे यामुळे रक्त विषयुक्त होते. आणि मस्तीष्कामध्ये विषयुक्त रक्ताचा संचार झाल्याने आणि झोपण्यापूर्वी अति भोजन व अति बौद्धिक कार्य केल्याने झोप येत नाही. तसेच काहीही शारीरिक कष्ट न करणारे उदा: आळशी व्यक्ती यांनाही झोप येत नाही. झोपेच्या ठिकाणी शुद्ध वायू किंवा वातावरण नसणे. एकाच खोलीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती दाटीवाटीत झोपणे. घोरणेचा आवाज येणे, अंथरूण घाणरडे असणे, कुबट वास येणे, डास, पिसवा, गोचीड, ढेकुण यांचा प्रादुर्भाव असणे. तसेच झोपण्यापूर्वी रोचक साहित्य वाचणे किंवा मनास चिंता वाटेल असे विचार केल्याने झोप येत नाही.
योगोपचार
सूर्यनमस्कार प्रार्थना
आसन- ताडासन, उत्कटासन, उष्ट्रासन, त्रिकोणासन, पर्वतासन, वक्रासन, अर्धमच्छेंद्रासन, भुजंगासन, सर्पासन.
प्राणायाम- नाडी शोधन,
क्रिया – वमन, दंड, वस्त्र, शंख प्रक्षालन
प्रणव ओंकार
ध्यानधारणा
योगनिद्रा
निसर्गोपचार-
1. झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने स्वच्छ हात पाय धुणे.
2. कंबर आणि मान यांवर ओली पाण्याची पट्टी ठेवणे.
3. कोमट पाण्याने स्नान व कोमट पाणी पिणे, यामुळे झटपट झोप येते.
4. झोपण्यापूर्वी टबमध्ये रिठ स्नान घ्यावे.
5. गरम पाण्यात एक लिंबू पिळून रस प्यावा.तसेच एनिमा घ्यावा.
आहार– रसाहार, संत्रा, लिंबू, सरबत, काकडी, गाजर, बीट, मुळा यांचे सलाड्स खावे. पेरू, पपई, केळी, टरबूज, खरबूज आहारात ठेवावे. हिरव्या भाज्या, दुध, दही, ताक आहारात ठेवावे. मोड आलेली कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ आहारात घ्यावे.
(वरील चिकित्सा योग व निसर्गोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घ्यावी.)
वर्ज- झोपेच्या गोळ्या-औषधे घेऊ नये, टीव्ही बघू नये, मांस, मटण, मासे, अल्कोहोल, धुम्रपान घेऊ नये. इत्यादी
– प्रा. डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर:९८२२४५०७६८
—