नाशिक : प्रतिनिधी
ज्या दिवशी माणसाला बरे वाटण्यासाठी औषधाच्या गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत, तो दिवस सोन्याचा असेल. त्यासाठीच प्राचीन भारतीय ॠषींनी आयुर्वेद, निसर्गोपचार हा परीस दिला आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व योगशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालणारे निसर्ग विद्या निकेतनतर्फे निसर्गोपचार डिप्लोमाच्या प्रथम बॅचच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी प्रा. सिन्नरकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्राच्या सहनिमंत्रक, उत्तर महाराष्ट्राच्या संयुक्त सचिव आणि श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्ग उपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतनच्या अध्यक्ष डाॅ. तस्मीना शेख, ट्रस्टच्या सचिव आणि ऑर्गनायझेशनच्या जिल्हा संयुक्त सचिव सुनीता पाटील, मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. तुषार विसपुते, योगशिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे उपस्थित होते.
प्रा. सिन्नरकर म्हणाले की, आयुर्वेद हा जीवनात आणायचा आहे. त्यासाठी श्रद्धा निर्माण व्हावी. ही श्रद्धा निर्माण होण्यासाठी विश्वास ठेवा, त्यातून अनुभूती येते, मग त्याचे रूपांतर श्रद्धेत होते. आयुर्वेद व निसर्गोपचाराने सर्व चुकीच्या गोष्टींपासून आपण दूर राहू शकतो. समाजातील, जगातील समस्या फक्त वाईट लोकांमुळेच नाही तर सात्विक लोक शांत बसल्याने वाढल्या आहेत. माणूस जागृत झाला तर जग बदलू शकते, असेही प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी रोगनिदान या विषयावरील प्रात्यक्षिकांत सहभाग नोंदविला.
—