आजार : मलावरोध
Constipation, बद्धकोष्ठता, कब्ज किंवा मलावरोध हा आजार आधुनिक सभ्यतेचा रोग आहे. मल जेव्हा मोठ्या आतड्यात जमा होतो परंतु काही कारणास्तव तो बाहेर पडत नाही, तेथेच साचून राहतो, त्यास मलावरोध म्हणतात. आज काल जवळ जवळ ९९ टक्के व्यक्ती या रोगाचे शिकार झाले आहेत.
या आजाराच्या रोग्याचे पोट पूर्ण साफ होत नाही, नेहमी सुस्ती आलेली असते. पोट नेहमीच कडक व डंबरलेले असते.
लक्षणे
भूक न लागणे, तोंडाला चव नसणे,अन्न खाण्याची इच्छा न होणे, डोके दुखणे, झोप न येणे, नाक, कान, डोळे, त्वचा यांच्यातून सदा सर्वदा घाण बाहेर येणे. संपूर्ण शरीराचा घाण उग्रवास येणे, तोंडाची व श्वासाची दुर्गंधी येणे. घाणरडे ढेकर येणे, गॅसेस होणे, मळमळणे इ.
कारण
खान-पान असंयम हे मलावरोधाचे मुख्य कारण आहे. अनापशनाप खाणे, खूप खाणे, अर्धवट चावणे, खाणे, गिळणे, पाणी न पिणे,भोजनासंबंधी नियमांचे योग्य पालन न करणे अति मांसाहार करणे इ.
दुष्परिणाम
बद्धकोष्ठता या विकाराची तीव्रता जर वाढली, शरीरातील विजातीय द्रव्ये बाहेर येण्याचे प्रमाण कमी झाले, तर टायफॉईड, हृदयविकार, मूत्राशयाचे रोग, डोकेदुखी, रक्तदाब, मुळव्याधी, आम्लपित्त व अनिद्रा स्थूलता इ.विकार जडतात. शौचास अधिक वेळ लागणे. गॅसेस होणे, पोट दुखणे, मंदाग्नी, कंबरदुखी, किडनी विकार इ.
योगोपचार
१) दररोज १२ सूर्यनमस्कार करणे.
२) आसने – पवनमुक्तासन, हलासन, नौकासन, सेतूबंध सर्वांगासन, ताडासन, कटी चक्रासन, त्रिकोणासन, मत्स्यासन, वक्रासन, पश्चिमोतानासन, अकर्ण धनुरासन, भुजंगासन, सर्पासन, वज्रासन, उत्कटासन, उष्ट्रासन.
३) प्राणायाम – भस्रिका, उज्जायी, नाडीशोधन पाच वेळेस.
४) मुद्राबंध – योगमुद्रा, अश्विनी, उद्डीयान, महाबंध
५) क्रिया- अग्निसार, नौली, बस्ती, शंख प्रक्षालन
६) ध्यान – प्रणव ॐ कार साधना इ.
निसर्गोपचार
आहार : रसाळ फळे, रसाहार, हिरव्या पालेभाज्या, जाड पिठाची रोटी, पपई, नासपती, पेरू, भिजवलेले काळे मनुके,अंजीर इ.मलावरोध कमी करण्यास सहाय्यक आहेत.
उपवास चिकित्सा
सर्वप्रथम दोन दिवसाचा उपवास, तुट उपवास इ. यामध्ये लिंबू-पाणी-मध मिसळून दिवसातून तीन ते चार वेळेस घेणे, एरवी ताजे पाणी पीत राहणे.
एनिमा –
लिंबाच्या पाल्याचे उकळलेले व नंतर थंड केलेले पाणी, एरंडेल तेल, रात्री झोपण्यापूर्वी एक पेरूच्या झाडाचे पान किंवा सीताफळाच्या झाडाचे पान किंवा एक आंब्याचे पान चावून खाणे इ. चा वापर करून एनिमा घेणे.
पोटाची मालिश करणे.
वर्ज
पिष्ठमय पदार्थ आहारात कमी करणे, दोन जेवणामध्ये काही खाऊ नये, लाल मिरची, तेल, मसालेदार पदार्थ, मिठाई, मैदा, बारीक आटा, जागरण, मांस, मदिरा, बिडी, सिगारेट, चहा, कॉफी वर्ज आहे.
वरील सर्व उपचार योग व निसर्गोपचार तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार घ्यावेत.
प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
ई-मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६