मानदुखी
पाठदुखी प्रमाणेच सामान्य आढळणारा आजार म्हणजे मानदुखी होय. जागतिक सर्वेक्षणानुसार दर तीन व्यक्तीच्या मागे एकास मानदुखी जडलेली असते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा एकदा तरी या आजारास सामोरे जावेच लागते. बरेच वेळा मानदुखी तात्पुरत्या औषध उपचाराने बंद होते थांबते. परंतु कालांतराने हा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो. सर्वसामान्यपणे मानदुखीचे दोन प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे-
१) तात्पुरती मान दुखणे (ॲक्युट नेक पेन) लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईलवर जास्त वेळ काम केल्याने, लिखाणकाम चुकीच्या पद्धतीने बसून केल्याने अथवा झोपेची चुकीची स्थिती, यामुळे अशी मानदुखी जडते.
२) दीर्घकालीन मानदुखी दोन-तीन-चार महिने किंवा सारखी दुखणे याला (क्रॉनिक नेक पेन) म्हणतात.
लक्षणे–
मानेच्या ठिकाणी तीव्र वेदना होणे, मानेची हालचाल मंदावणे, मानेचे स्नायू कडक होणे, आकुंचन प्रसरण न होणे, मानेच्या स्नायूंना सूज येणे, डोके दुखणे, चक्कर येणे, भोवळ येणे, खाली पडणे- अथवा बेशुद्ध होणे, हाता-पायांना मुंग्या येणे, ताकद कमी होणे, स्नायू सुकणे इत्यादी.
कारण–
ग्रीवा स्पॉन्डीलोसिस मुळे नेहमी मान दुखत असते, मान मुरगळणे, आवटळणे, आखडणे, झोपण्याची, बसण्याची, उभे राहण्याची, चुकीची पद्धती, काही वेळेस अपघात किंवा दुखापत झाल्याने मान दुखते. मानसिक ताणतणावाने देखील मानदुखी जडते.
उपचार-
1) मानेवर ताण देणे टाळा, कार्यक्रमात किंवा ऑफिसात मानेवर दबाव येईल अशा स्थितीत बसू नये. संगणक, मोबाईल, टीव्ही स्क्रीनवर जास्त वेळ काम करू नये. मानेवर जास्त बोजा घेऊ नये.
2) योग्य तक्का, उशी वापरा.
3) योग्य स्थितीत झोपावे.
4) जड वजन उचलू नये.
5) हेल्मेट थोडे दिवस टाळावे, मोटरसायकल प्रवास टाळावे
6) नेक-स्ट्रेंथिंग एक्सरसाइज कराव्यात. मानेचे स्नायू बळकट होण्यासाठी योग्य मार्गदर्शकाकडून हे व्यायाम शिकावेत.
7) कठोर परिश्रम थोडे दिवस टाळावे.
योगोपचार–
सूर्यनमस्कार– सूर्यनमस्कार स्नायू शिथिल करण्यासाठी दररोज करणे आवश्यक आहे.
आसन-
उभ्या स्थितीत– ताडासन, कटीचक्रासन, त्रिकोणासन, कोणासन, उत्कटासन, वक्रासन
बैठ्या स्थितीत– अर्ध मत्सेंद्रासन,उष्ट्रासन
पाठीवरील आसन– पवन मुक्तासन, शवासन
पोटावरील आसन– भुजंगासन, सर्पासन, शशांकासन
क्रिया- कपालभाती, वमन
प्राणायाम– नाडीशोधन, सूर्यभेदन, भस्रिका, भ्रामरी
ध्यानधारणा– प्रणव ओंकार उच्चारण करावे.
मुद्रा- सिंहमुद्रा ,योगमुद्रा , अश्विनी मुद्रा
निसर्गोपचार– मसाज हा सर्वोत्तम उपचार आहे.
1) वेदनादायक भागावर सौम्य मालिश करावी. असे केल्याने वेदना कमी होतात व रक्त प्रवाह सुधारतो.
2) गार-गरम शेक द्यावेत. यामुळे वेदना कमी होते, यात भौतिक उपचार लाभदायी आहे.
3) पाच किलोपासून दहा किलोपर्यंत ट्रॅक्शन ताण द्यावा.
4) आयएफटी (IFT), अल्ट्रासाउंड, वॅक्स बाथ उपयुक्त आहे.
5) यात मानेचे व्यायाम अति महत्त्वाचे आहेत.
6) आहार साधा घ्यावा. मोड आलेले तृणधान्य, पालेभाज्या रसाहार घ्यावा.
7) B12 व D जीवनसत्व, कॅल्शियम वाढेल असा आहार घ्यावा.
वर्ज-
1) प्रवास टाळावा. मोटारसायकल चालविणे टाळावे.
2) चुकीचे बसणे झोपणे चालणे टाळावे.
3) धुम्रपान, अल्कोहोल वर्ज करावे.
– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई–मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर: ९८२२४५०७६८
—