नाशिक : प्रतिनिधी
आरटीओ ऑफीसजवळील किशोर सूर्यवंशी रोडवर असलेल्या प्रणित विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) येथे महाराष्ट्र प्रतिकृती पाहण्यासाठी शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. याद्वारे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक, भौगोलिक रचना जाणून घेण्याची संधी मिळाली. यावेळी विद्या सेवा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रणित पिंगळे यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले.
प्रणित विद्यालय आणि त्यांच्या पर्यावरणीय क्लब अंतर्गत दर महिन्याला विद्यार्थ्यांच्या सामाजिक, व्यवहारिक आणि आर्थिक विकासासाठी विविध ठिकाणी भेटी आयोजित केल्या जातात. या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते.
विद्यार्थ्यांनी या भेटीत राज्यातील डोंगररांगा, नद्यांची नावे, नद्यांची उगम स्थाने, धरणांची नावे, पठारी प्रदेश याविषयी निरीक्षणाद्वारे माहिती जाणून घेतली. या भेटीद्वारे महाराष्ट्रास लागून असलेल्या राज्यांची ओळख, तसेच प्रत्येक शहराचे समुद्रसपाटीपासूनचे प्रत्यक्ष अंतर हे निरीक्षण,आकलन क्षमतेद्वारे जाणून घेतले.
—