नामस्मरणात विठ्ठल विठ्ठल हे जाणीवपूर्वक म्हणले जाते. कालांतराने ते शब्द आमच्या शरीरशास्त्राचा, मानसिकतेचा भाग होऊन, आमच्या श्वासाशी एकरुप होतात. याचा फायदा काय आणि तोटा काय? याचा विचारसुद्धा मनाला शिवत नाही. कारण ते नाम आमच्या जगण्याचा एक भाग होऊन जाते. एवढंच काय तर ते हृदयाचे ठोके बनून जाते.
—
मानवाला जीवन जगताना जीवनावश्यक बाबीबरोबर, आत्मिक शांतीची गरज असते. सार्वजनिक, आध्यात्मिक, धार्मिक महोत्सवात जीवन जगण्याची एक नवी स्फूर्ती मिळत असते. ती माणसाला उन्नती आणि प्रगतीकडे प्रोत्साहित करते. जीवन नुसतं जगायचं नसतं, तर त्याचा महोत्सव करायचा असतो.
एका विज्ञाने काय करावे। ऐसी घेसी जरी मनोभावे। तरी पै आधी जाणावे। ते चि लागे ।।ज्ञा।।
आजच्या या विज्ञानयुगात ईश्वराच्या व्यापक स्वरुपाची जाणीव करुन घेण्यासाठी, ज्ञानाबरोबर विज्ञानाची गरज आहे. आज तर विज्ञानाचा आधार आणि अध्यात्म ज्ञानाचा संस्कार या दोहोंचा समन्वय मानवी वंशाला वाचवू शकतो. शेवटी विज्ञानाचं प्रयोजन आनंद हेच आहे. जीवनात विज्ञान ही शक्ति, प्रपंच ही युक्ती तर अध्यात्म ही मुक्ती आहे.
मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने अपार संपत्ती कमावली. पण त्या संपत्तीचा आनंद घ्यावयाचा असेल, तर त्यासाठी सुविचार, सदाचार आणि त्याच बरोबर सत्संगाची आवश्यकता आहे. भक्ति हा शरिराचा, बुद्धीचा आणि बुद्धिमत्तेचा विषय नसून, तो हृदयाचा, मनाचा अणि आत्म्याचा विषय आहे.
नामस्मरणात विठ्ठल, विठ्ठल हे जाणीवपूर्वक म्हणले जाते. कालांतराने ते शरीरशास्त्राचा, मानसिकतेचा भाग होऊन जाते. एव्हाना आमच्या श्वासाशी ते शब्द एकरुप होतात. याचा फायदा काय तोटा काय? याचा विचार सुद्धा मनाला शिवत नाही, कारण ते नाम जगण्याचा एक भाग होऊन जातं. एवढंच काय तर ते हृदयाचे ठोके बनून जातं. नामस्मरण श्रद्धा, भक्तिच्या जोरावर ईश्वराशी तादात्म्य वाढवायला शिकवते. वारकरी संतांनी भक्ति शास्त्र सुलभ केलं आणि नामस्मरणात आणलं.
अखंड अगर्वता होऊनी असती। तयांची विनय हे चि संपत्ती।।ज्ञा।।
पवित्र शरीर, गोड वाणी, भगवंताचे नामस्मरण, संवेदनशील मन, आत्मचिंतन करणारी बुद्धी, लहान मुलांप्रमाणे निरागस मन. जीवनाची समज, प्रेम, त्याग, आनंदमय वर्तनाचा अंगीकार याने पारमार्थिक जीवनाला समृद्धी प्राप्त होते.
ज्ञानियांचा आणि तुकोबांचा तोच माझा वंश आहे । माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे.।।
भक्ति म्हणजे आदराने केलेले कर्म. कर्म आदराने केले की, ती उपासना होते.
वारकरी सांप्रदायाचा सोपेपणा कशात असेल तर, महाराष्ट्रातील संत आपल्या व्यवसायातून संतपदाला पोहचले. साध्या माणसांच्या वाट्याला आलेले कर्म ही पूजा मानली आणि त्याच पूजेतून त्यांना आत्मसाक्षात्कार झाला.
दळीता काडींता तुज गाईन अनंता ॥
यातुनच महाराष्ट्रातील संत परंपरा ही आदर्श जीवनाची पायवाट ठरली. बहुजन समाजाचं आराध्य दैवत म्हणजे विठोबा.
चिखलात लागणिला लावी वाकुन ग रोप। स्पर्श सावळ्या पायांचा नटत्यात सार वाफ। पाणि पिऊन फुगतो मऊ ढकळी वरंबा। काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा।।
ज्ञानेश्वरी, गाथेतील तत्वज्ञान हे फक्त वाचण्यासाठी नाही, तर ते आत्मसात करण्यासाठी रिझवण्यासाठी, पचवण्यासाठी आहे. मरता केंव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख केंव्हाही उपभोगता येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे.
पंढरीच्या वाटेवर चालणारा वारकऱ्यांचा विटेवरचा पांडुरंग हे सुखाचे साधन नाही, तर पांडुरंग हेच त्याचं सुख आहे. परमार्थातील प्रवास माणसाला चिंतेकडून चिंतनाकडे व चिंतनाकडून चिरंतनाकडे नेतो.
वारीच्या वाटेवर पुरुष असो की स्त्री, त्यांच्याकडे माऊली म्हणूनच पाहिलं जातं. वारकरी सांप्रदायानी आम्हाला सर्वांकडे माऊलींच्या नजरेने पाहावयास
शिकवलं. कारण माऊली ती असते जिच्याकडे सहन करण्याची ताकद असते. मांगंल्याबरोबर ऊर्जा देण्याची एक ताकद असते.
काय बहु बोलो सकळा। मिळविलो जन्मफळा । ग्रंथ सिद्धीचा सोहळा। दाविला जो हा॥
ना आम्हाला देव कधी दिसला, ना संत कधी पाहावयास मिळाले. कारण कित्येक शतकानंतर आमचा जन्म झाला. म्हणूनच संतांच्या ग्रंथसंपदेच आजही भक्तिभावाने पूजन करतो आहोत. कारण संसारिकाचा संन्याशी, घराचे मंदिर, माणसाचा देव, विपत्तीची संपत्ती, दुःखाचे सुख व विश्वाचे ब्रह्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी आणि तुकोबांच्या गाथेत आहे.
नामा म्हणे धावा केशवा माधवा। हरिनाम गाता मृदंगाची साथ। अमृताची गोडी तुझ्या भजनात। माझा पांडूरंग ऐकतो अभंग। भक्त झाले दंग हरी किर्तनात।।
ज्या संतांनी अभंगातून महाराष्ट्र मोठा आणि भक्तिमय करण्याचा प्रयत्न केला. आजही काही प्रतिभाशाली किर्तनकार तीच ओवी, तोच अभंग आपल्या मुखामध्ये घेऊन वारीला सुंदरता प्राप्त करुन देत आहेत. ईश्वराने आपणास जे कांही ज्ञान दिलं ते ज्ञान वाटत चालताना भक्तिमय होतं, तेंव्हा वारकऱ्यांचं मन प्रसन्नते बरोबर सुगंधीत होतं.
किर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही तर मनोमंथनाचं साधन आहे.
वारीच्या वाटेवर नादब्रह्म आणि नामब्रह्म यांचा सुरेख संगम साधत वारकरी परब्रह्माच्या आनंदाला स्पर्श करतो.
वारीच्या वाटेवर मनामध्ये भक्तिचा अविष्कार तयार होतो. साधक त्या विठ्ठलाशी एकरुप होतो. शब्द, अर्थ, विचार, संगीत, स्वर, ताल, लय, टाळ, मृदंग या सर्वांमुळे अभंगातुन मनाची एकाग्रता तयार होते.
अनंत रुपाचे हे सार । अनंत तिर्थाचे माहेर। अनंता अनंत अपार। तो हा कटीकर विटे उभा॥ धन्य धन्य पांडुरंग॥
साधकाला देव स्वप्नात दिसतो. सिद्धांच्या तो हृदयात असतो. संतांना तो प्रत्यक्ष भेट देतो. आणि सामान्यांना तो मूर्तीत अथवा चित्रात पहावा लागतो. म्हणूनच आम्ही त्याचं परब्रह्म रुप पाहण्यासाठी वारीच्या वाटेने जातो. भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण. नादब्रह्माशी एकरुप होऊन सप्तसुरांची आळवणी करीत, विठ्ठलाच्या दिव्य शक्तिचे गुणगाण गात वारीची पाऊलवाट केंव्हा संपते ते कळतही नाही.
वारीने आम्हाला काय मिळालं हे सांगणं अवघड आहे. आलेली प्रचिती हेच सांगते की , वारीच्या वाटेवर मनातला राग कमी होतो. माझा मीपणा, तणाव, माझी लालसा, एव्हाना स्वार्थ सुद्धा मनाला शिवला नाही. संसाराच्या आसक्ती बरोबर मृत्युची भीती कमी होते. कारण वारीत समर्पणाचा भाव मनात ठसतो. त्या विठ्ठलाचं परब्रह्म रुप पाहिलं की, साऱ्याच दुःखाचा विसर पडतो.
प्रत्येक धर्मात त्यांच्या देवतेशी नाते अधिक मजबुत करण्यासाठी, उपवासाचा सल्ला दिला जातो. उपवास मन आणि शरीर शुद्धीची एक प्रक्रिया आहे. मन एकाग्र करुन चित्त शांत ठेवणे व पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व एक मन विठ्ठल चरणी अर्पण करणे हीच एकादशी.
– अनंत भ. कुलकर्णी
बीड
—