नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवात पीओपीपासून बनविलेल्या गणपती मूर्तीपासून प्रदूषण होत असल्याने शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्ती वापरात येत आहे. आता यात आणखी एक पाऊल पुढे पडले आहे, ते म्हणजे गोमय गणपतीची मूर्ती तयार करण्याचे. हे शिवधनुष्य उचलले आहे, नाशिकमधील प्रेमा वर्मा व त्यांचे पती राजेंद्र वर्मा यांनी. त्यांची डाॅक्टर्स मुले व सूनबाई यांचीही या कामात मदत होत आहे. डाॅ. वर्मा फाउंडेशनच्या माध्यमातून ही गोमय मूर्तीकला सर्वांपुढे साकार होत आहे. त्याला गणेश भक्तांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न
गणपतीची मूर्ती तयार करताना पीओपीच्या माध्यमातून तयार मूर्तींमुळे नंतर जलप्रदूषण होते. त्यामुळे नैसर्गिक वस्तूंपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याचा विचार पंचवटीतील स्वामी नारायण नगरमधील रहिवासी असलेल्या शिक्षिका प्रेमा वर्मा व त्यांच्या कुटूंबियांनी यांनी केला. त्यांनी शाडू मातीपासून निर्मित मूर्तीकामास सुरूवात केली. पण, लवकरच लक्षात आले की, गणपतीची गोमय मूर्ती तयार करू शकतो. ही मूर्ती सुंदर, सात्विक व पाण्यात लवकर विरघळणारी असेल, असा ध्यास त्यांनी घेतला.
या मूर्तीचा प्रभामंडल तपासला व तोही प्रभावी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या कामात अखंड बुडवून घेणाऱ्या प्रेमा वर्मा, पती राजेंद्र व मदतीस तत्पर कुटूंबातील इतर सदस्य डाॅ. विश्वा, डाॅ. ओशन, ओवी व डाॅ. क्षितीज हे सर्व आनंदीत झाले. त्यामुळे हे काम अधिक उत्साहात सुरू झाले.
वैदिक रंगही वापरणार
गोमय मूर्ती तयार करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. जशी पूर्णपणे गोमय मूर्ती बनविली, तशीच 60 टक्के शेण व 40 टक्के शाडू माती एकत्र करूनही मूर्ती बनविणे वर्मा यांना शक्य झाले आहे. सोबत पूर्णपणे शाडू मातीपासून निर्मित मूर्ती तयार केली आहे. अशाप्रकारे एकाच छताखाली नैसर्गिक वस्तूंपासून निर्मित तीन प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. यात पुढच्या वर्षी भर पडणार आहे, ती वैदिक रंग वापरण्याची. हा रंग गायीचे शेण व मूत्रापासून तयार केला जाणार आहे.
गणेशोत्सव म्हटला म्हणजे, लोकमान्य टिळकांचा नामोल्लेख आलाच. त्यांना गणेशोत्सवात एक सात्विक भाव हवा होता. तो मातीपासून तयार मूर्तीमुळे येत होता. पण, नंतर पीओपीपासून गणपती मूर्ती तयार होऊ लागल्या. आता, गोमय सात्विक मूर्तीमुळे हा उत्सव अधिक आनंदी होऊन सर्वत्र प्रसन्नता असेल.
– राजेंद्र वर्मा, नाशिक