कृषी क्षेत्रातील `पद्मʼ : पद्माकर मोराडे

मिडीया क्षेत्रातील देशातील अग्रगण्य `नवभारत नवराष्ट्र ग्रुपʼतर्फे म्हसरूळ (नाशिक) येथील पद्माकर मोराडे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा `नवराष्ट्र सन्मानʼ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

0

म्हसरूळ, (वा.)
मिडीया क्षेत्रातील देशातील अग्रगण्य `नवभारत नवराष्ट्र ग्रुपʼतर्फे येथील पद्माकर मोराडे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा `नवराष्ट्र सन्मानʼ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा हा गौरव झाला आहे. त्यानिमित्त त्यांचे कार्य जाणून घेऊ या…
             
पद्माकर मोराडे…हे नाव अनेक क्षेत्रांत परिचित आहे. पत्रकारितेपासून ते साहित्य, समाजिक कार्य, शेती क्षेत्रातही त्यांची मुशाफीरी आहे. सध्या त्यांनी शेती व शेतीपूरक उद्योगांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अशा या अवलियाचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे…

शेतकरी अनेक संकटांना पूर्वापारपासून तोंड देत आहे. आताचे प्रश्न वेगळे आहेत. कृषी क्षेत्र वाढत्या नागरिकरणाने सतत कमी होत आहे. तसेच ते छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागले जात आहे. बेरोजगारीने घरातील बहुतेक तरूण शेतीवरच अवलंबून आहेत. अशा वेळी हीच शेती वेगळ्या पद्धतीने केली तर किफायतशीर ठरू शकते, हे आपल्या कृतीतून दाखविण्याचे काम नाशिकचे प्रगतशील शेतकरी पद्माकर मोराडे करत आहे. त्यांचे शेळीपालन प्रकल्पातील योगदान तर राज्यातीलच अगदी कानाकोपर्‍यातील भागातील शेतकऱ्यांना बळ देणारे ठरले आहे. शेतीस पूरक उदयोगांची जोड दिली, तर शेतकरी आर्थिक व त्याद्वारेच विविध क्षेत्रांत भरारी मारू शकेल. हे मोराडे यांनी ओळखले. `आधी करावे व मग सांगावेʼ या उक्तीनुसार त्यांनी प्रथम स्वतःच्या शेतात शेळीपालन प्रकल्प सुरू केला. त्यासाठी इतरत्रही सपोर्टींग युनिट सुरू केले. अन् छोट्या कालावधीतच हा व्यवसाय फायदेशीर ठरला. त्यामुळे दूरवरच्या शेतकऱ्यांचेही लक्ष त्यांनी वेधून घेतले. मोराडे यांची कर्मभूमी म्हसरूळ (नाशिक) येथे अगदी देशभरातून शेतकऱ्यांची वर्दळ सुरू झाली. यातून प्रेरणा घेत शेकडो शेतकरीही अर्थिकदृष्ट्या प्रबळ झाले. त्याची दखल कृषी क्षेत्राची पंढरी `बारामतीʼनेही घेतली. यातूनच मोराडे यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक कृषी पुरस्कार मिळाला…त्यांचा केवळ हाच सन्मान नव्हता, तर तब्बल 168 हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. कृषी अभ्यास मंडळावर त्यांनी काम केले.     

      मोराडे यांनी शेळीपालन व्यवसायातील अनुभवांवर आधारित `व्यावसायिक शेळीपालनʼ हे पुस्तक मराठी भाषेत लिहिले. या पुस्तकाने खपाचे अनेक विक्रम मोडले. शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत हे पुस्तक आहे. या मराठी पुस्तकाचे हिंदी, इंग्लिश, उर्दू, अरबी या भाषेतही भाषांतर झाले आहे. या पुस्तकाने शेळीपालन व्यवसाय घराघरात पोहोचला.
       मोराडे हे विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीत होते. साहित्य हा प्रांत त्यांना समृद्ध करून गेला. त्यांच्या कविता गाजल्या. यातूनच ते पत्रकारितेत आले. अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. अनेक दिग्गजांचा सहवास, मुलाखती त्यांनी घेतल्या. यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ज्येष्ठ्य नेते शरद पवार यांचाही समावेश आहे.

पद्माकर मोराडे यांची प्रतिक्रीया 

मोराडे यांना यापूर्वी मिळालेले काही पुरस्कार असे :
– वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान (पुसद) तर्फे वसंतराव कृषी भूषण पुरस्कार 2016
– महात्मा फुले जेष्ठ नागरिक मंडळ (नाशिक) तर्फे राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार – 2016
– कृषीथॉन आदर्श शेळीपालन पुरस्कार – 2019
– ॲग्रो केअर ग्रुप ऑफ कंपनीज आयोजित कृषीभूषण एफ. पी.ओ. स्टार्टअप फेडरेशनतर्फे नॅशनल ॲग्री यूथ ॲवार्डस् – 2021
– कृषी विज्ञान केंद्र (बारामती)तर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार 2019
– नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हा आदर्श युवा पुरस्कार – 2000
– डॉ. ब्लॅक ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार – 2017
– स्वराज्य परिवार (नाशिक)तर्फे नाशिक भूषण पुरस्कार

पुरस्कार वितरण असे होणार                            पत्रकार दिनी म्हणजे 6 जानेवारी 2022 ला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्याचे ज्येष्ठ्य मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मोराडे यांना देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम महाकवी कालिदास कलामंदिर येथे सकाळी 11 ते दुपारी 2 : 30 वाजेदरम्यान होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.