उपक्रमाचे आयोजक – श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट (नाशिक). अध्यक्ष – डॉ. तस्मिना शेख, सचिव – सुनिता पाटील.
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत निसर्ग विद्या निकेतनच्या निसर्गोपचार डिप्लोमाच्या प्रथम बॅचच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनतर्फे रोगमुक्त भारत व कौन बनेगा स्वास्थ्य रक्षक कार्यक्रम झाला.
नाशिक : प्रतिनिधी
कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात औषधोपचार नेमके नव्हते. तेव्हा मी शहराचा प्रथम नागरिक या नात्याने निसर्गोपचार, योगोपचार, होमिओपॅथी आदींचा आधार घेत नाशिकरांना याबाबतचे साहित्य पुरविले. त्यांच्यात जनजागृती केली. अर्थात याकामी मी या क्षेत्रातील व्यक्तींचे सहकार्य घेतले. या पार्श्वभूमीवर निसर्ग विद्या निकेतनतर्फे निसर्गोपचाराचे अभ्यासक्रम, तसेच शिबिरांसारख्या उपक्रमांद्वारे हेच काम पुढे नेले जात आहे. त्यामुळे हे कौतुकास्पद कार्य आहे, असे गौरवपूर्ण उदगार महापौर सतीशनाना कुलकर्णी यांनी काढले.
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत निसर्ग विद्या निकेतनच्या निसर्गोपचार डिप्लोमाच्या प्रथम बॅचच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनतर्फे रोगमुक्त भारत व कौन बनेगा स्वास्थ्य रक्षक कार्यक्रम झाला. तेव्हा महापौर कुलकर्णी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व मविप्र संस्थेचे संचालक नाना महाले, ऑर्गनायझेशनचे समन्वयक डाॅ. सुशांत पिसे, ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी शिवानंद महाराज, प्रेरणादायी वक्ते व योगशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. राज सिन्नरकर, ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्राच्या सहनिमंत्रक, उत्तर महाराष्ट्राच्या संयुक्त सचिव आणि श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्ग उपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतनच्या अध्यक्ष डाॅ. तस्मीना शेख, ट्रस्टच्या सचिव आणि ऑर्गनायझेशनच्या जिल्हा सहसचिव सुनीता पाटील, मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. तुषार विसपुते, उल्हास कुलकर्णी प्रा.जगदीश मोहुर्ले, संध्या सोमय्या उपस्थित होते.
नाना महाले म्हणाले की, उपचार करणे दिवसेंदिवस महाग होत असताना, आयुर्वेद व निसर्गोपचार हे अल्पखर्चिक ठरतील. मानवाला सुखी करण्याची ताकद या प्राचीन उपचार पद्धतींमध्ये आहे. मात्र, त्यासाठी निसर्गाकडे पुन्हा परतावे लागेल. श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्ग उपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतन हे काम तळमळीने करत आहे.
नाशिकमध्ये निसर्गोपचार हाॅस्पिटल हवे.
डाॅ. पिसे म्हणाले की, कोरोना काळात कुटूंब व्यवस्थेत निसर्गोपचाराने सकारात्मक बदल घडवून आणले. चांगले अन्न, नातेसंबंध, आनंद मिळाला. याप्रसंगी डाॅ. पिसे यांनी महापौरांकडे मागणी केली की, महापालिकेमार्फत 50 बेडचे निसर्गोपचार हाॅस्पिटल उभारण्यात यावे. तेव्हा महापौर कुलकर्णी यांनी सांगितले की, आपला महापौरपदाचा कार्यकाळ आता संपत आहे. त्यामुळे निवडणूकीनंतर आपण या हाॅस्पिटलसाठी प्रयत्नशील राहू.
महामंडलेश्वर स्वामी शिवानंद महाराज म्हणाले की, सर्वच संस्थांना राजाश्रय मिळतोच असे नाही. पण, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनला हा आश्रय आहे. सततच्या चांगल्या कामगिरीमुळे या ऑर्गनायझेशनला चांगले सहकार्य मिळत आहे. त्याचा फायदा घेऊन निसर्गोपचार समाजातील सर्वांपर्यंत पोहचवावा.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ट्रस्टच्या अध्यक्ष डाॅ. तस्मीना शेख यांनी स्वागत केले. ट्रस्टच्या सचिव सुनीता पाटील यांनी आभार मानले.