मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी, संपन्नतेसाठी विज्ञानाबरोबर अध्यात्माची तेवढीच गरज आहे. आज बाह्य शत्रुपेक्षा आमच्यात दडलेल्या विकाररुपी दानवांनी उच्छाद मांडला आहे. आदिशक्तीची उपासना करुन जीवनाला दिव्य शक्तीने सुसज्ज करणे हीच नवरात्री.
दुर्गुणांचा नाश करणारी दुर्गा. विकारी शक्तींचा सामना करण्याचे सामर्थ्य प्राप्त करुन देणारी, काली. मानवी जीवनाला चैतन्य प्राप्त करुन देणारी उमा. विषय वासनेचा नाश करणारी वैष्णवी. समाधानाचं सौख्य प्राप्त करुन देणारी संतोषी. ज्ञान, गुण, औदार्य, सौख्य, संपदा देणारी लक्ष्मी. शब्दसृष्टीचे मूळ, वेदांची माता, वाणीची देवता, लावण्याचं लावण्य, परब्रह्माची प्रभा, मानवतेची प्रभा खुलवणारी सरस्वती. अशा विविध रूपातून जीवनाला शक्ती आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी नवरात्रीची उपासना केली जाते.
“प्रथमच शैलपुत्री च व्दितीयं ब्रह्मचारिणी। तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकम्। पंचमं स्कंदमातेति षष्ठं कत्यायनीति च । सप्तमं कालरात्रिति महागौरीति चाष्टकमं। नवमं सिध्दीदात्री च नवदूर्गा: प्रकिर्तिता:।।
नवदुर्गा, देवी, शक्ती, भगवती, माताराणी, जगतजननी, जगदंबा, परमेश्वरी, परम सनातनी इत्यादी नावाने देवीची उपासना केली जाते.
मानवी जीवनातील अज्ञानी, विकारी दानवा पासून रक्षण करणारी, माते प्रमाणे सांभाळ करणारी, कल्याणकारी, मोक्षदायी, शांती, समृद्धी देणारी देवता म्हणून या शक्ती देवतेची उपासना केली जाते.
या विश्वात कोणत्या न कोणत्या रुपात शक्तीची उपासना केली जाते. साऱ्या ब्रह्मांडात एक अज्ञात शक्ती कार्यरत असते, याची जाणीव आज वैज्ञानिकांना पण आहे.
मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी, संपन्नतेसाठी विज्ञानाबरोबर अध्यात्माची तेवढीच गरज आहे. जीवनावश्यक बाबीबरोबर आत्मिक शांतीची गरज असते. धार्मिक महोत्सवातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असून, ती मानवाला उन्नती आणि प्रगतीकडे प्रोत्साहित करते.
कृष्णाने सुद्धा गीतेत ज्ञान विज्ञान योग सांगितला.
” एका विज्ञाने काय करावे। ऐसी घेसी जरी मनोभावे। तरी पै आधी जाणावे ते चि लागे।।ज्ञा।।
विज्ञान आमचा विश्वास तर आध्यात्म आमचा श्वास आहे.
आज सणाकडे केवळ कर्मकांडाचा भाग म्हणून न बघता, त्यातील सामाजिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, नैसर्गिक, बंधुभावनेचा आशय जाणून घेण्याची गरज आहे. पुराण, ग्रंथ, इतिहास यांचं जर बारकाईने चिंतन केलं, अध्ययन केलं तर एक बाब लक्षात येते की, नैतिक मुल्य, सुविचार केवळ चांगले आहेत म्हणून टिकत नाहीत, तर ते टिकवून ठेवण्यासाठी शक्तीची उपासना करावी लागते.
रावण, कुंभकर्ण, महिषासूर अशा असूरी वृत्तीने तपश्चर्येच्या बळावर अनैतिकतेने नैतिकतेवर विजय मिळवलेला आहे.
दुर्बल लोकांच्या सत्य, संस्कृती, संस्कार यांची कोणीही पूजा करत नाही. म्हणूनच “त्राही माम” करुन सोडलेल्या देवाधिकांना सुद्धा ब्रह्मा, विष्णु, महेश यांची उपासना करावी लागली. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैदिप्यमान तेज प्रगट झाले. ते दैदिप्यमान तेज म्हणजेच “अनादि निर्गुण प्रगटली भवानी”.
याच दैदीप्यमान शक्तीने सतत नऊ दिवस युद्ध करुन महिषासुराला ठार केले.
‘दैव दुर्बल घातक:’ देवता सुद्धा दुर्बलाचा घात करतात.
‘अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता:।। या षड्विकारी दानवांनी मानवी मनावर अधिराज्य चालवलेले असून, मानवी शरीर रोगाचं माहेरघर होत चालले आहे. जीवन स्वार्थी, प्रेम विरहित, भाव शून्य होत चालले आहे. अहंकारी महिषासुर, अत्याचारी नरकासुर, स्त्रीलंपट दुर्गमासुर, भृणहत्यारी अंधकासुर, भ्रष्टाचारी बकासुर ह्या असुरीवृत्ती आजही आमच्यात दडलेल्या आहेत.
” असुषु रमन्ते इति असुर:” असुर म्हणजे आक्राळविक्राळ चेहऱ्याचा, बलदंड शरीराचा, असा कोणी नसून प्राणात व भोगात रममान होणारा व रेड्याची वृत्ती बाळगणारा तो महिषासुर आमच्यातच वास्तव्याला आहे. स्वतःचे सुख पाहणारा तोच रेडा असतो.
मोह महिषासुर मर्दना लागुनी। त्रिविध तापाची करावया झाडणी। भक्ता लागी तु पावसी निर्वाणी।।आईचा जोगवा जोगवा मागेन।।
महाराष्ट्रातील थोर संत एकनाथ महाराजांना त्या काळात दांभिकतेचा अनुभव येत गेला असावा. त्यामुळे त्यांनी अज्ञानाचा अंध:कार दूर करण्यासाठी, त्या आदिशक्तीचे दार ठोठावले. “दार उघड बये दार उघड ” म्हणत एकनाथ महाराज आदिशक्तीला शरण गेले. पारमार्थात आपणास प्रगती साधावयाची असेल तर सर्व प्रथम त्रिविध तापाला दूर सारावे लागते. दांभिकपणा व विचारांचा पसारा न मांडता आत्मबोधाचा झेंडा हातात घ्यावा लागतो. जीवनातील आशा आणि तृष्णा या वासनांना तिलांजली द्यावी लागते. विकल्परुपी नवऱ्याशी काडीमोड करावी लागते. तरच नि:संग मनाने आत्मबोधाच्या परडीत जोगवा मागता येतो. फक्त टिपरी वर टिपरी मारुन, गीतांच्या तालावर ठेक्याने फेर धरणं म्हणजे गरबा नाही. कदाचित तो भक्ती मधला आनंद घेण्याचा भाग असेल.
अन्याया विरुद्ध चिडून उठलेल्या साधकांनी एकोप्याचा भाव जागृत ठेवायाचा आहे. आईला संघर्षा विरुध्द सामना करण्याची शक्ती मागावयाची आहे.
देवीची आठ भुजा हे आठ शक्तीचं प्रतिक आहे. हातात घेतलेल्या शस्त्रांना व आयुधांना रचनेतून एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. सर्वात मोठा दोष कोणता असेल तर स्वतःला दुर्बल समजणं. स्वतःतील सामर्थ्य सिद्ध करणं हे सुर्दशनाचं प्रतिक.
मन, वाणी, कर्माच्या माध्यमातून षड्विकारावर विजय मिळवण्यासाठी त्रिशूळ. सत्य, ज्ञानाचा निनाद करण्यासाठी शंख. ईर्षा, द्वेष, वासना या दानवांना ठार करण्यासाठी तलवार. लक्षावर ध्येय केंद्रीत करुन पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी धनुष्य. जीवनरुपी संघर्षात येणाऱ्या मायेशी युद्ध करण्यासाठी गदा. संसाररुपी दलदलीत प्रफुल्लित राहण्यासाठी कमलपुष्प. आत्मज्योत जागृत ठेवण्यासाठी मशाल. जीवनाच्या संपन्नतेसाठी शास्त्राबरोबर शस्त्रे सुद्धा महत्वाची आहेत.
आज बाह्य शत्रुपेक्षा आमच्यात दडलेल्या विकाररुपी दानवांनी उच्छाद मांडला आहे. शेवटी आदिशक्तीची उपासना करुन जीवनाला दिव्य शक्तीने सुसज्ज करणे हीच नवरात्री.
– अनंत भ. कुलकर्णी,
बीड
—