नाशिक, (वा.)
संत गाडगेबाबा हे अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम व विद्यालय सुरू केले, असे मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर यांनी सांगितले.
मविप्र समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. तेव्हा ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या गीतमंचाने `गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ हे भजन सादर केले. सविता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक शरद शेजवळ यांनी आभार मानले.
—