म्हसरूळ, (वा.)
येथील रहिवासी असलेल्या रुही देशमुख या विद्यार्थिनीची अमेरिकेतील आघाडीच्या इंटेलीया कंपनीमध्ये ‘सिनीअर रिसर्च असोसिएट’ म्हणून निवड झाली असून, ‘इम्युनॉलॉजी’ या विषयावर ती संशोधन करणार आहे. विशेष म्हणजे जगातील मोजक्याच विद्यार्थ्यांची ज्या ठिकाणी निवड केली जाते. त्या ठिकाणी नाशिकमधील म्हसरूळच्या विद्यार्थिनीची निवड झाल्यामुळे तिचे व देशमुख कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रूहीच्या निवडीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. म्हसरूळ येथील रहिवासी असलेले आणि दिंडोरी रोडवरील परीक्षित हॅास्पिटलचे संचालक डॉ. सतीश देशमुख यांची रूही ही कन्या आहे. तिचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील रासबिहारी हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण एचपीटी महाविद्यालयात झाले आहे. पुढील शिक्षण मुंबईतील जय हिंद कॅालेजला झाले. त्यापुढील एम. एस. बायोटेक्नॅालॅाजीचे शिक्षण तिने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात पूर्ण केले आहे.
तिने अत्यंत यशस्वीरित्या आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपली निवड सार्थ ठरवली. आता जेथे जगातील मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड होते, अशा ठिकाणी तिची निवड झाली आहे. रुहीच्या निवडीमुळे नाशिकमधील म्हसरूळचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार आहे. तिच्या या निवडीबद्दल म्हसरूळ परिसरात आनंद व्यक्त केला जात असून, सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
माझे कुटुंबिय व गुरुजन यांच्या मार्गदर्शनामुळे मला हे शक्य झाले आहे. यापुढील वाटचालीतही सर्वांचे आशीर्वाद कायम राहतील. तसेच संशोधनात नेहमी अग्रेसर राहू.
– रूही देशमुख