नाशिक : प्रतिनिधी
योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया आणि सेल्फ रिअलाइझेशन फेलोशिप, अमेरिका यांचे परम परम गुरुदेव श्री श्री महावतार बाबाजी यांचा स्मृति दिवस नाशिक येथील मुख्य ध्यान केंद्र सोहम, सहजीवन कॉलनी, कॅनडा कॉर्नर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात क्रियायोग ध्यान, भजन, कीर्तन आणि सत्संग यांचा समावेश होता. परिसरातील अनेक शिष्यांनी आपल्या परम परम गुरुदेवांच्या प्रति श्रद्धा व्यक्त केली.
श्री श्री परमहंस योगानंदांनी लिहिलेल्या “योगी कथामृत” (ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी) या सर्वदूर प्रशंसा प्राप्त झालेल्या, अभिजात अध्यात्मिक पुस्तकामध्ये त्यांच्याविषयी जे लिहिले आहे, त्याद्वारेच जगाला महावतार बाबाजींची प्रामुख्याने ओळख झाली. ते आज जगातील सर्व क्रियायोग्यांचे परमगुरू आहेत आणि त्यांच्या शिष्यांच्या आध्यात्मिक प्रयत्नांमध्ये दयाळूपणे मार्गदर्शन करतात. मध्ययुगीन काळात लुप्त झालेले क्रियायोगाचे प्राचीन तंत्र बाबाजींनीच पुन्हा शोधले आणि स्पष्ट केले.
“योगी कथामृत” मध्ये उल्लेख आहे की बाबाजी आपल्या उन्नत शिष्यांच्या समूहासह हिमालयातील दुर्गम प्रदेशात जागोजागी फिरतात आणि केवळ काही निवडक लोकांसमोर स्वतःला प्रकट करतात. या दैवी अवताराच्या सर्व उत्कट भक्तांनी, “जेव्हा जेव्हा कोणी बाबाजींचे नाव अत्यंत पूज्य बुद्धीने घेत असतो, तेव्हा तेव्हा त्या भक्तावर ताबडतोब अनुग्रह होत असतो.” हे लाहिरी महाशयांचे विधान सत्य असल्याची ग्वाही दिलेली आहे. खरंच, सर्व निष्ठावान क्रियायोग्यांना त्यांच्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गावर त्यांचे रक्षण आणि मार्गदर्शन करण्याचे वचन महावतार बाबाजींनी दिले आहे.
—