म्हसरूळ, (वा.)
नाशिकमध्ये होत असणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालचित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव याला आपल्या चित्रकलेचे प्रदर्शन करण्याची मोठ्ठी संधी मिळाली आहे.
सातव्या वर्षीच पोर्ट्रेट
पाचवीत शिकणारा कुंचल्याचा किमयागार मयुरेशने वयाच्या सातव्या वर्षापासून पोर्ट्रेट काढण्याचा छंद जोपासला. त्याची कला सध्या चांगलीच बहरली असून आपल्या प्रतिभेने नामवंत कलाकारांना तो प्रभावित करत आहे.
व्हिडीओज पाहून सराव
जयभावाणी रोडवरील, दुर्गानगर भागात राहणाऱ्या व टीब्रेवाला इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये शिकणाऱ्या मयुरेशने युट्युबवरील व्हिडीओज पाहून आपली कला जोपासली आहे. व्यक्तिचित्रण काढण्यात त्याला विशेष आनंद मिळतो.
लाईव्ह चित्र रेखाटनार
या साहित्य संमेलनात मयुरेश तीन बाल कवींचे चित्र लाईव्ह रेखाटणार असून नाशिकमधील इतरही कलाकारांना या व्यासपीठावर चित्र सादर करण्याची संधी मिळणार आहे. मयुरेशची चित्रशैली लाईव्ह बघण्यास नाशिककरांना संधी याठिकाणी मिळणार आहे.
दिग्गजांचे मार्गदर्शन
नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार प्रा. राहुल पगारे, प्रा. संदीप पगारे यांनी मयुरेशला हे मोठ्ठं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. चित्रकार प्रफुल्ल सावंत, राजेश सावंत, के. कुंद्रा यांचा आदर्श समोर ठेवून त्याचा प्रवास सुरु आहे. चित्रकार प्रा. ज्ञानेश्वर डंबाळे, मनस्वी सोनवणे, नंदिनी खुटाडे यांचे मार्गदर्शन मयुरेशला लाभत आहे.
वडील म्हणून अभिमान
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रथमच चित्रकारांना आणि चित्रकलेच्या मंचाला स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत चित्रकारांच्या पंगतींत माझा मुलगा, बालचित्रकार मयुरेश लाईव्ह चित्र काढण्यासाठी बसणार आहे. त्याचा खूप मला खूप अभिमान आहे.
– राजेंद्र आढाव (वडील)
माझी जबाबदारी वाढली
साहित्य संमेलनामध्ये मला संधी मिळाली, परंतु माझी जबाबदारी वाढली आहे. बालचित्रकार म्हणून सादरीकरण करताना मला सर्वोत्तमता गाठावयाची आहे. संधी देणाऱ्या मान्यवरांच्या अपेक्षा पूर्ण होतील, याची जाणीव आहे. मी मन लावून माझी कला सादर करेल. मला याठिकाणी मंच मिळाला म्हणून मी आनंदी आहे.
– मयुरेश आढाव