मराठा हायस्कूलमध्ये छत्रपती  राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ व वार्षिक निकाल पत्रक वाटप  उत्साहात

0

नाशिक, प्रतिनिधी
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज  स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ  व वार्षिक निकाल पत्रक वाटप कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. लक्ष्मणराव लांडगे (नाशिक शहर संचालक म.वि.प्र समाज) होते. व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य बाजीराव ठाकरे, यादवराव शिंदे, सुनील निरगुडे, मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, उपमुख्याध्यापक रमाकांत मोरे, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे व रंजना घंगाळे उपस्थित होते.
मुख्याध्यापिका वारुंगसे यांनी छत्रपती राजर्षी  शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच वार्षिक निकाल पत्रक वाटप प्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती  राजर्षी शाहू  महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोहम मोरे व श्रुती कहांडळ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक परीक्षेमध्ये जे विद्यार्थी  प्रत्येक इयत्तेतून प्रथम क्रमांकाने  उत्तीर्ण झाले, त्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील मान्यवरांच्या हस्ते झाला.

     ॲड. लक्ष्मणराव लांडगे म्हणाले, की आपल्या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत, कलावंत, साहित्यिक, कलाकार, गायक असे अष्टपैलू जन्मले आणि वाढले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले. त्याचप्रमाणे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांसारखा  द्रष्टा व संवेदनशील राजा महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. शिक्षणाची गंगा तळागाळातील समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणाबरोबरच अनेक सामाजिक प्रश्न त्यांनी सोडवले. शिक्षण आणि समानतेचे धोरण त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये चालू केले. परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता  प्राप्त केली. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देखील आजच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी दिली.

संगीतशिक्षक दिनकर दांडेकर यांनी गीत मंचासह राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील चित्रकला शिक्षकांनी उत्कृष्ट फलक लेखन केले. मान्यवर व शालेय समिती सदस्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व  शुभेच्छा दिल्या.
सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक  रमाकांत मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती प्रमुख चैताली गीते, उपप्रमुख अर्चना गाजरे, सांस्कृतिक समितीतील सदस्य, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.