थांब लक्ष्मी कुंकू लावते

0

मकर संक्रांतीच्या पर्व समयी हळदी कुंकू करतात सुवासिनी।
  नांदो सदैव आनंदी आनंद आपल्या सर्वांच्या जीवनी।
   प्रेम, प्रसन्नता, सुखशांतीचे भाग्य संसारी लाभू दे ।
   या शुभ मंगलमय समयाला “थांब लक्ष्मी कुंकू लावते”.।।

मम स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्यसमृद्धी दीर्घायु:। महैश्वर्य मंगलाभ्युदय  सुखसंपदादी अस्मिन मकर संक्रमण पुण्यकाले कल्पोक्तफल सिद्धये।
बलप्राप्ती, अन्नलाभ, धनप्राप्ती,सुखप्राप्ती, प्रजाप्राप्ती, सुखशांती, आणि सर्व ऋतूत संसारात आनंदाची प्राप्ती निरंतर राहावी म्हणून हातात सुगडं घेऊन रुक्मिणी मातेच्या पदराला पदर लावत अखंड सौभाग्याचं मागणं मागीतलं जातं.
मकर संक्रांतीच्या पर्वणीला हळदीकुंकू करतात सुवासिनी।
   राहो सदैव आनंद आपल्या सर्वांच्या जीवनी।
   प्रेम, प्रतिभा, सुख शांतीचं भाग्य संसारी लाभु दे।
   या शुभ मंगल समयाला
“थांब लक्ष्मी कुंकू लावते”।।
शास्त्रीय दृष्टिकोनातून आपापसात प्रेम, सद्भावना सांभाळत राष्ट्रीय एकात्मता जोपसली जाते. म्हणून प्रत्येक सण, रुढी परंपरेने साजरा केला जातो.
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांत साजरी केली जाते. या सणाला अध्यात्मिक, शास्त्रीय, व भौगोलिक दृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. इतर सण तिथी प्रमाणे साजरे केले जातात. संक्रांत हा सण मात्र कॅलेंडर वर्षाप्रमाणे प्रतिवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. लिप वर्षात मात्र १५ जानेवारीला साजरा केला जातो . संक्रांतीच्या आधी दिवस लहान आणि रात्र मोठी असते, तर संक्रांतीच्या नंतर रात्र लहान आणि दिवस मोठा असतो. संक्रांतीला मात्र दोन्ही समान असतात.
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला” हा एक भावनिक विचार न राहता,  हा एक राष्ट्रीय संदेश होण्याची गरज आहे. आज संसारात, प्रपंचात, समाजात, सार्वजनिक जीवनात, त्याच बरोबर राजकीय क्षेत्रात संघर्ष, वादविवाद, नैराश्य, हेवेदावे, हे अटळ झाले आहेत. वाढत्या भोगवादी विचारसरणी मुळे संस्कृतीला, संस्काराला व आदरातिथ्याला तिलांजली दिली जात आहे. सार्वजनिक जीवनात सततच्या संघर्षामुळे मानवाचं शरीर आरोग्याचं मंदिर होण्याऐवजी रोगाचं माहेरघर होत चाललंय. झालं गेलं विसरुन जा व परत तिळगुळ खाऊ घालून गोड गोड बोला. असा सौजन्याचा सलोख्याचा संदेश आम्हाला तिळगुळाचा गोडवा देतो.
“तिळाची माया गुळाची गोडी। परमेश्वरा सुखी ठेव सर्वांची जोडी”.
संघर्षातून पार पडलेलं कोणतही कार्य शेवट पर्यंत कटूता निर्माण करतं. गोडीगुलाबीने, हसतखेळत पार पाडलेलं खडतर कार्य सुद्धा शेवट पर्यंत आनंद आणि समाधान देऊन जातं.
जीवनात दानाला अनन्य साधारण महत्व आहे. सुवासिनी काळ्या आईच्या ओटीतून प्राप्त झालेला, सुगड्यातील हरभरा,टहाळं, ओंबी, बोरं, कणिस, उसाचं कांडं, हा रानमेवा एकमेकींना दान देतात.
काळा रंग एरव्ही धार्मिक कार्यांत वर्ज्य केला जातो. तसं पाहीलं तर काळ्या रंगाला आमच्या जीवनात आनन्य साधारण महत्व आहे. काळी जमीन, काळे केस, काळा बुक्का, काळी पोत, काळा बुट, मंगळसुत्रातले काळे मणी, आणि सर्वांचा जीव की प्राण असलेला पंढरीचा काळा विठोबा. बाळाला सुद्धा नजर लागु नये म्हणून काळी तीट लावतात.
पहिल्या संक्रांतीला नववधूला काळी साडी, हलव्याचे दागिने, काळ्या केसांत शुभ्र फुलांच्या गजऱ्याने तिला नटवलं जातं.
“ते हे ईश कृपे घडोनी सदनी मांगल्य सांसारिक। लाभोनी पतीचे सुख हरी कृपे। तू पुत्रवतीभव।। म्हणून कुंकू लावलं जातं.
स्त्रीला पत्नी पद आणि मातृपद निसर्गाने दिले. यातील भावना ती जोपासते. पावित्र्य, एकनिष्ठता, त्याग या तीन गुणांनी सौंदर्याला सद्गुणांची जोड लाभते.
संस्कार, संस्कृती व सौंदर्य याचं दर्शन घडवणारा पवित्र कार्यक्रम म्हणजे “हळदीकुंकू”. गृहिणी पूजन, आदरसत्कार, स्नेह मिलन याच बरोबर सामाजिक एक्याचं हे एक प्रतीक आहे.
जरीकाठाची साडी, भरजरी पदर, पदरावरचा मोर, वेलबुट्टी,त्याचप्रमाणे काशिदा, जाईजुई, कुंदा, मोगर्‍याची वेणी, पैंजण, मेखला, इ. दागीने यांनी सौंदर्य खुलते. हिरवी साडी, हिरवी चोळी, हिरव्या बागंड्या, मेहंदी याने आल्हाददायक वाटून नवचैतन्य निर्माण करते.
प्रेम, सौभाग्य, मागंल्याने नटलेल्या या मंगळसुत्रात सौभाग्याला दृष्ट लागू नये म्हणून काळ्या मण्यांची पोत असते.
ज्ञान, किर्ती, धनसंपदा, प्रेम, प्रतिभा, पावित्र्य, निष्ठा, त्याग, समर्पण तुझं सौंदर्य खुलवते.
लाल लाल मेहंदी आणि शकुनाचा लाल रंग शक्तिशाली असल्याची जाणीव करुन देतो. सर्वांचे अपराध पदरात सामावून घेण्याची ताकद असते,”थांब लक्ष्मी कुंकू लावते.”
ॐ देहि सौभाग्य आरोग्यं देहि में परमं सुखम्। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि।।
ही सदिच्छा मनी बाळगत एकमेकींच्या अखंड सौभाग्याचं चिंतन करतात.
इंद्राची इंद्रायणी, विष्णुची लक्ष्मी, शिवाची पार्वती त्या प्रमाणे आपल्या पतीस प्रिय हो. अत्रिची अनसुया, वशिष्ठांची अरुंधती, कौशीकांची सती यांच्या सारखं तुझं पातिव्रत्य बहरत राहो. पती आणि संतती यांच्या सह आनंदाने जीवन व्यतीत करत, तुझा सदैव उत्कर्ष होवो. तुझ्या आनंद, सुख, शांती संसाराची ईश्वरचरणी प्रार्थना करते. “सौभाग्यवती भव” आशीर्वाद देत “लक्ष्मी तुला कुंकू लावते.
पुरुष हा विवेक, तर स्त्री ही स्नेह असते. स्त्रीचे हृदय कोमल असून ती समर्पण करते व पुरुषांची क्रियाशक्ती वाढवते. एकमेकांना दूषणे नको,  संततीवर संस्कार,   गुणदोषांसकट स्विकार,  मनाची शुद्धता,  कुटूंब संस्थेची जोपासना याने संसार खुलतो. नियम बंधनाने जीवन सुखावते.
“थांब लक्ष्मी कुंकू लावते.”

                          – अनंत भ. कुलकर्णी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.