नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे दोन दिवशीय महायोगोत्सव हे संमेलन नागपूर येथे रेशीमबाग हेगडेवार स्मृती स्थळावर झाले. यात नाशिक जिल्ह्य़ातून असंख्य योगशिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी या संमेलनातील विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला.
प्रात्यक्षिके, संशोधनपर निबंध वाचन, योगानुभव असलेली तज्ज्ञांची व्याख्याने, अशा रेलचेल असलेल्या कार्यक्रमाने हे संमेलन झाले. सुरुवातीला यात डॉ. तस्मिना शेख आणि सुनिता जांभुळकर गटाने योगसंघाचे गीत सादरीकरण केले. रामभाऊ खांडवे गुरुजी, डॉ. मधुसूदन पेन्ना आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, लता होलगरे, राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष विनायक बारापात्रे, राज्य महासचिव अमित मिश्रा, छगन ढोबळे, पुरुषोत्तम थोटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी योगाचार्य डॉ. विश्वास जीभकाठे गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला.
राज्य ग्रामीण प्रकोष्ठ डॉ. तस्मिना शेख यांनी सांगितले की, जिल्हाध्यक्ष, तसेच जमलेल्या सर्व योगशिक्षकांनी तळागाळापर्यंत योग पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागात जाऊन तेथील प्रत्येक योगशिक्षकांना जागृत करावे व तालुकाध्यक्ष आणि कार्यकारणी बनवणे आवश्यक आहे.
योगानुभूती स्मरणिकेचे विमोचन झाले. शासनाला दिले जाणारे बारासूत्री मागण्यांचे निवेदन सभागृहात वाचून दाखवण्यात आले. माजी संमेलन अध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सायंकाळी संगीत रजनी कार्यक्रमाने साधकांना मंत्रमुग्ध केले. यात सर्कल योगानृत्य, योगनृत्य, रिदम योगानृत्य अशा कार्यक्रमांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. समारोप कार्यक्रमात योगासन स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या राहुल येवला यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली. योगशिक्षक संघ संचालक रामजी हरकरे, रमेश चोपडे हे उपस्थित होते.