नाशिक : प्रतिनिधी
महात्मा गांधीजी हे आधुनिकीकरणाची कास धरणारे होते. म्हणूनच ते जर आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि संगणकाच्या युगात असते तर कदाचित त्यांनी स्मार्टफोनसारख्या साधनांचा वापरही केला असता. महात्मा गांधीजी हे वैज्ञानिक प्रगती आणि आधुनिकीकरणाच्या विरोधात नव्हते, मात्र आवश्यक असेल तिथेच या साधनांचा वापर केला पाहिजे. त्याच्या आहारी जाऊन नाही या मताचे ते होते. गांधीजींनी सांगितलेली जीवनशैली सामान्य माणसांना अंगिकारता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता आणि समाधान अनुभवता येईल, असा सूर गांधीवादी जीवनशैली संवादात उमटला.
ज्येष्ठ्य सर्वोदयी नलिनी नावरेकर, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. हेमचंद्र वैद्य, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित त्यात सहभागी झाले होते. महात्मा गांधी जयंती निमित्त येथील वैराज हॉलमध्ये सर्वाेदय परिवार आणि सोर परिवार यांनी या संवादाचे आयोजन केले होते. यावेळी लेखक-पत्रकार पंकज जोशी यांनी मान्यवरांशी गांधी जीवनशैलीविषयक विविध मुद्यांवर संवाद साधला.
नलिनी नावरेकर यांनी आपल्या गरजा कमीत कमी ठेवून रोजच्या जीवनात गांधीजींनी सांगितलेल्या एकादश व्रतांचा अंगीकार करणे सहज शक्य असल्याचे अनुभव कथन केले. गांधीजींनी सांगितलेली अहिंसा ही दुबळ्यांची नव्हे, तर निर्भयांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुकुंद दीक्षित यांनी निर्भिडता आणि सामाजिक आंदोलन या मुद्यावर बोलताना ज्याच्या विरोधात आंदोलन करायचे आहे, ती व्यक्ती आपली शत्रू नाही या दृष्टीकोनातून शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने निर्भिड होऊन आंदोलन केले, नक्कीच त्याला यश येते, याबद्दल अनुभव कथन केले.
मनुष्याने आपल्यातील हाव कमी करून प्रत्येकाशी प्रेम आणि सौदार्हाची भावना जागवली, तर जाती-धर्माची भांडणे आणि तेढ नष्ट करता येतील असा विचार डॉ. हेमचंद्र वैदय यांनी मांडला.
—