भारतातील दोन महान संत, स्वामी श्री युक्तेश्वर गिरी व श्री श्री परमहंस योगानंद यांचे महासमाधी दिवस

0

भारतातील दोन महान संतांच्या महासमाधीचे वर्धापनदिन दरवर्षी मार्च महिन्यात साजरे केले जातात. ‘द होली सायन्स’ या कालातीत अभिजात पुस्तकाचे लेखक, स्वामी श्री युक्तेश्वर गिरी, यांनी 9 मार्च 1936 रोजी, पुरी, ओडीशा येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला. तर त्यांचे जागतिक कीर्तीचे शिष्य, श्री श्री परमहंस योगानंद यांनी 7 मार्च, 1952 रोजी बिल्टमोर हॉटेल, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे महासमाधीत प्रवेश केला. योगानंदजींनी मुकुंद, नावाच्या तरुण मुलाच्या रुपात, स्वामी श्री युक्तेश्वरजींच्या देखरेखीमध्ये आणि संरक्षक मार्गदर्शनात शिक्षण प्राप्त केले. बंगालमधील सेरामपूर येथील आश्रमात स्वामी श्री युक्तेश्वरजींनी दिलेल्या कठोर परंतु प्रेमळ प्रशिक्षणामुळे या उत्सुक तरुण विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे एका अतुलनीय गुरुमध्ये परिवर्तन झाले. योगानंदजीचा पश्चिमेला झालेला प्रवास आणि योग ध्यानाविषयी दिलेली आद्यप्रवर्तक व्याख्याने, ज्यामुळे परिणामत: संपूर्ण जगभरात आध्यात्मिक पुनर्जागरणाच्या लहरींची सुरुवात झाली, जी आता इतिहासातील बखरीचा एक भाग झाली आहे.
योगानंदजींची महासमाधी (एका संताचे पार्थिव शरीरातून जाणिवपूर्वक निर्गमन) घेतली, तो प्रसंग काही कमी नाट्यमय नव्हता. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथील, तत्कालीन भारतीय राजदूत, डॉ.बिनय रंजन सेन, यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभात ते जोशपूर्ण, चैतन्यमय, घनगंभीर आवाजात मंत्रमुग्ध श्रोत्यांसमोर भाषण करीत होते. “जेथे गंगा, जंगले, हिमालयातील गुहा आणि माणसे
ईश्वराचे स्वप्न पाहतात – अशा मातीचा स्पर्श माझ्या शरीराला  लाभला; मी धन्य झालो आहे.” “माय इंडिया” या त्यांच्या उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी कवितेतील वरील शब्दांसह योगानंदजींनी देहत्याग केला. त्यांच्या निर्जीव शरीराला लगेचच त्यांच्या शिष्यांनी घेरून टाकले, त्यांमध्ये दया माताजीही होत्या, ज्या कालांतराने सेल्फ रिअलाइझेशन फेलोशिप/ योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या (एसआरएफ/वायएसएस) तिसऱ्या अध्यक्षा बनल्या.
फॉरेस्ट लॉन मेमोरिअल पार्कचे शवगृह संचालक, श्री हॅरी टी. रोव यांनी भविष्यातील पिढ्यांसाठी खालील ओळी नोंदवल्या: परमहंस योगानंद यांचे शरीर “एका अभूतपूर्व अक्षय्य अवस्थेत” राहिले. योगविद्या आणि ध्यानाद्वारे नैसर्गिक शक्तिंवर आणि काळावर प्रभुत्व मिळविणे शक्य असते, हे या महान गुरूंनी जसे जिवंतपणी दाखवून दिले, तसेच त्यांच्या मरणातूनही मानवजातीसाठी सिद्ध केले.
“क्रिया योग” वैज्ञानिक ध्यानाची प्राचीन पद्धत, ह्या मध्यवर्ती विषयाभोवती योगानंदजींच्या शिकवणी केंद्रित होत्या. जगभरात एस.आर.एफ./वाय.एस.एस.ची क्रिया योगाची “दीक्षा” घेतलेले हजारो साधक, जन्म आणि मृत्यूच्या अन्यथा अपरिहार्य असलेल्या चक्रातून मुक्ती मिळावी म्हणून या प्राचीन तंत्राचा प्रयत्नपूर्वक नियमितपणे सराव करतात. ह्या प्राणायमाच्या तंत्रामध्ये प्राणशक्तीवर नियंत्रण आणि ऊर्जेला बाहेर  पंचेन्द्रीयांकडे निर्देशित करण्याऐवजी, मेरुदंड आणि मेंदू यांच्याकडे आतील दिशेने वळविण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. योगानंदजी म्हणाले, भक्ती, योग्य कृती आणि खऱ्या गुरूचे मार्गदर्शन यांची जेव्हा सांगड घातली जाते, तेव्हा “क्रिया योगाचे” तंत्र अयशस्वी होऊ शकत नाही. जगभरातील सत्यशोधक ह्या एसआरएफ/वायएसएस च्या पाठमालेचा उपयोग करू शकतात, ज्यात “क्रिया योगाचा” आणि ध्यानाच्या प्राथमिक तंत्रांचा सराव कसा करावा याचा, तसेच “कसे जगावे” या तत्त्वांचा तपशील दिला आहे.

योगानंदजींच्या “योगीकथामृत” या जगप्रसिद्ध आत्मचरित्राची 75 वी जयंती यावर्षी साजरी केली जात आहे. जसे, या प्रेरणादायी पुस्तकाच्या शेवटच्या ओळींमध्ये योगानंदजींनी लिहिले आहे, “ईश्वराने या संन्याशाला एक मोठे कुटुंब दिले आहे!” नि:संशय, गेल्या काही दशकांमध्ये योगानंदजींच्या अनुयायांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यांच्या पवित्र शिकवणुकींचे पालन केल्याने साधकांच्या जीवनात खरोखरच उन्नत दिशेने परिवर्तन घडून आले आहे.
स्वामी श्री युक्तेश्वर गिरी, ज्यांनी योगानंदजींच्या आयुष्यातील आध्यात्मिक पाया सुदृढ केला. प्रेमाचा अवतार किंवा “प्रेमावतार” असे संबोधले जाणाऱ्या त्यांच्या प्रिय आणि अग्रगण्य शिष्याने जो वारसा मागे सोडला आहे, त्याचा श्री युक्तेश्वरांना खरोखर अभिमान वाटत असणार.
 “बाकी सर्व काही थांबू शकते, पण तुमचा ईश्वरासाठीचा शोध थांबू शकत नाही!” या शब्दांद्वारे योगानंदजींनी जगाला स्पष्ट हाक दिली की, त्यांच्या जीवनाचा अंतिम उद्देश पूर्ण करण्याकरिता “कामाला लागा आणि त्यांच्या जीवनरुपी उद्यानातील तण काढून टाका.”   अधिक माहिती: yssofindia.org

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.