हजारो वर्षांपासून भारताची पवित्र भूमी अनेक महान दैवी व्यक्तींच्या पदचिन्हांद्वारे धन्य झाली आहे. श्री श्री स्वामी श्री युक्तेश्वर गिरी, ज्यांचा महासमाधी दिवस 9 मार्च रोजी आहे आणि श्री श्री परमहंस योगानंद, ज्यांचा महासमाधी दिवस 7 मार्च रोजी आहे; या दोघांना त्याच कोटीतले संत म्हणून सर्वत्र ओळखले जाते. त्यांच्या प्रेरणादायी जीवनाने असंख्य साधकांच्या सामूहिक चेतनेमध्ये प्रेम आणि विवेक प्रसारित झाला आहे. त्यामुळे ईश्वराशी एकरूप होण्याच्या अंतिम ध्येयाप्रत त्वरित उत्क्रांत होण्यास अनेक साधक सक्षम झाले आहेत.
योगानंदजी स्वामी श्री युक्तेश्वरजी गिरी यांना प्रथम बनारस येथे भेटले. हा प्रथमदर्शी योगायोग वाटतो, परंतु ती भेट स्पष्टपणे दैवी योजनेनुसार घडलेली होती. त्यावेळेस तो मुकुंद लाल घोष नावाचा एक तरुण मुलगा होता, परंतु प्रेमळ मार्गदर्शनाने त्याला व्यापून टाकणारे कोणी सद्गुरू त्याच्या जीवनात यावेत, असा ध्यास त्याला आधीपासूनच लागलेला होता. बनारस येथील श्री युक्तेश्वरजींच्या आई-वडिलांच्या घराच्या गच्चीवर एका आल्हाददायक संध्याकाळी झालेली पहिली भेट, तत्क्षणी आनंददायी असली तरी अनिर्णायकच ठरली. योगानंदांनी त्या भेटीचे आणि त्या दोघांच्या एकत्रित सहवासातील वर्षांचे वर्णन, त्यांच्या “योगी कथामृत” या सुप्रसिद्ध पुस्तकात केले आहे.
परंतु, पुढील काही वर्षांमध्ये, स्वामी श्री युक्तेश्वरजींच्या कोलकाता जवळील सेरामपूर येथील आश्रमात, त्या महान गुरूंनी कठोर शिस्तीने पण अंतरीच्या वात्सल्याने या अननुभवी संन्याशाला प्रशिक्षण दिले, ज्यामुळे योगानंदजीना पुढच्या काळात जागतिक स्तरावर गुरू म्हणून मान्यता प्राप्त झाली. सुरुवातीच्या वर्षांमध्ये लाभलेल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योगानंदजींचे व्यक्तिमत्त्व आणि अंतस्थ गुण असे घडवले गेले की, ते जागतिक स्तरावर क्रिया योगाच्या विज्ञानाचे समर्थक बनले आणि त्यांनी क्रियायोगाचा एक अतुलनीय आध्यात्मिक वारसा तयार केला.
श्री लाहिरी महाशय आणि अलौकिक महावतार बाबाजी यांनी योगानंदजीच्या दूरदर्शी गुरूंना असे मार्गदर्शन केले होते की, त्यांनी या तरुण भिक्षूला सातासमुद्रापलीकडे जाण्यासाठी आणि पाश्चिमात्य जगात क्रियायोगाचे ज्ञान पसरविणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे झळकत राहण्यासाठी तयार करावे. योगानंदजींनी त्यांच्या गुरूंनी सोपविलेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. योगानंदजींनी स्थापन केलेल्या सेल्फ-रिअलाईझेशन फेलोशिप (एसआरएफ) आणि योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस) या आध्यात्मिक संस्थांनी अनेक दशके, मुमुक्षू सत्य साधकांपर्यंत क्रियायोगाची शिकवण पोहोचविण्याचे कार्य सक्षमपणे केले आहे. योगानंदजींनी विषद केलेल्या ध्यानाच्या वैज्ञानिक तंत्रांचा सराव करण्यासाठी, योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाचे (वायएसएस) घरी अध्ययन करण्याचे पाठ आणि मोबाईल ॲपद्वारे पायरीपायरीने दिलेल्या सूचना भारतातील साधकांसाठी उपलब्ध आहेत.
स्वामी श्री युक्तेश्वरजी आणि योगानंदजी यांच्या रूपाने गुरू आणि शिष्य यांच्यातील आदर्श नात्याची अतिशय उत्कृष्ट अभिव्यक्ती झाली. येणाऱ्या काळात त्यांच्या असंख्य अनुयायांनी धडा गिरवावा, या उद्देशाने हे दोन्ही संत मानव जन्माचे नाटक जगत होते. सामान्य माणसांप्रमाणेच दोघांच्याही जीवनात अडथळे आले. तरीही, त्यांच्या सभोवतालच्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी निवडलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक दृष्टीक्षेप आणि प्रत्येक स्पर्श, त्यांच्या मार्गावर चालणाऱ्या खऱ्या भक्तांसाठी चिरंतन महत्त्वाचा होता.
स्वामी श्री युक्तेश्वर यांनी म्हटल्याप्रमाणे, “जर तुम्ही आज काही आध्यात्मिक प्रयत्न केलात, तर उद्या सर्व काही सुधारेल!” आणि त्यांच्या महान गुरूंचा सच्चा चेला म्हणून, योगानंदजींनी त्यांच्या गुरूंच्या ओठातून बाहेर पडलेले प्रत्येक वचन आत्मसात करण्यासाठी आणि अमलात आणण्यासाठी अतुलनीय प्रयत्न केले.
त्यांच्या अनुकरणीय जीवनशैलीच्या शक्तिशाली आध्यात्मिक प्रभावामुळे आणि या पृथ्वीवरील त्यांच्या धन्य वास्तव्याच्या निखळ आभेमुळे, स्वामी श्री युक्तेश्वरजी आणि योगानंदजी यांनी लाखो अनुयायांच्या हृदयात अखंडपणे स्थान मिळवले आहे. आणि योगानंदजींनी अगदी समर्पकपणे आणि अत्यंत उस्फूर्तपणे घोषित केले की, “या संन्याशाला ईश्वराने खूप मोठे कुटुंब दिले आहे!” अधिक माहितीसाठी संपर्क: yssofindia.org
लेखक – विवेक आत्रेय
—