म्हसरूळ, (वा.)
कथेतून अंतरंग उमगते. समाज परिवर्तनाचे एक माध्यम म्हणजे कथाकथन. अध्यापन पद्धतीत दृश्य स्वरूपात कथाकथन पद्धती वापरली तर प्रभावी अध्यापन होते. त्याचा दीर्घकाळासाठी परिणाम होतो, असे प्रतिपादन गणेश गोविलकर यांनी केले.
`प्रभावी कथाकथन कसे करावेʼ या विषयावर कार्यशाळा झाली. तेव्हा ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
गोविलकर म्हणाले की, कथांचे विविध प्रकार आहेत. कथाकथन मंत्र यात समर्पण, पराक्रम, सेवा, संघटन, संपर्क, मनोरंजन, संस्कार ज्ञान, बोध हे घटक महत्वपूर्ण आहेत. कथाकथन करताना सराव महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच आत्मविश्वास असावा. कथेची निवड, वक्तृत्व, शब्दसंपदा, भाषाशैली, तन्मयता, अभिनय, चित्रमयता, बहुश्रुतता, श्रोत्यांचा सहभाग, वेळेचे भान, आवाजातील चढ-उतार या गोष्टींचा अंतर्भाव असावा. आपल्याकडे कथासंग्रह देखील असावा. स्वतः कथालेखन करावे. कथेचे तंत्र लक्षात घेताना कथेचे रहस्य उकल, घटना, समस्या, प्रेम, संघर्ष, त्याग, युक्ती या घटकांचा विचार करावा.
कथा सांगताना कथेचे चिंतन आपण करावे. उच्चार स्पष्टतेबरोबरच शब्दरचना, शब्दांची सांगड, समय सूचकता, प्रसंग, घटना यानुसार म्हणी, सुभाषित, सुविचार यांचा अंतर्भाव करण्याचे कौशल्य असावे. उत्तम वाणी असणार्या लोकांचे बोलणे ऐकावे. त्यांच्या सहवासात राहावे. वाचनाचे महत्त्व विशद करत जर आपण रोज रामरक्षा म्हटली तर आपले उच्चार व वाणी उत्तम होते, असेही गोविलकर यांनी सांगितले.
प्राथमिक विद्यामंदिरच्या शालेय समितीचे अध्यक्ष शशांक ईखणकर याप्रसंगी उपस्थित होते. आठवले-जोशी शाळेच्या सीमा कुलकर्णी यांनी `सुंदर हात’ ही कथा सादर केली. प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मनीषा गुंजाळ यांनी श्यामची आई पुस्तकातील `मुकी फुलेʼ या कथेचे सादरीकरण केले. कार्यशाळेस संस्थेतील शाळांचे शिक्षक उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष उदय शेवतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्ग घेण्यात आला.
आठवले जोशी बालविकास मंदिर मेरी शाळेच्या मुख्याध्यापिका दर्शना मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका भारती ठाकरे यांनी मार्गदर्शक व अध्यक्ष यांचा परिचय करून दिला. शर्मिला डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले.भयाळे येथील लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक गोविंद यांनी आभार मानले.
—