नाशिक, (वा.)
सिडकोतील अश्विननगर येथील `यूडब्ल्यूसीईसीʼमध्ये चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक शिकवला. देशभरात बाल शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने देशभरातील पालकांमध्ये चिंता वाढली आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या बालवाडीतील मुलांना ग्रूम शूम सत्रादरम्यान ही माहिती देण्यात आली.
या सत्रात त्यांना विविध प्रकारच्या स्पर्शांबद्दल समजावून सांगण्यात आले. अवांछित स्पर्श कोणत्याही स्वरूपात दिसू शकतो. `नाहीʼ म्हणणे आणि ज्याचा स्पर्श आपल्याला अस्वस्थ करतो, अशा व्यक्तीला थांबवणे पूर्णपणे ठीक आहे. ओरडणे, खंबीर राहणे आणि त्यांना त्रास देणार्या व्यक्तीला थांबवणे तसेच त्या व्यक्तीपासून पळून जाणे ही तीन पावले ते उचलू शकतात, असेही त्यांना सांगण्यात आले.
मुलांना त्यांच्या सेफ सर्कलबद्दल जागरुक करून देण्यात आले आणि कोणत्याही नको असलेल्या घटनेची माहिती सेफ सर्कलच्या सदस्यांना दिलीच पाहिजे, असे समजावून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या मुलांशी घट्ट बंध निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जेणेकरून मुलांना कोणताही विचार न करता सर्व चांगले-वाईट अनुभव त्यांच्यासोबत शेअर करण्यास सोयीस्कर वाटेल. `यूडब्ल्यूसीईसीʼमध्ये विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम ऑनलाइन कार्यशाळेच्या मदतीने राबवण्यात आला. शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या सहयोगाने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
—