“स्वयं प्रयत्नाने दैवी मिलन शक्य आहे, आणि ते एखाद्या धार्मिक विश्वासावर किंवा वैश्विक हुकुमशहाच्या मनमानी इच्छेवर अवलंबून नाही.” योगावतार श्री श्री लाहिरी महाशयांनी प्रगल्भ शब्दांत दिलेले हे आश्वासन, वरील आदर्शासाठी समर्पित केलेल्या त्यांच्या जीवनाची जिवंत साक्ष होती. हा केवळ तात्त्विक निष्कर्ष नव्हता.
श्यामाचरण लाहिरी यांचा जन्म 1828 मध्ये सप्टेंबर 30 रोजी झाला. ते एका उत्कट शिवभक्ताचे पुत्र होते, ज्याला धर्मग्रंथांमध्ये “योग्यांचा राजा” असे आदराने संबोधले जाते. बालपणी लाहिरी महाशयांना हिंदी, उर्दू, संस्कृत, बंगाली, फ्रेंच आणि इंग्रजी भाषांचे धडे मिळाले. त्यांनी वेदांचाही बारकाईने अभ्यास केला आणि विद्वान पंडितांचे धर्मग्रंथांवरील वादविवाद उत्सुकतेने ऐकले.
परंपरेला अनुसरून, तो दयाळू, सौम्य, धैर्यशील, आणि सर्व साथीदारांना प्रिय असलेला तरुण, 1846 मध्ये श्रीमती काशिमणी यांच्याबरोबर पवित्र विवाहबंधनात बद्ध झाला आणि त्याने वैदिक नियमांनुसार गृहस्थाश्रमाचे पालन केले. त्यांच्या मिलनाला चार मुलांचा आशीर्वाद लाभला. वयाच्या 23व्या वर्षी 1851 साली, त्यांची ब्रिटीश सरकारच्या लष्करी अभियांत्रिकी विभागात लेखापाल म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा, त्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये व्यापलेले होते. ज्यामुळे त्यांचे निगर्वी जीवन केवळ ईश्वराच्याच नजरेत नव्हे तर कार्यालयीन कर्मचारी असतानाही विनयशील वागण्याचा एक उत्कृष्ट नमुना बनले.
1861च्या शरद ऋतूत त्यांच्या वयाच्या 33व्या वर्षी, एका महत्वपूर्ण घटनेने लाहिरी महाशयांच्या आतापर्यंच्या ‘सामान्य’ जीवनाचा ओघच बदलून टाकला. या घटनेने मानवतेच्या आध्यात्मिक अक्षात फार मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला. लाहिरी महाशयांची हिमालयाच्या पायथ्याशी राणीखेत येथे बदली झाली. एके दिवशी दुपारी द्रोणागिरी पर्वतावर चढत असताना, अगदी रहस्यमय पद्धतीने त्यांची हिमालयातील अमर योगी, महावतार बाबाजी यांच्याशी भेट झाली. त्या आश्चर्यचकित झालेल्या तरुणाला, गुरुजींनी एक गुप्त गोष्ट सांगितली की, त्यांनीच त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाहिरी महाशयांची राणीखेत येथे बदली करण्याची सूचना केली होती. “जेव्हा एखाद्याला मानवजातीशी एकरूपता जाणवते, तेव्हा सर्व मने प्रसारकेंद्रे बनतात, ज्यांद्वारे तो स्वेछेने कार्य करू शकतो.”
त्यांच्या भूतकाळातील काही अगम्य तपशील उघड केल्यानंतर, बाबाजींनी त्या गोंधळलेल्या तरुणाला क्रियायोगाच्या हरवलेल्या प्राचीन विज्ञानाची दीक्षा दिली. या अद्भुत घटनेचे तपशीलवार वर्णन श्री श्री परमहंस योगानंदजींचे सर्वाधिक खप असलेले अभिजात आध्यात्मिक पुस्तक “योगी कथामृत,” यामध्ये ‘हिमालयात प्रासाद निर्माण’ या प्रकरणात केले आहे. योगानंदजींचे आई-वडील लाहिरी महाशयांचे शिष्य होते आणि त्यांना स्वत:ला तान्ह्या वयातच गुरुजींचा आशीर्वाद लाभला होता. काही वर्षानंतर, साधारण एका शतकापूर्वी योगानंदजींनी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस) आणि सेल्फ रीअलाइझेशन फेलोशिप (एसआरएफ) या संस्थांची स्थापना करून क्रियायोगाच्या पवित्र विज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य हाती घेतले.
तरुण लाहिरी महाशय, सद्गुरूंच्या चरणी अखंडितपणे सतत सात दिवस निर्विकल्प समाधीच्या परमानंदात राहिले. आठव्या दिवशी त्यांनी बाबाजींना विनंती केली की, त्या निर्जन पर्वतांमध्ये त्यांना नेहमी त्यांच्यासोबत राहू द्यावे. परंतु त्यांच्या दयाळू गुरुजींनी त्यांच्यासाठी उदात्त योजना आखल्या होत्या. “तुझे जीवन शहरातील गर्दीतच जाणार आहे. आदर्श योगी गृहस्थ असण्याचे उदाहरण म्हणून तुला काम करायचे आहे….असंख्य मुमुक्षू साधकांना क्रियायोगाद्वारे आध्यात्मिक सांत्वन देण्यासाठी तुला निवडण्यात आले आहे….तुझ्या संतुलित जीवनातून त्यांना समजेल की, मुक्ती ही भौतिक परित्यागापेक्षा आंतरिक विरक्तिवर अवलंबून आहे.”
अशाप्रकारे, लाहिरी महाशयांचे सुसंवादी संतुलित जीवन बहुसंख्य लोकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना क्रियायोग दीक्षेची भेट दिली. त्यांच्या काळातील कठोर जातीय कट्टरतेवर मात करण्यासाठी देखील त्यांनी अथक प्रयत्न केले.
योगावतार त्यांच्या शिष्यांना नेहमी या शब्दांत प्रोत्साहन देत असत, “बनत बनत बन जाय”….“प्रयत्न करता करता एक दिवस दैवी ध्येय साध्य होईल.”
अधिक माहिती : yssofindia.org
– लेखिका : संध्या एस. नायर.