म्हसरूळ : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने येथील प्रभाग क्रमांक २ मधील विविध क्षेत्रामधील कर्तृत्ववान महिलांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका परमपूज्य राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी, विद्या काटकर, प्रतिभा तायडे, ऊर्मिला ठाकूर या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्रविण जाधव व पूनम जाधव यांच्याद्वारे करण्यात आले होते.
यावेळी प्रभागातील लहान मुली तसेच युवतींनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यासारख्या विविध थोर व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. अनेक युवतींनी रोप मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजी, पोवाडे, भारुड व इतर अनेक कलागुणांचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी शेकडो महिलांनी उपस्थिती नोंदविली. यावेळी उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढून भाग्यवान महिलांना प्रभागातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
—