नाशिक : प्रतिनिधी ज्येष्ठ्य कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले, असे प्रतिपादन अशोका शिक्षणशास्र महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा. स्मिता बोराडे यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथांची भेट अशोका शिक्षणशास्र महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा. स्मिता बोराडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयास विविध प्रकारचे मराठी व इंग्रजी ग्रंथ विद्यार्थ्यांना वाचनासाठी भेट म्हणून ग्रंथपाल संदीप बस्ते यांच्याकडे दिली. यावेळी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध उपक्रमांचे आयोजन अशोका महाविद्यालयातील विदयार्थी विकास मंडळातर्फे विद्यार्थी व शिक्षकांसाठी फेब्रुवारीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी परिपाठच्या वेळी मराठी दिनाची माहिती, मराठी दिन का साजरा केला जातो, मराठी कवी, लेखक यांची माहिती, मराठी काव्यवाचन, मराठी भाषेतील पुरस्कार व विजेते यांची माहिती दिली. त्याचबरोबर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मराठी संदर्भ साहित्य लिंक पाठवली. परिपाठ व प्रार्थना प्रमुख प्रा. मंजुषा भोर व प्रा. अर्शद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अशा अनेक प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मातृभाषेचा गौरव
मराठी राजभाषा दिनानिमित्त बहिणाबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता पगारे यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. त्यांनी मराठी-राजभाषा दिनाचे महत्व व कुसुमाग्रज यांची माहिती सांगितली. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हे त्यांनी सांगितले.
यांचे मार्गदर्शन
या सर्व उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. विशाखा कमोद यांनी केले होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, संचालक डी. एम. गुजराथी, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष रुकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा. स्मिता बोराडे व डॉ. रेखा पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
—