नाशिक : प्रतिनिधी
आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे. मात्र, ते गुप्त ठेवण्याचा आग्रह काही कारणांमुळे पूर्वीच्या काळात होता. साहजिकच त्यामुळे हि दिव्य चिकित्सा सर्वसामान्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचली नाही. आता यातील चिकित्सकांनी आपल्या कामात पारंगत व्हायला हवे, आयुर्वेदावर पूर्ण श्रध्दा ठेवून काम करायला हवे, त्यामुळे आयुर्वेदासह निसर्गोपचार व योगशास्त्र, तसेच इतर चिकित्सापद्धती प्रभावीरीत्या माणसामाणसांपर्यंत पोहचवता येतील. सोबतच आधुनिकता व वेगळेपणाची कास धरावी, असे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डाॅ. योगेश सदगीर यांनी व्यक्त केले.
आयुर्वेदाचार्य डाॅ. योगेश सदगीर.
निसर्ग विद्या निकेतनच्या कृतिशील टिमला पंचकर्म या विषयावर मार्गदर्शन करताना डाॅ. सदगीर बोलत होते. याप्रसंगी योगशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. राज सिन्नरकर, पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा डाॅ. तस्मिना शेख, सचिव सुनिता पाटील, रणजित पाटील, प्रा. तुषार विसपुते, प्रा. पुरुषोत्तम सावंत, प्रा. चैतन्य कुलकर्णी, उल्हास कुलकर्णी, अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ. शुभांगी रत्नपारखी, जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे, तालुकाध्यक्ष जीवराम गावले, पंकज पटेल आदी उपस्थित होते. याप्रसंगी डाॅ. सदगीर यांनी पंचकर्माविषयी सखोल मार्गदर्शन केले.
ग्रंथभेट देताना.
प्रा. सिन्नरकर म्हणाले की, आयुर्वेदात मनुष्याच्या जीवनाचा अतिशय सूक्ष्म विचार केला गेला आहे. मात्र, ब्रिटीश राजवटीत ही चिकित्सापद्धती मागे पडली. आता या चिकित्सेविषयी आस्था असलेले लोक उठून उभे राहिले आहेत. आयुर्वेदासह योग, चुंबकीय चिकित्सा, रंग चिकित्सा, उपवास चिकित्सा, माती उपचार आदींमध्ये अनेक जण काम करणार आहेत. त्यासाठी या उपचार पद्धतींबद्दल माहीती असणारे चिकित्सक तयार करू. जेणेकरून ते तालुक्यातालुक्यात जाऊन सर्व मानव समूहांमध्ये या उपचार पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण करतील. पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत निसर्ग विद्या निकेतन व अभिलाषा निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून हे काम हाती घेतले जाईल. यातून स्वामी विवेकानंद यांचे `रूग्णसेवा हीच ईश्वरसेवाʼ हे वचन आपल्याला जगता व जागवता येईल.