नाशिक : प्रतिनिधी
येथील श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्गोपचार हॉस्पिटल आणि `निसर्ग विद्या निकेतनʼ यांच्या संयुक्त विद्यामाने तळेगाव (अंजनेरी ) येथे मोफत निसर्गोपचार तपासणी, प्राकृतिक चिकित्सा उपचार व मार्गदर्शन शिबीर झाले. त्याला ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. दीडशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी प्रथमच या उपचारपद्धतीचा अनुभव घेतला. याप्रसंगी सरपंच मंगला निंबेकर व सहकारी उपस्थित होते.
यांची उपस्थिती
मारुती मंदिर सभा मंडपात हे शिबीर झाले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष प्रा. तस्मिना शेख, उपाध्यक्ष रणजित पाटील, सचिव सुनिता पाटील, योगतज्ज्ञ प्रा. राज सिन्नरकर, `अभायोमʼचे जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे, प्रा.जगदीश मोहुर्ले, प्रा.चैतन्य कुलकर्णी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. त्यांच्यावर उपचार केले व निसर्गोपचारातंर्गत ॲक्युप्रेशर, आहार,उपवास, त्राटक, नेत्रशुध्दीची योगचिकित्सा करून घेण्यात आली. शिबिरात जलनेती पात्र, नेत्र धौतीपात्र, ॲक्युप्रेशर फिंगर रिंग आदींचे निशुल्क वाटप करण्यात आले.
निसर्गनियमांच्या पालनाने रोगमुक्त
योगतज्ज्ञ प्रा.सिन्नरकर यांनी याप्रसंगी प्राकृतिक चिकित्सेचे विज्ञान ग्रामस्थांना सांगितले. औषधांशिवाय निसर्गनियमांचे पालन करून आपण पूर्णपणे रोगमुक्त होऊ शकतो, ही विश्वासप्रणाली आपल्याला जीवनात रुजवावी लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. अगदी आवश्यक असेल तेव्हा आयुर्वेद व होमिओपॅथी आपल्या मदतीला आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोरोना हा विषाणू आहे, तेव्हा आपल्या शरीरातील विष पदार्थ हे प्राकृतिक चिकित्सेने बाहेर काढा मग विषाणू आपले काहीच बिघडवू शकत नाही, असे ते म्हणाले. भारतीय मात्रुभूमी ही प्राचीन ऋषींनी दाखविलेल्या रस्त्यावर हळूहळू परतत आहे, हेच महत्वाचे आहे, असे सांगून शिबीराची सांगता झाली.
—