“हे गुरुदेव, तुम्ही मला या विचलित दशेतून बाहेर काढून शांतीच्या स्वर्गात नेले आहे. माझ्या दु:खमय निद्रेचा अंत झाला आहे आणि मी आनंदात जागृत झालो आहे.” -श्री श्री परमहंस योगानंद.
कित्येक लोक ‘गुरू’ या शब्दाचा अर्थ, जो शिकवतो, मार्गदर्शन करतो किंवा आदेश देतो, असा घेतात. तथापि, आध्यात्मिक गुरू हा त्यापेक्षा खूप काही अधिक असतो. ‘गुरू’ या शब्दाचे दोन भाग असतात: ‘गु’ म्हणजे अंधार आणि ‘रू’ म्हणजे दूर सारणे किंवा विखुरणे. अधिक सोप्या शब्दात सांगायचे तर, ‘गुरू’ तो आहे जो आपल्याला आपला आध्यात्मिक अंधारावर मात करण्यास मदत करतो आणि आत्मज्ञानाच्या दिशेने जाण्यास मार्गदर्शन करतो. तोच सद्गुरू असतो, ज्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे आणि जो आपल्याला अंतिम सत्याकडे घेऊन जातो.
जेव्हा आपली खऱ्या ज्ञानाची लालसा आणि ईश्वराशी संलग्न होण्याची इच्छा तीव्र होते, तेव्हा ईश्वर आपल्याला आत्मसाक्षात्काराच्या आव्हानात्मक मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी एक दैवी माध्यम म्हणून गुरू पाठवून प्रतिसाद देतो. असा गुरू ईश्वराने नियुक्त केलेला असतो. तो ईश्वराशी एकरूप असतो आणि ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून बोलण्याची दैवी मान्यता त्याला या पृथ्वीवर आहे. गुरूच मौन असणाऱ्या ईश्वराचा आवाज आहे.
असे गुरू होते श्री श्री परमहंस योगानंदजी, आदरणीय आध्यात्मिक शिक्षक ज्यांनी कालातीत अभिजात आध्यात्मिक पुस्तक, “योगी कथामृत” लिहिले, ज्या पुस्तकामुळे जगभरातील लाखो लोकांमध्ये परिवर्तन झाले. ते या अद्भुत पुस्तकातील पानांमध्ये, त्यांचे दैवी गुरू श्रीयुक्तेश्वरजी यांच्या प्रेमळ परंतु कठोर मार्गदर्शनाखाली त्यांच्या ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करण्याच्या मार्गाविषयी सांगतात.
ते म्हणतात, “गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते हे प्रेम आणि मैत्रीची सर्वात मोठी अभिव्यक्ती आहे. हे एक बिनशर्त दैवी सख्य आहे, जे एकमेव ध्येयावर आधारित आहे: इतर कशाहीपेक्षा ईश्वरावर प्रेम करण्याची अभिलाषा.”
गुरूच आपल्या शिष्याला आध्यात्मिक मार्गावर चालताना, अहंकारावर आधारित सवयींवर मात करून, प्रेम, शांती आणि आनंद विकसित करण्यास शिकवतो. क्रियायोगासारख्या वैज्ञानिक ध्यान तंत्राद्वारे तो साधकांची जाणीव उच्च स्तरावर नेतो आणि अखेरीस त्यांना या जन्मात किंवा पुढील जन्मात ईश्वराकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. गुरू साधकांचा सर्वात चांगला मित्र आणि हितचिंतक असतो आणि त्यांच्यावर बिनशर्त प्रेम करतो, मग ते खालच्या मानसिक स्तरावर असोत किंवा ज्ञानाच्या सर्वोच्च पातळीवर असोत. अशा गुरुप्रती आपण प्रेम, भक्ती आणि निष्ठेचे देणे लागतो आणि या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी त्यांच्या पायी शरणागत होतो.
योगानंदजींनी 1917 साली रांची येथे योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस)ची आणि 1920 साली लॉस एंजेलिस येथे सेल्फ-रीअलाईझेशन फेलोशिप (एसआरएफ)ची स्थापना, क्रियायोग, आत्मसाक्षात्काराचा एक अत्यंत प्रगत मार्ग, आणि संतुलित जगण्याची कला या त्यांच्या शिकवणींचा प्रसार करण्यासाठी केली. इच्छुक साधक योगदा आश्रमाद्वारे आत्मसाक्षात्काराच्या गृहपाठाच्या धड्यांसाठी अर्ज करू शकतात.
योगानंदजी म्हणतात की, सर्वसामान्य साधक गुरुशिवाय ईश्वराला शोधू शकत नाही. साधकाला 25% गुरूने शिकविलेल्या ध्यानाच्या पद्धतींचा अभ्यास करून प्रयत्न करावे लागतील, 25% प्रयत्न गुरूंचा आशीर्वाद आणि 50% ईश्वराच्या कृपेने हे साध्य होते.
एखादा गुरू जरी त्याच्या शारीरिक स्वरुपात नसला, तरी तो त्याच्या अनुयायांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी तितकीच काळजी घेत असतो. त्याच्या शिकवणीच नंतर गुरू म्हणून कार्य करत राहतील, आणि अनुयायी त्या शिकवणुकीद्वारे त्याच्याशी संपर्कात राहतील. गुरुचे त्याच्या शिष्यांवर नेहमीच लक्ष असेल आणि शिष्यांनी जर सखोल भक्तिभावाने हाक मारली, तर गुरू त्यांच्यासाठी तेथेच असतील. अधिक माहिती: yssi.org
लेखक: रेणू सिंग परमार