गीता जयंती–भगवद्गीतेतील  शिकवणींची उजळणी  करण्याची संधी

0

श्री श्री परमहंस योगानंदांचे ‘ईश्वर अर्जुन संवाद’ हे गीतेवरील भाष्य आपल्याला खोल ज्ञान देते

भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नाही, नुसता धर्मग्रंथही नाही, तर ते खरोखरच जीवनाचे सार आणि सत्याचा संपुटित अर्क आहे. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अत्यंत तन्मयतेने ऐकणाऱ्या योद्ध्या अर्जुनाला दिलेला कालातीत संदेश हा प्रत्येक मानवासाठी अप्रत्यक्ष उपदेश होता आणि आहे.

हे माया-नियंत्रित जग आपल्यावर विविध प्रकारचे प्रसंग, तणाव आणि दबाव यांचा सतत भडिमार करत असते, ज्यांना सामोरे जाणे मनाची आंतरिक लढाई जिंकूनच शक्य असते आणि आध्यात्मिक विकासाच्या कोणत्याही स्तरावरच्या प्रामाणिक साधकाचा मार्ग प्रकाशित करण्याचे काम गीता नेहमीच करते.

प्रख्यात ग्रंथ “योगी कथामृत” (ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी) चे लेखक श्री श्री परमहंस योगानंद, यांनी देखील गीतेवर एक सखोल, अंतर्ज्ञानी भाष्य केले आहे. योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाने (वायएसएस) “गॉड टॉक्स विथ अर्जुन (इंग्रजी)” [ईश्वर अर्जुन संवाद (हिन्दी)] या नावाने ते दोन खंडांमध्ये प्रकाशित केले आहे. या भाष्यात भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा खरा अर्थ काय होता याचे सखोल, तरीही व्यावहारिक वर्णन केलेले आहे. इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रकाशित केलेले हे उत्कृष्ट खंड आकलनक्षम वाचकांना गीतेच्या आंतरिक संदेशाबद्दल सखोल प्रबोधन करतात.

गीतेतील समजण्यास अवघड असा संदेश योगानंदजींनी सामान्य माणसाला यापूर्वी कधीही सांगितला गेला नसेल अशा प्रकारे समजावून सांगितला आहे. गीतेमधील लढाई ही खरे म्हणजे पांडवांनी प्रतिनिधित्व केलेल्या सकारात्मक शक्ती आणि कौरवांनी प्रतिनिधित्व केलेल्या नकारात्मक शक्ती यांच्यात आहे, असा गीतेचा गर्भित अर्थ त्यांनी ठळकपणे निदर्शनास आणला आहे. महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्यातील चांगल्या किंवा वाईट गुणाचे प्रतिनिधित्व करते. उदाहरणार्थ, भीष्म हे ‘अहंकारा’ चे प्रतिनिधित्व करतात. आपण कोणतीही उल्लेखनीय आध्यात्मिक प्रगती करू शकू त्याआधी अहंकाराला पराभूत करणे आवश्यक आहे. आपण आपल्या अनिच्छेला दूर सारून, आपल्या आळशीपणावर मात करून आणि आपल्या आत्म-साक्षात्काराच्या शोधात सतत अडथळा निर्माण करणार्‍या आसक्तीचा त्याग करून; ही न्यायाची लढाई लढलीच पाहिजे.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर योगानंदजी निर्देश करतात त्याप्रमाणे, जोपर्यंत आपल्याला परमेश्वर सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कधीही समाधान लाभणार नाही. आणि त्याचा एकमेव मार्ग म्हणजे योग, ध्यान आणि योग्य कृतीचा मार्ग.

भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने क्रियायोगाच्या विज्ञानाचा दोनदा विशेष करून उल्लेख केला आहे. सर्व सत्यशोधखांना या दुर्मिळ आणि शक्तीशाली विज्ञानाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करता यावा म्हणून योगानंदजींनी आधुनिक युगात ते अत्यंत सर्वसमावेशकपणे जगासमोर आणले आहे. योगानंदजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर क्रियायोगाची साधना योग्य रीतीने केली आणि तिला सखोल भक्तीची जोड असली, तर खऱ्या भक्तांना सर्वोच्च ध्येय गाठता येईल.

भारतीय अध्यात्मिक आचारविचारांचे आकलन करून घेण्यातील योगानंदजींच्या अतुलनीय योगदानाची आणि जगभरातील लाखो साधकांसाठी अंतिम ध्येयाकडे वेगाने प्रगती करण्याचा मार्ग मोकळा करणार्‍या त्यांच्या पथदर्शी शिकवणींची, बरोबरी कशाशीही नाही. योगानंदजींनी ईश्वराचे प्रेम आणि साधेपणा अधिक स्पष्टपणे आणि व्यापकपणे समोर आणला आहे.

योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (1917 पासून भारतात) आणि सेल्फ रिअलाइझेशन फेलोशिप (1920 पासून पश्चिमेत) या योगानंदजींनी स्थापन केलेल्या संस्था, क्रिया योगाचे पवित्र विज्ञान आणि भारतातील अध्यात्मिक शिकवणींचा जगभरात प्रसार करण्यात प्रशंसनीय भूमिका बजावत आहेत.

या वर्षी 3 डिसेंबर रोजी येणारी गीता जयंती, अनेक प्रकारे आपल्या प्रत्येकाला जीवनातील सर्वात महत्त्वाची लढाई जिंकण्यासाठी दृढनिश्चयी प्रयत्न करण्याचे स्मरण करून देण्याचे काम करते आणि अंतिम ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम का करावे लागतात, ते योगानंदजींनी केलेले गीतेवरील भाष्य आपल्याला नेमके दाखवून देते. अधिक माहिती: yssofindia.org

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.