षड्विकार, षड्उर्मी, षड्वैरी या मनाला अशांत ठेवणाऱ्या विकारांना गोदेच्या पात्रात दृढ संकल्पाने विसर्जित करुन, शांत भावनेने त्या शांतीब्रह्माच्या समाधीला केलेला पावनस्पर्श, हीच नाथ षष्ठी.
—
महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळे, त्याला अध्यात्मिक वैभव प्राप्त झालेले आहे.
ज्ञानेशंज्ञानमूर्तिंच साक्षात्प्रेमस्वरुपिणीम् । नामदेवं च दयामूर्तीं नाथं वंदे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तीं देहूक्षेत्रनिवासीणाम् । तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्।।
ज्ञानोबाराय हे ज्ञानाची मूर्ती, नामदेवराय प्रेमाची मूर्ती, तुकाराम महाराज प्रत्यक्ष वैराग्य मूर्ती तर एकनाथ महाराज दयेची मूर्ती।।
वारकरी सांप्रदाय मंदिराचा पाया ज्ञानेश्वर महाराज, मंदिराचा विस्तार नामदेवराय, कळस तुकोबाराय तर मजबूत खांब एकनाथ महाराज.
जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।।
नामदेवराय, माऊलीनंतर वारकरी सांप्रदायास यवनांच्या स्वाऱ्यांमुळे उतरती कळा प्राप्त झाली होती. निखारा होता पण त्यावर राख साचली होती. राख काढून तो निखारा परत नाथ महाराजांनी प्रज्वलित केला.
एकनाथ महाराज हे भानुदासांच्या कुळीत अवर्तिण झाले. तत्कालीन विजयनगरचे राजे, कृष्णराय यांनी सत्ताबळावर पंढरपुरची विठ्ठल मूर्ती आपल्या राजधानीत नेली होती. ती भानुदास महाराजांनी भावबळावर परत पंढरपूरला आणली. भानुदास महाराजांना विठ्ठलांनी असा वर दिला की, ‘मी तुझ्या घराण्यात अवतार घेईन.’ ते हे विष्णुचे अवतार एकनाथ महाराज.
यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य। हे साही गुणवर्य। वसती तेथ।।ज्ञा।।
नररुपे अवतरले हे भगवंत।।
वास्तविक पाहता सामान्य जनापेक्षा साधक मोठे, साधकापेक्षा सिद्ध मोठे, सिद्धा पेक्षा संत मोठे.
शास्त्राचे उत्तम अध्ययन करुन, निर्गुण निराकार परम तत्वाचा साक्षात्कार जे सर्वसामान्यांना करुन देतात, ते संत असतात. संतांचा जरी सर्वसामान्यांसारखा अवतार होत असला तरी दोघांत फार मोठे अंतर आहे.
“हिरा परीस मोहरा आणिक पाषाण। नव्हे परिजन संता तैसी।। सरिता ओहळ गंगा सागर समान। लेखी तयाहून अधम नाही।।तु।।
तिर्थास जल, मूर्तीस पाषाण, कल्पतरुला झाड, चिंतामणी अथवा हिऱ्याला दगड, कामधेनुला गाय अशी तुलना होणार नाही. सरोवर, विहीर, नदी यांची तुलना समुद्राबरोबर, तर चांदण्यांची तुलना सूर्य, चंद्राबरोबर करता येणार नाही.
स्वरुप, गुण, शक्ति, कार्य, फळ, सत्ता, अधिकार, किर्ती जन्म मरणातीत सारखेच असल्याने,,
“देव ते संत। निमित्त त्या प्रतिमा।।तु.म.।।
संतांना जाऊन जवळपास आठ ते दहा शतके झालीत. आम्ही संतांना पाहीलं नाही. पण त्यांच्या ग्रंथ संपदेच्या माध्यमातून आजही नामस्मरणाला महत्व आहे.
“जिव्हे तीन गोड अक्षरांचा रसा। अमृत जयास फिके पुढे।।
तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार। नाम हेचि सारं विठ्ठोबाचे।।तु.म.।।
नाम मंगलात मंगल, पवित्रात पवित्र, बऱ्याच बरे , खऱ्यात खरे, गोडात गोड, मोठ्यात मोठे, श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. पुण्यात पुण्य देणारे, चांगल्यात चांगले, सर्वात महत्वाचे सोप्यात सोपे आहे.
योग, याग, तप, दान, व्रत या सर्वांपेक्षा नाम सोपे व सुलभ आहे.
कामामध्ये काम। कांही म्हणा रामराम। जाईल भवश्रम। सुख होईल दु:खाचे।।
नाथांनी ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण, भागवताच्या अकरा स्कंदांवर मराठीत टीका , भावार्थ रामायण, आनंद लहरी, अभंग, गवळणी, भारुड इत्यादी वाड्;मय लिहीले. नाथांच्या भारुडाने सर्वांना वेड लावले. भारुड म्हणजे दोन तोडांचा पक्षी. भारुडात आध्यात्मिक व संसारिक अर्थ असतो. भारुड म्हणजे भावनेवर आरुढ होणं. भारुड म्हणजे भगवंताप्रती भाव रुढ होणं. आपल्यातील विकारांचा भाव उतरवणं.
“मला दादला नको गं बाई। मला नवरा नको गं बाई।।
संसारिक अर्थ जर लावला तर वाटतं एखादी स्त्री आपल्या पतीची तक्रार करतीये. पण त्याचा आध्यात्मिक अर्थ , सात्विक बुद्धीला अविवेकी नवरा पटत नाही.
तत्कालीन सामान्यांना आध्यात्म समजण्यासाठी अवघड होतं. म्हणून नाथांनी वेगवेगळी रुपक, वेशभूषा, बोलीभाषा वापरुन भारुड तयार केली.
” या विंचवाला उतारा। तमोगुण मागे सारा। सत्वगुण लावा अंगारा । इंगळी उतरे झरझरा।।
दगडात पहिलीच मूर्ती असते.फक्त नको तो भाग काढावयाचा असतो. तसेच आपल्यात सात्विकता असतेच, फक्त काम, क्रोधाचं गलिच्छ आवरण काढावयाचं असतं. सत्वगुणांचा अंगीकार केला की, काम क्रोधाच विष हळु हळु उतरतं.
सासु माझी किरकिर करते। तिकडच खपु दे तिला। भवानी आई रोडगा वाहिल तुला।।
मनातील अवास्तव कल्पना म्हणजे सासु, अविद्या ही नणंद, काम हा दादला तर क्रोध हा दीर. आशा , ममतेला जावाचं रुपक दिलं आहे. नाथांनी भारुडात गायन, संभाषण, रुपक, विनोद , बोलीभाषा वापरुन समजण्यास सोपं करुन त्यात रंजकता निर्माण केली.
नाथांचे भारुड, जोगवा असे साहीत्य मानवी मनाला उपदेश व मनोरंजनातून प्रबोधन करणारे आहे. एकाच वेळी माणसातील दोष दाखवणारे व जीवनाला दिशा देणारे आहेत. माणसाच्या दैनंदिन जगण्यातील व बघण्यातील रुपके वापरुन भारुडातून भक्तिची व निती ची शिकवण दिली.
आम्ही वर्षानुवर्षे ” भानुदास एकनाथ” या नामाचा गजर करीत, पैठणच्या वाटेवर चालतो. परंतु मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार घालवल्या शिवाय त्या शांती ब्रह्माचा पावन स्पर्श कसा होईल.
“महामळे मन होते जे गाढले। शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे।।
“अहंकारं बलं दर्पं कामं क्रोध परिग्रहम्। विमुच्य निर्मम: शांतो ब्रह्मभूयाय कल्पते।।गीता।।
संसारात शांती आणि सुख शोधण्यात आयुष्य संपत चालले. खऱ्या विश्रांतीची दोनच स्थाने आहेत, सत्संग आणि नामस्मरण.
” विश्रांतीचा ठाव। पायी संताचिया भाव।। तु.म.।।
“नामा म्हणे देवा चला तया ठाया। विश्रांती द्यावया कल्पांतरी।। नाम।।
षड्विकार, षड्उर्मी, षड्वैरी हे सहा गोदावरीच्या पात्रात दृढ संकल्पाने सोडणे व मनात सदैव शांती भाव जोपासणे, हीच खरी नाथ षष्ठी.
नदी दिव्य गोदातटीच्या निवासी।
सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांसी।
तयाचेनि नामें चुके जन्मव्यथा।
नमस्कार माझा गुरु एकनाथा।।
जय जय रामकृष्ण हरी ॥
– अनंत भ. कुलकर्णी
बीड